
कोरोनामुळे मुले दीड वर्षापासून घरीच आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा
लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे ही फुलं टवटवीत राहण्यासाठी पालकांबरोबरच शिक्षक व समाजाची जबाबदारी असते. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी काय करता येईल, याबाबत ज्येष्ठ बालसाहित्यकार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनंत भावे व राजीव तांबे यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. मुलांसंदर्भात शिक्षकांची भूमिका कशी असावी, याबाबत शिक्षक व बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड व ज्योती कपिले यांनी काही सूचना केल्या आहेत. पाचवीतील ईश्वरी निकम या चुणचुणीत मुलीने विविध क्षेत्रात घेत असलेल्या भरारीबाबत संवाद साधला आहे.
रिॲलिटी शोजमध्ये कविता म्हणाव्या
अनंत भावे : मुलांनी खूप वाचायला हवं. मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अन्य प्रादेशिक भाषेतील अनुवादित पुस्तके वाचली पाहिजेत. पालकांनी मुलांचा विकास कसा होतो, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचा आनंद त्यांनी लुटला पाहिजे. पालकांनी सातत्याने प्रयोगशील असले पाहिजे. कोरोनामुळे मुले दीड वर्षापासून घरीच आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. मुले एकलकोंडी व चिडचिडी बनण्याची शक्यता असते. या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मुलांबरोबर संवाद साधायला हवा. मुलांना एकत्रित करून पालकांनी गोष्टी सांगायला हव्यात.
हेही वाचा: काय सुरु आहे पुणे महापालिकेत?
पालकांना जर गोष्टी सांगायला जमत नसेल तर त्यांनी अशा गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केलं पाहिजे. मुलं काय काय वाचतात, यावरही पालकांनी बारीक लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही पिढीतील मुलांमधील आवडी- निवडी या समान असतात. त्यांना अद्भुततेचं वेड असतं. त्याचा शोध घेऊन, त्यांचा मानसिक विकास होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना शब्दांशी खेळायला फार आवडतं. ही आवड त्यांची वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वेगवेगळ्या रिॲलिटी शोमध्ये त्यांच्याकडून विशिष्ट गाणी म्हणून घेतली जातात वा त्याच त्या गाण्यांवर त्यांना नृत्य करायला भाग पाडले जाते. त्याऐवजी मराठीत अनेक सुंदर गाणी आहेत. त्यांना चाली लावून, ती त्यांच्याकडून गाऊन घेतली पाहिजेत. हा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा. मुलांचे संवादकौशल्य वाढायला हवं. यासाठी त्यांच्याकडून संवादकौशल्यातून गोष्ट पुढे नेली पाहिजे. गोष्ट सांगताना त्यात रंजकता कशी आणता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
मुलांची जिज्ञासा जागृत ठेवा
राजीव तांबे : आयुष्यभर मूलकेंद्रित विचार करण्याची आपल्याला सवय लावावी लागेल. लहान मुलांचा कल ओळखून, त्यांना आवडेल ते करू देण्याची संधी म्हणजे मूलकेंद्रीत विचार करणे होय. चित्रकला, लेखन, क्रीडा, वक्तृत्व स्पर्धा, लेखन यात ज्या मुलांना रस आहे, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलांचा कल ओळखून, विविध संधी उपलब्ध करून देणं, हे पालकांचे पहिलं काम आहे. आपण मुलांवर विश्वास ठेवत नाही, ही फार गंभीर बाब आहे. मुलांना सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. त्याची उत्तरे जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये असते. त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे. हल्ली आपण पालक शिक्षक संघटना पाहतो. पण त्यामध्ये नेमकं मुलांना डावलले जाते. वास्तविक पालक-शिक्षक-विद्यार्थी असा त्रिकोण असायला हवा. पण मुलांना नेहमी गृहित धरले जाते, ते नकोय. मुलांची बाजू ऐकून घेण्यासाठी प्रत्येक शाळेत तक्रारपेटी हवी व तक्रार करणाऱ्या मुलाचे नाव गोपनीय राहील, याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यायला हवी. तसेच तक्रारदाराचे नाव नसले तरी चालेल, अशी मुभाही हवी आहे.
