Heat Wave: उष्माघात टाळायचा असेल तर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heat Wave: उष्माघात टाळायचा असेल तर..
}
वाढत्या तापमानवाढीवर उपाय हवा

Heat Wave: उष्माघात टाळायचा असेल तर..

जागतिक तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटा हा आता पंचतारांकित हॉटेलांतील गारठलेल्या लॉबीत चर्चा करण्याचा विषय राहिलेला नाही. तो आता तुमच्या आमच्या जीवन- मरणाचा प्रश्न झाला आहे. त्याचं गांभीर्य जितकं लवकर आपल्याला समजेल तेवढं चांगलं होईल कारण निसर्ग (Nature) आता आणखी जास्त काळ आपल्याला संधी देईल असं दिसत नाही. किंबहुना ती संधी आपण आपल्या हातानेच दवडत आहोत असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (How to avoid heat wave)

चकचकीत नागरीकरणाच्या बेसमेंटखाली आपण आपली जंगलं (Forests) आणि जलस्रोत दफन करत चाललो आहोत. एकीकडे बाटलीबंद थंड पाण्याची (Water) चंगळ आणि दुसरीकडं हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट हे चित्र आपल्यासाठी खचितच भूषणावह नाही. आता तर हंडाभर पाण्याचीही शाश्वती राहिलेली नाही. हे चित्र बदललं नाही तर उद्या बाटलीबंद पाण्याचंही दुर्भिक्ष्य जाणवू लागेल.

सध्या अवघा देश हा उष्णतेच्या लाटांमध्ये (Heat Wave) होरपळतो आहे. यंदाच्या मार्चहिटनं तापमानाचे सगळे उच्चांक मोडीत काढले. मार्च- एप्रिलमध्ये सर्वाधिक उष्णतेच्या लाटा उसळल्या होत्या. राजधानी दिल्लीतील पारा 43 ते 45 अंशांपर्यंत पोचला. महाराष्ट्रामध्ये विदर्भातील नागपूर, चंद्रपूरमध्ये तापमानाची तीव्रता अधिक होती. आता उष्माघाताची समस्या ही डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल घालून सोडविण्यापुरती सामान्य राहिलेली नाही. ती आता तुमच्या शरीराप्रमाणेच खिशालाही कात्री लावणार आहे.

उदाहरण घ्यायचे झाले तर दिल्लीचे घेऊ. या उष्णतेमुळ दिल्लीत शाळांचं वेळापत्रक तर बिघडलंच पण त्याचबरोबर दिवसा शारीरिक कष्टाची कामं करणारी, मोलमजुरीवर राबणाऱ्या कामगारांच्या पोटालाही याचा चटका बसला आहे. कारण एवढ्या उष्णतेमध्ये भर रस्त्यावर काम करणं त्यांच्यासाठी असहय्य होऊन बसलं आहे. याचा थेट परिणाम हा विकासकामांवर होणार आहे. यामुळे अनेकांचे रोजगार तर बुडतीलच पण त्याचबरोबर प्रकल्पांची गतीही मंदावेल. यंदा जे चित्र मे आणि जूनमध्ये दिसायचं तेच आता मार्च आणि एप्रिलमध्ये पाहायला मिळालं. हे सगळं काही आपल्यासाठी अनपेक्षित होतं का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे.

उष्णतेच्या लाटा

साधारणपणे ऐंशीच्या दशकापासून उष्णतेच्या लाटा तीव्र होत चालल्याचे आपल्याला दिसते. प्रत्येक दशक हे याआधीच्या दशकापेक्षा अधिक उष्ण असल्याचे दिसून येते.2011-20 हे सर्वाधिक उष्ण दशक ठरलं आहे. 2007 ते 2021 पर्यंतचा कालखंड विचारात घेतला तर अकरा वर्षे ही उष्णतेच्या चटक्याची ठरली आहेत. उष्ण दिवसांमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. पूर्वी जी राज्ये या उष्णतेच्या लाटेपासून सुरक्षित मानली जात होत होती त्यांनाही आता याची झळ बसू लागली आहे. यामध्ये हिमाचलप्रदेश, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक यांचा समावेश होतो. ज्या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये सर्वाधिक आर्द्रता असते तिथेही आता या उष्णतेचे नवे संकट निर्माण झाले आहे. येथील तापमान 35 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे, यामध्ये आणखी वाढ झाली तर लोकांना घराबाहेर जाणंही अशक्य होऊन बसेल. हा वेट बल्ब इफेक्ट मानवी आरोग्यावर विपरित परिणाम करणारा आहे.

सरकार काय करते आहे?

