सामान्यांचं कंबरडं मोडणाऱ्या कोरोनाने IT कंपन्यांना केलं मालामाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona experience}

सामान्यांचं कंबरडं मोडणाऱ्या कोरोनाने IT कंपन्यांना केलं मालामाल

जीवनात येणारा प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो नाहीतर वाईट, आपली अनुभवाची शिदोरी अधिक समृद्ध आणि बळकट करत असतो. कोरोनाच्या दोन वर्षाच्या अस्तित्वाने आपली ही अनुभवशिदोरी डोंगराएवढी मोठी केलेली आहे. तरीही त्यात भर पडत आहेत. त्यातील काही अनुभवांना दिलेला उजाळा...

कोणत्याही घटनेला चांगली आणि वाईट अशा दोन्हीही बाजू असतात. तसंच आपत्तीदेखील येते तेव्हा जसा हाहाकार माजवते, तसं परिवर्तनचे पर्वही आणू शकते. कोणत्याही घटनेला साद आणि पडसाद या दोन्हीही बाजू असतात. शंभर वर्षांच्या अंतरानंतर जग पुन्हा एकदा नव्या स्वरुपाच्या संसर्गजन्य साथीच्या आजाराला कोरोनाच्या म्हणा किंवा कोविडच्या साथीने सामोरे गेले. साथ वेगाने पसरत असल्याने आणि ती फुफ्फुसासह शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करत असल्याने दक्षतेचे उपाय अधिक कडक करण्याशिवाय पर्याय नव्हता. साथीचा फैलाव इतका वेगवान होता की, आरोग्य यंत्रणेला त्याला अटकाव करणे सुरवातीला कठीण वाटत होते. येणाऱ्या रुग्णांच्या लोंढ्यावर कसे नियंत्रण मिळवावे, आलेल्या रुग्णांना अधिक वेगाने उपचार कसे द्यावेत, यापासून नेमके कोणते औषध रामबाण ठरू शकते, इथपर्यंत अनेक आव्हाने आ वासून उभी होती. अशा स्वरुपाचा बाका प्रसंग येतो तेव्हाच व्यवस्थापन कौशल्य, प्रशासनातील दीर्घ अनुभव, तज्ज्ञांच्या अभ्यासातील बारकावा कामी येतो. त्यातूनच सरकारच्या पातळीवर अशा स्वरुपाच्या साथीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यामुळेच सरकारने आपत्ती नियंत्रण कायद्याचा पुरेपूर वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत रुग्णांवर उपचाराचा मार्ग अधिक सुकर केला. त्यातलाच एक मार्ग होता लॉकडाऊनचा. या टाळेबंदीने सगळ्याच आघाड्यांवर सर्वच वयोगटाची घडी विस्कटली. जगण्याच्या मार्गापासून ते समाज जीवनाच्या अनेक आघाड्यांवर उलथापालथ घडवली. या कोरोनाच्या लॉकडाऊनने आणि साथीच्या आजाराच्या तीव्रतेने, तिच्या व्यापक परिणामांनी माणसाला खूप शिकवले. इतके कोरोनासोबत आता जगायला शिकले पाहिजे, याच कोरोनाने जगण्याचे नवे खूप काही धडे दिले. त्यांची संख्यात्मक मोजणी करायला गेली तर व्यक्तीनिहाय त्यात वैविध्य आढळले. त्याचे स्वरुप वेगवेगळे दिसेल. असेच काही प्रमुख धडे आणि आपले जगणे...

वर्क फ्रॉम होम (Work from Home) : पिढ्यान् पिढ्या मनात खोलवर रुजून बसलेली काम फक्त कार्यालयात जावूनच करते येते, या संकल्पनेला माहिती तंत्रज्ञानावर (आयटी) स्वार झालेल्या आपण ऐन कोरोना काळात चोख उत्तर देवू शकलो. इतके की, कोट्यवधी लोकांनी घरबसल्या कामाचा फडशा पाडला. एवढेच नव्हे तर गुगल, फेसबुक, टीसीएस, इन्फोसीस यांच्यासह अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अद्यापही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही पद्धत सुरूच ठेवली आहे. एवढेच नव्हे तर जर कर्मचारी घरी राहून तितक्याच कार्यक्षमतेने, तेवढ्याच वेळेत काम करू शकत असतील, मोठमोठ्या टोलेजंग इमारती, त्यावरील आस्थापना खर्च तसेच कर्मचाऱ्यांसाठी इतर सुविधा देणे, वाहतूक व्यवस्था का राबवा, असा प्रश्न व्यवस्थापन तज्ज्ञ करू लागले आहे. अगदी याच काळात टेलीमेडीसीनवर भर देत डॉक्टर मंडळींनी वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट, रुग्णांशी व्हिडिओ कॉलवर बोलून, त्याची विविध प्रकारे चौकशी करून त्याला आजारातून बरे केले आहे, अगदी कोरोनातूनही त्यांना सहीसलामत बाहेर काढले आहे.

