पालकांनो, मुले आळशी एकलकोंडी बनलीत, काय करावे? | Children's Health Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children's Health Tips in marathi}

पालकांनो, मुले आळशी एकलकोंडी बनलीत, काय करावे?

कोरोना रुग्णांची वाढती संख्या या धास्तीने आता पुन्हा लॉकडाउनच्या वळणावर आपण उभे आहोत. याची सुरूवात म्हणून शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना किती वाढतोय यावर निर्बंध आणि लॉकडाउनचा कालावधी ठरेल. सध्यातरी निर्बंधाचा पहिला फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांचा कालावधी सोडला तर मुले पुन्हा घरातच बसणार आहेत. शाळाच नसल्याने बौद्धिक व शारिरिक वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. मुले आळशी बनली आहेत. तसेच ती एकलकोंडी बनली आहेत. मग यावर उपाय आहेत का? हो आहेत.

गेल्या काही वर्षांत पती-पत्नी आणि एक अपत्य अशी संकल्पना रुजली आहे. अलीकडची पिढी तर याचे पक्के समर्थक आहेत. त्यामुळे आई-वडील कामावर आणि मुल शाळा व पाळणाघर असे चित्र सभोवती दिसत आहे. एकच अपत्य बास हा त्यांचा निर्णय का याविषयी मतमतांतरे असू शकतील. मात्र, एक निष्कर्ष असा आहे की, ही मुले एकलकोंडी बनतात. काही वर्षांपूर्वीचा काळ आठवून बघा. मामाचा गाव, शेती, सामुदायिक जेवणं, नदी-विहिरीत डुंबणं, सणासुदीत एकत्र येणं, अंगणातील-पारावरील गप्पागोष्टी, शाळेला एकत्र जाणं, आजी-आजोबांच्या मांडीवर बसून गोष्टी ऐकणे...संपून गेलं आहे. यातील काहीच राहिलं नाही. हेच सारं हरवलंपण मुलांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये उतरलं आहे. असंख्य घरात आईच्या हातचा स्वयंपाक होत नाही. ऑनलाइन फूड ऑर्डर हा स्टेट्स सिंबॉल बनला आहे. सगळे जीवनचक्र यंत्रवत बनले आहे. सकाळी उठल्यापासून सर्वजण आपापल्या कामात, एकमेकाशी कोणी बोलतच नाही. म्हटलं तर हाती भरपूर वेळ असतो, मात्र त्याचा वापर कसा करायचा हे कोणाला समजत नाही. कुटुंबातील संवाद संपला आहे. हाती सतत मोबाईल. त्यावरील गप्पा सर्व आभासी. सोशल मिडियावरील मित्रसंख्या हेच वास्तव मानून जगणं सुरू झालं आहे. सुट्टी असली तरी घरी एकमेकाशी काय बोलायचे ही समस्या लोकांना झाली आहे. एकूण काय तर कुटुंबेच विचित्र मानसिकतेत सापडली आहे. त्यात आता भर कोरोना संकटाची पडली आहे.

हेही वाचा: तुमचा पाल्य तुमचे ऐकत नाही, काय करावे?

गेल्या वर्षांची स्थिती पाहता लॉकडाउन कालावधीमुळे मुले व पालकही अधिक आळशी बनली आहेत. घराबाहेर पडू नको, कोरोना धरेल असा बागुलबुवा तयार झाल्याने मुले घरीच थांबली आणि नेमके शारिरिक, बौद्धिक वाढीच्या वयातच नुकसानीला सुरवात झाली. मुले मैदान विसरली, शाळेत जायला नको म्हणू लागली. सोसायटीच्या आवारात आणि गच्चीत मुले दिसतच नाहीत. मुले आळसाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. मात्र, पालकांनी आता मुळात स्वतःचा आळस झटकून मुलांना कार्यरत ठेवण्यासाठी उत्तेजन द्यायला हवे. कारण मुले अधिक आळशी की पालक हा वादाचाच विषय आहे. कारण ऑनलाईनचा विळखा पालकांना बसला आहे. सतत संगणक, लॅपटॉप, मोबाईलमध्ये डोके खुपसून ऑफिसचे काम ते बसलेले असतात. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, कामे सुटली आहेत, ही धास्ती त्यांना आहे. याच ताणातून मुलांकडे लक्ष देणार कोण. आणि विद्यार्थी वर्गही ऑनलाइन पध्दतीच्या अभ्यासाने वैतागले आहे. एकूण काय, तर पालक आणि मुलांचेही अनारोग्य वाढत आहे. असे असले तरी अंतिम जबाबदारी पालकांवरच येते.

