दीर्घायुषी व्हायचयं, जपानी नागरिकांचं अनुकरण करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीर्घायुषी व्हायचयं, जपानी नागरिकांचं अनुकरण करा!}
S + दीर्घायुषी व्हायचयं, जपानी नागरिकांचं अनुकरण करा!

दीर्घायुषी व्हायचयं, जपानी नागरिकांचं अनुकरण करा!

जपान हा जगातील सर्वाधिक जीवनमान असणारा देश म्हणून ओळखला जातो. जगातील इतर देशांच्या तुलनेत जपानी नागरिक दीर्घायुषी असतात.जगभरात शंभरी पूर्ण करणाऱ्यांची संख्या जपानमध्ये सर्वाधिक आहे. या देशात दर एक लाख लोकांपैकी ४८ जण १०० पेक्षा अधिक वर्षे जगतात. त्यामुळेच, जपानी नागरिकांचे सरासरी जीवनमान इतर कोणत्याही देशातील नागरिकांपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी म्हणजे, फेब्रुवारी २०२० मध्ये तब्बल ११२ वर्षांच्या चित्तेसु वतनबे यांची जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती म्हणून गिनेस बुकमध्ये नोंद झाली होती. त्यानंतर, दहाबारा दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. जपानी पुरुषांचे सरासरी वय ८० आहे तर स्त्रियांचे सरासरी वय ८६ इतके आहे. म्हणजेच, दीर्घायुषी होण्यात स्त्रियांनी बाजी मारलेली दिसते. जपानमधील नागरिक आयुष्याच्या अखेरपर्यंत शिस्तबद्ध, निरोगी जीवन जगतात. आपण भरपूर वर्षे जगावे, असे तुम्हाला वाटते का, त्यासाठी, जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घ्यायला हवे.

जपानी नागरिकांचा आहार

आहार आणि आरोग्याचा नजीकचा संबंध आपल्या सर्वांनाच माहित आहे. निरोगी राहण्यासाठी सकस, पौष्टिक, संतुलित आहार महत्वाचा ठरतो. जपानी नागरिकांच्या दीर्घायुष्य रहस्य त्यांच्या आहारातही दडले आहे. जपानी लोकांच्या आहारात भाज्यांना महत्वाचे स्थान आहे. ते दररोजच्या आहारात मोठ्या प्रमाणावर हिरव्या भाज्या घेतात. त्यांच्या ताटातील निम्म्यापेक्षा भाग हिरव्या भाज्यांनी व्यापलेला असतो. याशिवाय, ते विविध डाळींचेही नियमितपणे सेवन करतात. त्याचप्रमाणे, सागरी खाद्यपदार्थ म्हणजे सी फूडलाही जपानी नागरिक प्राधान्य देतात. त्यांच्या आहारात मासे नियमित असतात. भाज्या, सोयाबीन, स्टीम राईस, मिसो सूप या आहारामध्येही जपानी नागरिकांच्या दीर्घायुष्य दडले असावे, असे मानले जाते. त्याचप्रमाणे, जपानी नागरिक आहार कसा घेतात. तो कशाप्रकारे शिजविला जातो, यावरही बराच गोष्टी अवलंबून आहेत. अलीकडील काळात नेहमीच्या साखरेच्या चहाचे तोटे लक्षात घेऊन आपल्याकडे ग्रीन टीचे सेवन वाढत आहे. जपानी नागरिकांमध्ये मात्र, ग्रीन टी पूर्वीपासून लोकप्रिय आहे. ते दररोज सरासरी दोन कप ग्रीन टी घेतात. ग्रीन टीमधील ॲंटिऑक्सिडंट तत्वामुळे ऊर्जेची पातळी वाढते, याशिवाय प्रतिकारशक्तीत वाढ होण्यातही मदत होते. ग्रीन टीमुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होऊन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.
जपानी नागरिक मोठ्या ताटात भरपूर पदार्थ घेऊन भोजन करत नाहीत. त्याऐवजी ते छोट्या प्लेटमध्ये किंवा कटोऱ्यात कमी अन्न घेतात. ते सावकाश चावून खातात. त्याचप्रमाणे, मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवण करण्याची सवयही जपानी नागरिकांना नाही.

हेही वाचा: टेलिस्कोपची दुनिया!

जपानमधील आरोग्यसेवा

जपानमधील आरोग्य सेवा दर्जेदार, प्रगत असून सरकारनेही यात विशेष लक्ष घातले आहे. जपानमधील आरोग्यसेवा जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवेपैकी एक समजली जाते. आरोग्याची काळजी घेणे हा जपानी संस्कृतीचाच भाग आहे. जपानी नागरिक वर्षाला सरासरी १३ वेळा डॉक्टरकडे जातात. त्यामुळे, अनेकवेळा आजारांचे वेळेवर निदान होते. सरकारकडून आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. जीडीपीच्या दहा टक्क्यांहून अधिक खर्च आरोग्यावर केला जातो. कोणत्याही आजारावर उपचार घेतल्यास रुग्णाला जास्तीत जास्त फक्त ३० टक्के खर्च करावा लागतो. उर्वरित ७० टक्के खर्च सरकार करते. जपानमध्ये सर्व नागरिकांना आरोग्य विमा काढणे बंधनकारक आहे. मात्र, खासगीरित्या विमा न काढू शकणारे नागरिक सरकारच्या आरोग्य विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे, स्थानिक सरकारांकडूनही स्थानिक पातळीवर विमा योजना उपलब्ध करून दिल्या जातात. रुग्ण आपल्या पसंतीनुसार रुग्णालय आणि त्यांच्या आवडीचे डॉक्टर निवडू शकतात. प्रत्येक नागरिकाला परवडण्यासाठी सरकार वैद्यकीय बिलावरही लक्ष ठेवते. रुग्णाला उत्पन्न, वयानुसार एकूण बिलापैकी दहा ते तीस टक्के बीलच भरावे लागते. उत्पन्न कमी असणाऱ्या रुग्णांना शासकीय अनुदानही दिले जाते. मात्र, विमा न उतरविलेल्या व्यक्तीला उपचाराचा संपूर्ण खर्च करावा लागतो. जपानचे तंत्रज्ञान प्रगत असल्याने आरोग्याच्या क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. रोबोटिक नर्सनंतर लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रुग्णालये सुरू करण्याची जपान सरकारची योजना आहे. त्यामुळेही, आरोग्याच्या क्षेत्रात आणखी क्रांती होण्याची शक्यता आहे.