गुगल मीट, झुमचा अनुभव : याच काळात आयटी आणि दूरसंचार यंत्रणेने आपला प्रभाव दाखवला. व्हाटस्अॅप स्काईपवर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत असतानाच, गुगल मीट, झूम यासारख्या अपने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यापासून ते सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठका, धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बैठका, न्यायालयाचे कामकाज ते अगदी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, विवाह समारंभ, मुंजी अशा सगळ्या घटना-घडामोडींमध्ये सहभागाचा घरबसल्या अनुभव लोकांना दिला. एवढेच नव्हे अगदी निधन झालेल्या आप्त, नातेवाईक, मित्रांवरील अंत्यसंस्कारदेखील हुंदके देत अनेकांनी अनुभवले. तंत्रज्ञानाची या कमालीचा आविष्कारही याचमुळे व्यापक झाला.

घरबसल्या शाळा, शिक्षण आणि नोकरीही - अगदी केजी, पहिलीपासूनच्या शाळा ते महाविद्यालयातील शिक्षण, एवढेच नव्हे तर हे शिकल्यानंतर त्याचे मूल्यमापन करणाऱ्या परीक्षाही या काळात घरबसल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आणि शिक्षकांनी शिकवले व परीक्षाही घेतल्या. शिवाय, जे शेवटच्या वर्षाला होते, अशांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅम्पसची प्रक्रियादेखील ऑनलाईन राबवली गेली. ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि नोकरीचे नेमणूकपत्रही घरबसल्या मिळवले. एवढेच नव्हे तर नोकरीदेखील घरबसल्याच नवी पिढी करूही लागली. अर्थात, या सगळ्या प्रक्रियेने सगळेच अलबेल झाले असे नाही पण काम अडून पडले नाही, हेही तितकेच खरे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी : महाराष्ट्र सरकारने ही घोषणा देत आरोग्यविषयक जनजागृती केली. या काळात पहिल्यांदा अगदी प्रकर्षाने घरातील प्रत्येकाला मायेची ऊब आणि कुटुंबसंस्था हीच आपल्याला या आपत्तीच्या काळात बळ देऊ शकते, परिस्थितीवर मात करून पुन्हा उभे राहायला मदत करू शकते, याचे प्रत्यंतर आले. कुटुंबाचा धागा अधिक बळकट झाला. आपत्ती आणि त्यामुळे येणारी शारीरिक आणि मानसिक आव्हाने, बिकट परिस्थितीत घरातील मंडळीच एकमेकांना मदत करू शकते, हे पटले. न्युक्लियर फॅमिलीचा पुरस्कार करणारेही खरंच हं, पुर्वीची एकत्र कुटुंब पद्धतीच महत्त्वाची आहे हे पटलं बुवा, असं म्हणू लागले.

इंटरनेट कोरोनामध्ये साथी : लॉकडाऊन आणि ते शिथील केल्यानंतरही निर्बंधांचा कडक ससेमिरा कायम राहिला. पहिल्या दोन लाटांत फारसे अंतर नव्हते. त्यामुळे घरकोंडीत अडकलेल्यांना घरबसल्या करायचे काय या समस्येने सतावले होते. त्यावर रामबाण इलाज सापडला तो दीड-दोन जीबीच्या रोजच्या डाटाने. त्यामुळे करमणूक, मनोरंजन, शिक्षण, संवाद यांच्यापासून ते कार्यालयीन काम करणे, खरेदी करणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे यांच्यापासून ते घरबसल्या काहीही शिकणे अशा अगणित प्रकारे, अगदी ज्याला जशा प्रकारे पाहिजे त्या प्रकारे फायदा घेता आला. एवढेच नव्हे थेट संवादासारख्या गोष्टीपासून ते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यापर्यंत असे कितीतरी प्रकारचे अनुभव दिले.