हेही वाचा: मराठी डॉक्टरांच्या हातात वैद्यकीय पर्यटनाचे सुकाणू

आपली मुले हसतीखेळती राहण्यासाठी मुलांना स्वावलंबनाची सवय लावा. सकाळी लवकर उठवा. अंथरूण-पांघरूणाच्या घड्या घालणे, घरात येणाऱ्या वृत्तपत्राची सर्व पाने एकत्रित करून नीट ठेवणे, किराणा दुकानातून आणाव्या लागणाऱ्या साहित्यांची यादी तयार करणे, किरकोळ हिशोब वहीत नोंदी करणे, चहा-नाश्ता किंवा स्वयंपाकाच्या तयारीसाठी भाज्या वगैरे चिरणे, खिडक्या-दारे स्वच्छ करणे....अशी अनेक कामे त्यांना करायला उद्युक्त करा. लहान मुलांचे वय सतत काहीतरी शिकण्याचे असते. ऑनलाइन परदेशी भाषा शिकवणी वर्ग लावा. याशिवाय व्यायाम किंवा योगासन करण्यासाठी काही वेळ काढा. जेणेकरून तुम्हा सर्वांची शारीरिक लवचिकता आणि स्नायूंना शक्ती मिळेल. तसेच सतत मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याच्या सवयीतून ती बाहेर येतील. तसेच अधिक उत्साहाने कामे करू लागतील.

शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग आहेत. जी मुले आधीच कमी बोलतात किंवा फार कोणात मिसळत नाहीत, त्यांच्याशी संवाद किंवा चर्चा करून त्यांच्या मनातील समस्यांना समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. शिक्षकांशी किंवा मित्रांशी समोरासमोर भेटता येत नसल्याने चिंताग्रस्त असतात. पालकांनी घरातील वातावरण प्रेरणादायी ठेवण्याची आवश्यकता आहे. मुलांशी खुलेपणाने खुलेपणाने संवाद करणे शिकायला पाहिजे. मुलांची आवड, त्यांचे विचार, त्यांची स्वप्ने ओळखून आत्मनिर्भर केले पाहिजे.

हेही वाचा: दीर्घायुषी व्हायचयं, जपानी नागरिकांचं अनुकरण करा!

पूर्वीच्या काळात लठ्ठपणा समृद्धीचे लक्षण मानले जात होते. मात्र, सध्याच्या काळात मध्यमवर्गीय लोकांमध्ये लहान मुळे लठ्ठ झालेली दिसतात. बहुसंख्य पालकांना आपल्या मुलांच्या ज्ञान नसते. ते त्याला सुदृढता समजत राहतात. मात्र, अशा घरी फास्ट फूड, जंक फूड तसेच सतत हॉटेलिंगची सवय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते आधी बंद करून घरीच जेवण बनवायला पसंती द्यायला हवी. मुलांना आपल्या सोबत फिरायला न्या, त्यांना सायकल चालवायला, पोहायला उत्तेजन द्या, घरकामाच्या मदतीला घ्या. जेणेकरून सर्व सांध्यांना हालचाल होऊन आपोआप व्यायाम होईल. तसेच त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकात त्यांच्याच सहकार्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या वेळेचा सदुपयोग होईल.

मुलांना शारिरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया समजावून द्यायला पाहिजे. या क्रियेला व्यायाम म्हणतात.

हेही वाचा: Corona Virus : मास्कपासून मुक्ती कधी?

व्यायामाचे प्रकार असे

  • ताणणे : योगासने, सूर्यनमस्कार

  • रक्ताभिसरण : चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, नृत्य, जॉगिंग

  • शक्ती : वजन उचलणे

  • श्वसन : प्राणायाम

फायदे

  • वजन नियंत्रित करता येते

  • शारीरिक क्षमता वाढते

  • निराशा कमी होवुन प्रसन्नता वाढते

  • स्नायू मजबूत होतात

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हेही वाचा: केस कापल्यावर रक्त का येत नाही? घामाला दुर्गंध कसा येतो?

