Mental Health: का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विचारांचे नियम आणि वास्तविक भान !}
जाणून घ्या संयमी जीवनशैलीसाठी काय करायला हवं ते....

का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

आज विचारांच्या नियमांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्याला वास्तविकतेचे भान असले पाहिजे. आज जगामध्ये विचारांच्या सिद्धांतावर, मनाच्या शक्तीवर अनेक पुस्तके निघालेली आहेत. जगात अनेक मोठे मोठे वर्कशॉप यावर होताना आपल्याला दिसून येतात. अशा पुस्तकातून आणि वर्कशॉप मधून खूप खूप मोठी स्वप्ने दाखविली जातात...जाणून घ्या या विषयी

एक दोन अपवाद वगळता दाखविलेली स्वप्न (Dreams) आणि क्षमता (Capacity) यामध्ये खूप तफावत असते. त्यामुळेच काही व्यक्ती विचारांच्या नियमांना स्वप्नाळूपणा आणि आभासी विश्व समजतात. विचारांचे नियम आदर्शवादी आणि खूप स्वप्नाळू असतात परंतु प्रत्यक्ष जीवन, जीवनातील संघर्ष, यशापयश हे पूर्ण वेगळे असते. अशा प्रकारे विचारांच्या नियमावर काहीजण टीका करतात किंवा विचारांच्या नियमाकडे दुर्लक्ष करतात. त्यांचेही काही चुकत नाही. नुसती स्वप्ने पाहणे, मोठया विचारात अडकून राहणे, मोठया गप्पा मारणे आणि त्याला प्रत्नांची सांगड नसणे म्हणजे म्हणजे स्वतःला स्वतः धोका देणे असेच होय. (Sakal Premium Story about Balanced Mindset)

सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर अशोक सोनवणे यांनी त्यांच्या ऑनलाइन वर्कशॉपमध्ये सांगितले की, ‘‘आपल्या देशाचे मिसाईल मॅन, आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. A P J Abdul Kalam) म्हणतात, “रात्री पाहिली जातात ती स्वप्ने नव्हे तर दिवसा पाहिलेली, आपल्याला झोपू न देणारी स्वप्ने ही खरी स्वप्ने असतात.” हाच खरा विचारांचा सिद्धांत होय.

वास्तविक स्वप्नाशिवाय जीवनाला(Life) अर्थ नाही. आपली स्वप्न आपल्या जीवनाला दिशा देत असतात. अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा निर्माण करीत असतात. कोणतीच व्यक्ती अपघाताने मोठी होत नाही. त्याच्यामागे त्यांच्या विचारांची साथ असतेच. जगातील सगळीच संशोधन ही याच स्वप्नातून साकार झालेली आहेत. विजेचा बल्प असो की, मोबाईलचा (Mobile) शोध असो की अणुबॉम्ब असो, शास्त्रज्ञांनी स्वप्न पाहिली त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली त्यामुळेच विविध शोध लागले.

क्षमता आणि मर्यादांचा विचार हवा...

आपल्या विचाराच्या नियमांना आपल्या क्षमतेचे आपल्या प्रयत्नाचे, वास्तविकतेचे भान असावे. चिमणीने घारीची, हरणाने वाघाची बरोबरी करून चालेल का? प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता आणि मर्यादा निश्चित असतात. आपण विचारांचे नियम जीवनामध्ये अवलंबताना आपल्यामधील क्षमतांचा आणि मर्यादेचा विचार केलाच पाहिजे म्हणजे अपयश हे आपल्याला कधीच येणार नाही.

राजकारणी, सेलेब्रेटी, उद्योगपती किंवा यशस्वी व्यक्ती यांचे विचार खूप प्रेरणादायी असतात. परंतु त्यासोबत त्यांचा संघर्ष सुद्धा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेरणादायी असतो. आपण वाचन करीत असताना, त्यांच्याबद्दल माहिती करून घेताना त्यांच्या विचारांची, त्यांच्या सवयींची माहिती करून घेतो. परंतु त्यांचा संघर्ष, त्यांचे प्रयत्न, त्यांची चिकाटी, त्यांचे सातत्य याकडे मात्र दुर्लक्ष करतो.

आपण सुद्धा जेव्हा विचारांच्या नियमांचा उपयोग आपल्या जीवनात करण्यास सुरुवात करतो तेव्हा फक्त स्वप्नात किंवा आभासी जीवनात अडकून न राहता आपल्या क्षमता आणि आपल्या मर्यादांचा विचार करून त्यापेक्षा अधिक प्रयत्न करण्यासाठी तत्पर असले पाहिजे. तेव्हाच विचारांचे नियम आपल्या जीवनात प्रत्यक्षात उतरतात. त्यासाठी मेंदूविज्ञान व मानसशास्त्र याचा अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे.