छंद जिवाला लावी पिसे : लॉकडाऊन लागला आणि सगळे वेडेपिसे झाले. पहिले काही दिवस बरं वाटलं. रोजची वामकुक्षी, रोज नवनवी पक्वान्ने, रेसिपीजचे प्रयोगशिलता आणि त्यातून सुस्ती येऊ लागली. वजनाचा काटा भीती दाखवू लागला. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला. त्यावर अक्सर इलाज सापडला तो जगण्याच्या रामरगड्यात विसर पडलेल्या छंदांचा. मग पेंटिंग ब्रश, रंगपेटी, कोपऱ्यातील धुळखात पडलेली हार्मोनियमची पेटी, माळ्यावरचा तबला- डग्गा, छुमछुम वाजणारे घुंगरू अशा छंद तितकी साधने सगळे बाहेर पडले आणि पुन्हा एकदा लॉकडाऊनने जगण्याचा हरवलेला सूर गवसू लागला. वय वाढलं तरी उत्साह कायम आहे, आपण नवीन काही शिकू शकतो, याचा विश्वास आला. मग यूट्यूब गुरू आणि गुगलेश्वरवरील माहितीचा खजिना छंद आणि शिकणे दोन्हीही अधिक समृद्ध करू लागला. एवढेच नव्हे समछंदी मंडळींनी एकत्रित येऊन आपापल्या घरात बसून कलाविष्काराचे कार्यक्रमही घरबसल्या सादर करून वाहवा मिळवली. मनाला मोठी उभारी मिळवली. भाजीसाठी घराबाहेर पडता येत नाहीतर घराच्या गच्चीवर, परिसरात बाग फुलवून गरजेपुरता भाजीपाला मिळवता येतो, हाही विश्वास दिला.

व्यायाम आणि आहार नियोजन : दरवर्षी १ जानेवारीपासून न चुकता व्यायाम, योगांचा संकल्प करणारे आळसाने त्याला दूर लोटायचे. तथापि, फुफ्फुसावर हल्ला करून जीव घुटमळायला होतो, अशी तक्रार करणाऱ्यांना प्राणायाम, योगासनांनी दिलासा दिला. नव्हे तर आजाराला दूर ठेवण्यापासून ते आजारातून उठल्यानंतर जगणं पूर्ववत करण्यासाठी रोज न चुकता व्यायाम, योगासने करण्याची आपसूक सवय लावली. अनेकांच्या जीवनशैलीत त्याला अढळ स्थान देण्याचा निर्धार करणे भाग पाडले. जी मंडळी यातील तज्ज्ञ आहे, अशांना घरबसल्या व्यावसायिक नव्या संधी गवसल्या. एवढेच नव्हे सुटलेली ढेरी, वजनाच्या काट्याची किटकिट आणि कोरोनाची बाधा यांचे सूत लक्षात आल्याने आहारतज्ज्ञांकडे रीघ लागली. तेलकट, तुपकट खाण्यावर नियंत्रणापासून ते विशिष्ट प्रकारचा आहार आजारावर प्रतिबंधक आणि झाल्यास त्यातून बाहेर पडण्यास मदतकारक ठरू शकतो, हे शिकवले. परिणामी, जीम, व्यायामशाळा, उद्याने, व्यायामाची साधने, यूट्यूबवर तज्ज्ञांच्या व्हिडिओंचे सब्सक्रायबर्स वाढले.

मर्यादीत गरजांमध्ये जगता येते :

पहिला लॉकडाऊन इतका कडक होता की, अनेकांना ताटात रोज जे पदार्थ लागायचे तेही दुर्मिळ होऊ लागले. ते जेव्हा मिळायचे तेव्हा भाजीमंडईतील तोबा गर्दी, किराणा दुकानांसमोरील रांगा सगळ्यांनीच अनुभवल्या. पण अशा स्थितीत घरातील पापड, लोणची, खारवलेल्या वस्तू, यांच्यापासून पापड, सांडगे यांच्यासारख्या उन्हाळ सामानावरही जगता येते. डाळी, उसळीने प्रोटिनची गरज भागू शकते. एखाद्यावेळी भाकरी खाल्ली तरी पोटात ती रुतत नाही, असे कितीतरी अनुभव आले. त्यांनी घराबाहेर न पडता, बाजारातून कोणतीही चीजवस्तू फारशी नाही आणली तरी काही दिवस निश्चित आपण जगू शकतो, हा धडा कोरोनाने दिला.