यासंदर्भात आयपीसीसी (इंटर गव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज)ने तयार केलेला अहवाल सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारा आहे. वैश्विक तापमानामध्ये आणखी 1.5 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास उष्णतेच्या लाटांची संख्या तर वाढेलच पण त्याचबरोबर त्यांची तीव्रताही वाढलेली असेल. तेव्हा मात्र हे चटके आणखी असहय्य होऊन बसतील. अशा स्थितीमध्ये निव्वळ आकाशाच्या छपराखाली राहणाऱ्याचं जगणं आणखी मुश्कील होणार आहे.

आयपीसीसीने येत्या काही वर्षांमध्ये भारतीय उपखंडाला आणखी तीव्र लाटांचा सामना करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे. या उष्णतेमुळे मनुष्य दिवस कमी (कामाचे दिवस) होतील. ही संख्या दरवर्षी अडीचशेच्या घरामध्ये जावू शकते. याचाच अर्थ दरवर्षी आठ ते नऊ महिने या उष्णतेचा या लोकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. या सगळ्यांची जबर आर्थिक किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे.

हे सगळे आपल्या डोळ्यासमोर घडत असताना धोरणकर्त्या सरकारला आणि ते चालविणाऱ्या मंडळींना याचे कसलेही सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. या समस्येची तीव्रता आपल्याला कमी करायची असेल तर तापमानाची पातळी ही आपल्याला आयपीसीसीने ठरवून दिलेल्या 1.5 अंश सेल्सिअसपर्यंतच ठेवावी लागेल पण आयपीसीसीचा ताजा अहवाल हे लक्ष्य आपल्यासाठी दिवसेंदिवस दुष्र्पाप्य होत असल्याचे सांगतो. या सगळ्याला ब्रेक लावायचा असेल तर एक छोटीशी खिडकी आपल्यासमोर उपलब्ध आहे. ती म्हणजे सगळ्याच क्षेत्रातील हरितगृह वायूच्या उत्सर्जनाला चाप लावणं हे होय.

हे करावेच लागेल

- सौर आणि पवन ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे

- शहरातील पायाभूत सुविधांना अधिक हरित करणे

- वन क्षेत्र वाढविणे तसेच जमिनीचे योग्य व्यवस्थापन

- पर्यावरणपूरक गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी

- घरे बांधणी, प्रकल्प उभारणी करताना पर्यावरणाचा विचार

शहरीकरणामुळे समस्या वाढली

शहरीकरणाने उष्णतेची समस्या निर्माण केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमच्या टोलेजंग इमारती, रस्ते, कारखाने आणि वाहनांनी आतील वातावरण थंड केलं पण बाहेरचं मात्र तापविलं. एसीमुळं आत जरी थंडावा निर्माण होत असला तरीसुद्धा बाहेर मात्र मोठ्या प्रमाणावर उष्णतेचं उत्सर्जन होतं. घर कार्यालये थंड ठेवण्याच्या नादामध्ये आपण आपला सभोवतालचा परिसर तापवत आहोत. याचा आपल्याला विसर पडतो.

शहरं उष्णतेची बेटं होऊ द्यायची नसेल तर आपल्याला मोकळ्या जागांचे वनीकरण, जलस्रोतांची निर्मिती आणि संवर्धन आणि पर्यावरणपूरक गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी करावी लागेल. या सगळ्याकडं दुर्लक्ष करताना आज आपण अधिक उष्ण घरं उभारत चाललो आहोत. सध्या घरांच्या उभारणीमध्ये मोठ्याप्रमाणावर कॉंक्रीट आणि काचेचा वापर केला जातो. बऱ्याच घरांमध्ये व्हेटिलेशनची समस्याही असते. गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरांची देखील हीच अवस्था आहे त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घरांमध्ये राहणं अधिक मुश्कील होईल. या सगळ्यांमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर आपल्याला नगरनियोजन आणि बांधकाम तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील.

सरकारने समस्या मान्य करावी

मुळात सरकारी यंत्रणेने उष्णतेच्या लाटेची समस्या मान्य करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारलाही समस्या लक्षात घेऊन त्याबाबत धोरणं आखावी लागतील. या लाटांचा ज्यांच्या रोजगारावर थेट परिणाम होणार आहे त्यांच्यासाठी वेगळं नियोजन करावं लागेल. उष्णतेच्या काळामध्ये कामाचे तास कमी करणे तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळणे आदी बाबी उपलब्ध करून द्याव्या लागतील.

घरी एसीत राहणाऱ्या एसी गाडीतून कार्यालयात जाणाऱ्या आणि ऑफिसातही एसीतच काम करणाऱ्यांना या समस्येची तितकीशी झळ बसणार नाही पण निव्वळ आकाशातल्या बापावर विसंबून राहत भर उन्हामध्ये कष्टाची कामं करणाऱ्यांना हे चटके अधिक बसतील. गरिबांचा उष्माघात टाळायचा असेल तर आपल्याला आतापासून पावले उचलावी लागतील. अन्यथा शेजाऱ्याच्या घरात लागलेली ही आग तुमच्या घरातही यायला वेळ लागणार नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top