काळानुसार मुलं बदलत आहेत पण पालक मात्र बदलायला तयार नाहीत. सुविचारापासून चांगल्या कर्मापर्यंतचा प्रवास झाला पाहिजे. पालकांना मुलांचे प्रश्न समजत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. तो त्यांनी समजून घेतला पाहिजे. सध्याची मुलं खूप फॉरवर्ड आहेत. त्यांना संगणकापासून मोबाईलमधील विविध फीचर सहज हाताळता येते, असं कौतुक पालक करतात. मात्र, हे करताना ‘आपल्याला बुवा अजून जमत नाही,’ असं सांगून आपल्यातील आळशीपणा व अज्ञानपणा दाखवण्याची घाई करतात. वास्तविक मुलांबरोबरच त्यांनी या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. मुलांना काय चांगलं काय वाईट याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे.
हेही वाचा: लॉकडाउनला करुयात नॉकडाउन
मुलातलं मूलपण जपताना…!
लहान मुला- मुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे, हा विचार मनाच्या मुळाशी कायम असावा. आपणांपैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबत पुढे आले पाहिजे, याचेही नित्य स्मरण मनाशी असावे आणि वेळप्रसंगी आपल्या कृतीतून ते झिरपताना दिसावे.
खरंतर, मुलांच्या उत्तम संगोपनाचं पहिलं केंद्र जर कोणतं असेल तर ते असतं त्याचं घर. घरातील सर्व नातेवाईक जेव्हा घरातल्या मुलाचे पालक कमी आणि मित्र अधिक होतात, तेव्हा मुलाच्या शारीरिक वाढीबरोबरच त्याच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासालाही छान सुरवात होत असते. लहान मुलं ही अतिशय अनुकरणप्रिय असतात. मोठ्याचं अनुकरण ती सहजगत्या करतात. म्हणूनच घरातली मोठी मंडळी पुस्तकं वाचताना दिसली की मुलंही सुरवातीला कुतूहलाने पुस्तक हातात घेतात आणि मग एकदा का त्यांना वाचनाची गोडी लागली की पुस्तकंही त्यांचे मग चांगले मित्र होऊन जातात.
आज मुलांना खरी गरज आहे मुक्त संवादाची. अस्सल विरंगुळ्याची. आज त्यांच्याशी गप्पा मारायला, हितगूज करायला अनेक पालकांकडे पुरेसा वेळच नसतो. बाकी काहीही मागा पण वेळ मागू नका, असंही मुलांना सांगणारे पालक जेव्हा भेटतात, तेव्हा खरंच वाईट वाटते. ‘आपल्यासाठी कुणाकडेच वेळ नाही; आपण तेवढे महत्त्वाचे नाही….’अशी नकारात्मक भावना जेव्हा मुलांची वाढीस लागते. तेव्हा अशी मुलं अबोल, एकलकोंडी होतात. वेळ घालवण्यासाठी नवीन साधनांचा ती शोध घेतात आणि मग त्यातच तासन् तास ती रमून जातात. खेळणी, व्हिडिओ गेम यात ती अडकून पडतात. मैदानावर खेळायला जायचं सोडून मोबाइलवरच ते तहानभूक विसरून खेळत बसतात. घरातला सात्त्विक, चौरस आहार न घेता पिझ्झा, बर्गर, चायनीज पोटात ढकलतात. यातून जर मार्ग काढायचा असेल तर पालकांचा अधिकाधिक मुलांशी सहज संवाद घडायला हवा. कारण हा संवाद मुलांच्या मनाला जोडणारा पूल ठरु शकतो.