व्यसनावर मात शक्य : तंबाखू-चुन्याची पुडी आणायला गेला आणि लाठीचा मार खाल्ला, सिगरेटचा झुरका घ्यायला गेला आणि उठाबश्या काढायला लागल्या. मुंह माँगे पैसे देवून बाटली मागवली आणि दोन्हीपैकी काहीच हाताला गवसले नाही. लॉकडाऊनच्या या परिणामाने अस्वस्थ जीव अधिक व्याकुळ व्हायचे. दिवसांमागून दिवस सरत गेले पण तलफ काही भागत नव्हती, पण एक मात्र विश्वास मिळत होता, कोणतंही व्यसन न करता आपण आता पुर्वीसारखं सुरळीत जगू शकतो. तलफ येणेही कमी व्हायला लागलं आहे. सगळ्यांत महत्त्वाचं घरातील मंडळीही त्यामुळे खूश आहे. कोरोना व्यसनींच्या जीवावर उठू शकतो, या धाकाने आणि व्यसन सामग्रीच्या दुष्काळाने अनेकांचे व्यसन सुटले हीदेखील कोरोनाच्या महासाथीने करून दिलेली कमाईच मानली पाहिजे.

माणुसकी आणि अमानुषपणा : संपत्तीचा माज आणि मस्ती अनेकांना असते. पैश्याच्या बळावर सगळं विकत घेता येते, हे मनाचे निर्ढावलेपण इतरांना तुच्छ लेखायला भाग पाडते. मात्र, अनेक स्वतःला प्रतिष्ठित, संपत्तीमान मानणाऱ्यांच्या अहंकाराचा फुगा फुटलेला दिसला. पैसा नव्हे तर माणुसकीचा गहिवरच धीर आणि बळ देऊ शकतो. खिशात पैसे असले तरी रुग्णालयात बेड मिळेल, ऑक्सिजनची नळी नाकात शिरेल, वेळेत अॅम्ब्युलन्स मिळेल, आणि उपचार करणारा डॉक्टर सापडेल, याची शाश्वती नव्हती. अर्थात, हे सरसकट म्हणता येणार नाही. तसे असते औषधांचा काळाबाजार करून उखळ पांढरे करून घेणारे, उपचाराचे रेमडीसीवर देतो, असे सांगून सलाईन विकणारे सापडले नसते. अव्वाच्या सव्वा दराने औषधे विकणारे, त्याचा काळाबाजार, साठेबाजी करून जनतेला वेठीला धरणारेही होतेच ना. एवढेच नव्हे अनेक डॉक्टर आणि टोलेजंग इमारतीवाल्या हॉस्पिटल्सनी अव्वाच्या सव्वा आकारणी करून लोकांना लुटलेच ना. म्हणून तर सरकारला सेवांची दरनिश्चीती करावी लागली. आकारलेल्या बिलांचे ऑडीट करावे लागले. याचवेळी धर्म, जात, पंथ, विचारसरणी या सगळ्यांच्या पलीकडे जात माणसातील माणुसकी जीवंत आहे, असे सांगणारी अनेक उदाहरणे दिसली. अहोरात्र काम करणारे अॅम्ब्युलन्स चालक, महिना-महिना घरी न जाता सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका यांच्यापासून ते सेवाभावी वृत्तीने स्मशानात अंत्यसंस्कार करणारे आणि मृतांच्या नातेवाईकांना धीर देणारे अपरिचीतही दिसले.

भीती, आपत्तीवर मात : कोरोनाने सुरवातीला अनेकांना धडकी भरवली होती. आता जगबुडी होणार ही भीतीची भावना अनेकांना सतावत होती. दूरचित्रवाणीवरील ब्रेकिंग न्यूज, यूट्यूबवरील विविध प्रकारचे व्हिडिओ, सोशल मिडियांवरून पसरवले जाणारे मेसेजेस, रस्त्यांवरील शुकशुकाट आणि घरकोंडीने खायला उठणारे एकाकीपणा छातीत धडकी भरवत होता. आता आपले काही खरे नाही, या भीतीने गर्भगळीत होणारे काही कमी नव्हते. रोज रात्री अंथरूणावर पडले तरी अनेकांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. रात्रीच्या रात्री जागून काढल्या जात होत्या. मनावर मणामणाचे ओझे आहे, ही भावना दृढमूल होत होती. हातापायाचा गळाटा आणि तोंडाला कोरड अशी अनेकांची अवस्था व्हायची. आप्तेष्टांच्या जाण्याने छातीत कळ उमटत होती. सुरवातीची ही स्थिती पहिल्या दोन लाटांमध्ये बऱ्यापैकी घर करून होती. पण तरीही आपण जिवंत आहे, साथीने आपल्याला गाठलेले नाही, ही भावना आशेचा कवडसा आणत होती. आत्मविश्वासाची दोरी बळकट करत होती. याच आत्मविश्वासाच्या बळावर आजही आपण सगळेजण आपत्तीवर मात करून दोन हात करायला सज्ज आहोत, हेदेखील कमी नाही. अशी डोंगराएवढी अनुभवाची शिदोरीच आपल्या सर्वांना भविष्यातही बळ देणारी ठरो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top