चालण्याचा व्यायाम

आपल्यापैकी अनेकांना नियमित चालण्याचे फायदे माहित आहेत. अलीकडे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. विशेषत: हिवाळ्यात व्यायाम व मॉर्निंग वॉक करण्यावर भर दिला जातो. जपानी नागरिकांना एकाच जागी बसून राहणे आवडत नाही. ते दिवसभरात भरपूर चालतात. वृद्धांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण चालण्यावर भर देतात. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच इतर लोकही सायकल वापरतात. एवढेच नव्हे, तर रेल्वेमध्ये बसण्याऐवजी उभे राहायला पसंती दिली जाते.

हेही वाचा: ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?

जनुकांचा प्रभाव

जपानी नागरिकांच्या दीर्घायुषी होण्यात त्यांच्या जनुकांचे योगदानही मोठे आहे. विशेषत डीएनए५१७८ आणि एनडी२-२३७ ही जनुके जपानी नागरिकांमध्ये प्रामुख्याने आढळतात. या जनुकांमुळे मधुमेह, हदयरोग व इतर आजारांपासून रक्षण होण्यात मदत होते. अर्थात, ही जनुके वारसारूपाने मिळत असल्याने प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा मिळत नाही. त्यामुळे, केवळ जनुकांमुळे जपानी लोकांना दीर्घायुष्य मिळते, असे म्हणता येणार नाही. व्यक्तिमत्वाच बहिर्मुखता, प्रामाणिकपणा, मोकळेपणा आदी पैलूही महत्वाचे ठरतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. आरोग्याशी संबंधित समस्या तसेच दैनंदिन जीवनातील तणाव हाताळण्यासह वृद्धावस्थेतील समस्यांचा स्वीकार करण्यासाठीही व्यक्तिमत्वातील हे घटक महत्त्वाचे योगदान देतात. त्यामुळे, जपानी नागरिक यशस्वीपणे या सर्वांचा सामना करू शकतात, असाही संशोधकांचा दावा आहे.

सामाजिकतेचे योगदान

जपानी नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सामाजिकतेतही दडले आहे. विविध सामाजिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने आदींमध्ये जपानी नागरिक उत्साहाने सहभागी होतात. यामुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. विशेषत: निम्न आर्थिक स्तरातील तसेच ज्येष्ठ नागरिकांना समाजात मिसळण्याचा, बहिर्मुख वृत्तीचा फायदा होतो.

हेही वाचा: आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा

ओगिमी ः दीर्घायुषी लोकांचे गाव


जपानमधील ओकिनावा प्रांत दीर्घायुषी लोकांबद्दल प्रसिद्ध आहे. मात्र, या प्रांतातील ओगिमी हे गावही ‘दीर्घायुषी लोकांचे गाव’ म्हणून जपानमध्येच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या गावातील लोक भाज्या आणि फळांपासून बनविलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांवर भर देतात. खरे तर येथील लोकांना निवृत्ती हा प्रकारच माहित नाही. ज्येष्ठ मित्रमंडळींसोबत हास्यविनोद करणे, नृत्य, गायनासारखे छंद जोपासतात. आमच्या दीर्घायुष्याचे रहस्य निसर्गातच दडल्याचे येथील लोक सांगतात. गावकऱ्यांनी आपल्या या गावाला अभिमानाने ‘जपानमधील सर्वाधिक दीर्घायुषींचे गाव’ घोषित केले आहे. त्यांच्यामते खालील गोष्टी दीर्घायुष्याला कारणीभूत आहेत.
१. समुद्र, नद्या आणि पर्वताच्या सानिध्यातील शुद्ध हवा व पर्यावरण. जिथे हे गावकरी कोणत्याही ताणतणाव, घाईगडबडीशिवाय जगतात.
२. प्रथिनांनी समृद्ध असलेला आहार, मांस, हिरव्या पालेभाज्या, फळे घेतात.
३. गावातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वजण उत्साहाने सहभागी होतात.

इकिगाईचा मंत्र


जपानी नागरिक इकिगाईच्या आधारे जीवन जगतात. इकिगाईच्या आधारे जीवनात उद्देश शोधला जातो. अलीकडच्या काळात जगालाही हा मंत्र माहित झाला आहे. जपानी लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. सकस आहार, कुटुंब व मित्रपरिवाराबरोबर वेळ घालविणे व अनावश्यक ताणतणापासून दूर राहणे आदी गोष्टींमुळेही त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभते.

टॅग्स :JapanLifeJapanese