आणखी एका गोष्टीची आज जास्त गरज आहे ती म्हणजे मुलांना समजून घेण्याची. त्यांचं मन जाणून घेण्याची. अनेकदा लहान मुलांना गृहीत धरलं जातं. त्यांच्या मतांना घरात फारशी किंमत नसते. वारंवार त्यांना गप्प बसवलं जातं. तुला काय कळतंय? त्यांच्या कानीकपाळी असं बोललं जातं. यातून मुलं नाउमेद होतात. आत्मविश्वास हरवून बसतात. त्यामुळं मुलातलं मूलपण हरवून देऊ नका. ते मूलपण कोमेजणार नाही याची काळजी आपण सारेच घेऊया. म्हणतात ना, मुलं पुस्तकांकडे येत नसतील तर पुस्तकं मुलांकडे नेली पाहिजे. तसेच मुलांना जर योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाले तर ती भविष्यात नक्कीच आदर्श नागरिक होऊ शकतील, या विचाराने आपणच मुलांसाठी काही योजना आखूया. त्या योजना कागदावरच न राहता वर्षभर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.
हेही वाचा: संघटीत अर्थव्यवस्था : पारंपरिक चष्मा का बदलावा लागेल?
जीवनाचा मनोसक्त आनंद लुटावा
ज्योती कपिले : मोठ्यांप्रमाणे बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि ह्या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे उद्याचे नागरिक तयार होणार आहेत. तेव्हा नेहमीच मुला- मुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालकांच्या मागण्या, गरजांचा पाठपुरावा झाला पाहिजे. मुलांना निर्भयतेने जगता यावं, असं वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं मूल हे चाकोरीबाहेर जीवन जगू इच्छित असेल तर त्याला पालकांनी, शिक्षकांनी सहकार्य केलं पाहिजे. माझ्यापरीने मी व माझे सहकारी ज्योत नावाचे ई मासिक काढतो आहे. मोठ्यांबरोबर त्याचे दिवाळी, सुट्टी आणि बालदिन विशेषांक काढून मुलांना विविधांगी साहित्य देण्याचा प्रयत्न करतो. ह्यावेळी 'ज्योत' या ई मासिकाने 'निसर्ग माझा सखा' या विषयाला समर्पित खास अंक तयार केलेला आहे. यात विविध मान्यवरांनी खास बालवाचकांसाठी, निसर्गाचे संवर्धन व्हावे, अनेक निसर्गरंग जाणवावेत म्हणून साहित्य पाठवलेलं आहे. मागच्या वर्षी 'ज्योत'चा बोलका अंक काढला होता. असे अंक समाजातील दिव्यांगांसाठी खूपच उपयुक्त ठरतात. मुलांनी भरपूर खेळावं, मनोसक्त फिरावं आणि भरपूर वाचावंही. हे करत असतानाच आपली काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जबाबदारीनेही वागलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे कागद पेन जवळ करा, लिहिते व्हा, व्यक्त व्हा आणि हे जग सुंदर आहेच पण ते तुमच्या सहभागामुळे अजून सुंदर करा.
अनाथाश्रमात आनंदोत्सव
मी वर्षभर मित्र- मैत्रिणीसमवेत धमाल करते. दरवर्षी मी वाढदिवस अनाथाश्रमात साजरी करत असते. त्याचबरोबर चौकात भीक मागणाऱ्या मुलांची मला खूप काळजी वाटते. त्यांना मी नियमितपणे खाऊवाटप करते. मला पुस्तक वाचनांबरोबरच नाट्यछटा व भाषण करण्याची खूप आवड आहे. दिवाकरांच्या नाट्यछटांची मला खूप आवड आहे. अनेक नाट्यछटा माझ्या तोंडपाठ आहेत. अनेक स्पर्धामध्ये मी भाग घेऊन बक्षिसे पटकावली आहेत. माझ्या आवडीची गोष्टींची पुस्तके मला आई- बाबा आणून देतात. मी सगळी वाचून काढते व त्यातील गोष्टी मित्रमंडळींना सांगते. छोटी छोटी मुले वेडी झाल्याचं पाहून मला खूप वाईट वाटतं. मोठ्यापणी मी अशा मुलांना बरे करण्यासाठी डॉक्टर होणार आहे.
- ईश्वरी नामदेव निकम (विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, पिंपरी, इयत्ता : पाचवी)
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”