समुपदेशनाची गरज आणि महत्व

अगदी सहा महिन्याचे बाळ सुद्धा आपल्या नैसर्गिक मनमोहक हालचाली करून जवळच्या व्यक्तीचे मन आपल्याकडे आकर्षित करते, वाढत्या वयानुसार कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्याला जवळ घ्यावे, आपल्यावर खूप प्रेम करावे, आपल्यासोबत खूप गप्पा माराव्यात, आपल्यासोबत भरपूर खेळावे अशी अपेक्षा ठेवते, दोन वर्षाच्या मुलाची याच अपेक्षेतून सतत बडबड सुरूच असते. पुढे शाळेत जायला सुरुवात झाली की कितीतरी गोष्टीची खटाटोप सुरु असते, किशोरावस्थेत मित्र, शिक्षक, कुटुंब यांच्याकडून अपेक्षा या असतातच.

परंतु या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर मुल चिडचिड करते, रडके बनते, आक्रमक किंवा भावनिक होते, कुठेतरी स्वतःला कुटुंब, शाळा आणि मित्र यांच्याकडून आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचे वाटते. मग त्याच्यामध्ये एकटेपणाची आणि असुरक्षिततेची भावना तयार होते. साहजिकच अशा मानसिकतेचा परिणाम त्याच्या मेंदूवर होतो. मेंदूच्या कार्यपद्धतीत हळूहळू अडथळा निर्माण होतो, मेंदूतून स्त्रावणाऱ्या जैवरसायनांचा समतोल बिघडतो. येथूनच त्याच्या व्यक्तिमत्वाला चुकीच्या सवयी लागण्याची सुरुवात होते.

आपल्यावर इतरांनी रागावणे, चिडचिड करणे, टोमणे मारणे, अपमानित करणे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, भीती दाखविणे, शिक्षा करणे हे कोणालाच आवडत नाही. मग मुलांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुटुंब आणि शाळा येथे सतत रागावणे, चिडचिड करणे, टोमणे मारणे, अपमानित करणे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, भीती दाखविणे, शिक्षा करणे असेच होत असेल तर याचा परिणाम सुद्धा मुलांच्या मेंदूवर होतो.

मुलांच्या मेंदूच्या खालच्या भागात असलेला भावनिक भाग (एमिग्डला) सतत कार्यन्वित होतो. याउलट मेंदूच्या वरच्या भागात कॉर्टेक्स एरिया मध्ये असलेल्या उच्च बौद्धिक भागात पुरेशा प्रमाणात ग्लुकोज आणि ऑक्सिजन पोहचू शकत नाही, त्याचा परिणाम मुलांच्या मेंदूतील न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्यावर होतो. म्हणजेच याचा परिणाम मुलांच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा पडतो.

मुलांच्या मेंदूचा भावनिक भाग (एमिग्डला) सतत अॅक्टिव्ह राहिला तर मुलांची समजून घेणे, लक्षात ठेवणे, आठवणे, अचूकता, वैचारिक आणि निर्णयक्षमता, समयसूचकता ही बौद्धिक कौशल्य कमी होतात. तर याउलट आळस, दुर्लक्ष, खोडया करणे, नको त्या गोष्टी करणे, अशा विविध कृती सुरु होतात. यामुळे हळूहळू अशा मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत जाते.

मुलांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची सुरुवात त्याच्या सभोवताली असलेल्या कौटुंबिक, शेजारील, शाळेतील वातवरणातून झालेली असते. म्हणूनच अशावेळी बालक आणि पालक सर्वांनाच समुपदेशन घेण्याची आवशकता असते. प्रशिक्षित आणि कौशल्य असलेला समुपदेशक अशा मानसिकतेतून काही उपचारात्मक पद्धतीच्या साह्याने मुलांना अशा मानसिकतेतून सहज बाहेर काढू शकतो.

मानवाच्या भौतिक प्रगती सोबत शरीरिक आणि मानसिक अधोगती झालेली आहे. त्याला अनेक कारणे असतील, परंतु वारंवार येणारे साथीचे आजार, बदलत्या वातावरणामुळे येणारे आजार आणि आपले शरिरिक आरोग्य ही प्रत्येक कुटुंबासमोर उभी असलेली समस्या आहे. मग कौटुंबिक आरोग्य उच्चं दर्जाचे टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कौटुंबिक कौन्सलरची गरज आहे का?

वाढत्या स्पर्धेत टिकून राहतांना, जीवन जगताना, कुटुंब म्हणून लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत काही घटना पॉझिटिव्ह घडतात तर काही निगेटिव्ह घडतात. पण घटनांचा आणी परिस्थितीचा परिणाम कौटुंबिक मानसिक आरोग्यावर पडतो. यामुळे कुटुंबात विसंवाद, चिडचिड, संघर्ष निर्माण होऊन मानसिकता बिघडत जाते. तर परिस्थितीचा परिणाम सुद्धा प्रत्येक व्यक्तीवर पडतच असतो.

आपण, आपली मुल, आपले कुटुंब खरंच ताण-तणावात आहे का? मानसिक संतुलन बिघडतं तर नाही ना? त्रास, संघर्ष, अपयश, दुःख, नैराश्य, चिडचिड, आक्रमकता, भावनिकता वाढत तर नाही ना? असे प्रश्न स्वतःला पडले पाहिजेत.

या सर्व परिस्थितीवर मात सहज करून आनंदी सुखी आणि प्रगतिशील जीवन जगता आले पाहिजे यासाठी मेंदूविज्ञान आणि माणसाशास्त्र याचे किमान नॉलेज एक कुटुंबप्रमुख म्हणून असले पाहिजे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”