लठ्ठता घालविण्यासाठी – ताडासन

सरळ उभे रहा. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवा, हात सरळ कमरेला राहून उभे रहा, नंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणा, हातांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळपायावर उभे रहा, नंतर हाताच्या पंजांना विरुद्ध दिशेने नेवून मान सरळ ठेवून पूर्वीसारखे उभे रहा.

फायदा- छाती व पोट याच्यावर ताण पडल्याने लठ्ठपणा कमी होतो.

पोटाची चरबी कमी होण्यासाठी- भुजंगासन

आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे, हनुवटी फरशीवर ठेवावी, दोन्ही हात खांद्यापासून जमिनीवर सरळ ठेवावे, कमरेपासून वरचा भाग म्हणजे छाती पोट शक्य तितके वर उचलावे आणि वर आकाशाकडे बघावे.

फायदा – पाठ, पोट. कंबर यांची चरबी कमी होते.

ही दोन्ही आसने मुलांसोबत आईवडिलांनीही करावी. शेवटी शवासनात विश्रांती घ्यावी. डोळे बंद करावेत. केवळ शांतपणे श्वसन होवू द्यावे. मनाला शांती मिळते. आपणही स्वस्थ रहा, मुलांनाही स्वस्थ ठेवा.

पाठ बळकट होण्यासाठी- नौकासन

पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर ठेवावी, दोन्ही हात सरळ मांड्याजवळ ठेवावे. पायाचे अंगठे व टाचा चिकटून ठेवाव्यात, पायाच्या बोटांची नखे जमिनीवर ठेवावी, दोन्ही हात डोक्यावर सरळ न्यावे, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवावे, श्वास सोडावा, श्वास घेत घेत पुढचे हात आणि मान व पाय सरळ ठेवून सावकाश वर उचलावे. काही सेकंद असेच राहावे. आसन सोडताना श्वास सोडत सावकाश खांदे, हात-पाय जमिनीवर टेकवावे, थोडावेळ ध्यान करावे, गरम पाणी प्यावे, प्राणायाम करावा, सर्वांना सुखकारक आहे, पालकांनी लहान मुलांना आसन आणि व्यायाम समजावून दिले पाहिजेत.

हेही वाचा: सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान!

हात पाय घट्ट रचनेच्या मांस, चरबी, हाडांनी बनलेले आहेत. हातापायांनी केलेल्या हालचालींना व्यायाम म्हणतात. धडामध्ये फुफ्फुसाचे फुगे, आतड्याच्या नळ्या, पोटाची पिशवी अशा पोकळ रचना आहेत. हातापायाची कामे बंद पड्यास शरिराची कामे फारशी बिघडत नाहीत. मात्र, फुफ्फुस, हृदय, पोट यांच्या नळ्यांमधील कार्य बिघडल्याने आजारपण येते. म्हणूनच आरोग्य सांभाळायचे असेल तर धडामध्ये असणाऱ्या फुगे, नळ्या, पिशव्या सारख्या अवयवाचे काम हातापायापेक्षा अधिक नीटपणे चालविले पाहिजे. त्यामुळे आरोग्य सांभाळण्यासाठी आसनाचे महत्व आहे. ते तुम्ही मुलांना अधिकाधिक शिकवायला पाहिजे. व्यायामात किंवा खेळात आपण हातापायाला जास्त राबवतो, तर आसनाने पोट, फुफ्फुस, हृदय व आतडे यांना कार्यरत ठेवतो. पालकांना शिकविणे आणि मुलांनी शिकणे अशा दैनंदिन कार्यक्रमात हा कालावधी मजेत पार पडेल. लॉकडाउन काळात पालकांनी मुलांच्या सर्वांगीण समृद्धीसाठी मॉडेल व्हायला पाहिजे. आपल्या वागण्याचा आणि स्वभावाचा मुलांवर सकारात्मक प्रभाव पडला पाहिजे. आई-वडील आपल्यासाठी किती परिश्रम करतात हे मुलांच्या लक्षात यायला हवे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Parentschildren