मायावतींचा प्रवास ‘दलित की बेटी’ ते ‘दौलत की बेटी’ ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 मायावतींचा प्रवास ‘दलित की बेटी’ ते ‘दौलत की बेटी' ...}
मायावतींचा प्रवास ‘दलित की बेटी’ ते ‘दौलत की बेटी' ...

मायावतींचा प्रवास ‘दलित की बेटी’ ते ‘दौलत की बेटी' ...

स्वरुप जानकर

देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हिंदुत्ववादी राजकारणाची जबरदस्त लाट असतानाही उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळवता आली नव्हती. त्याचे प्रमुख कारण होते ‘मुलायम- कांशीराम’ फॉर्म्युला. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुलायमसिंह यांनी नव्याने स्थापन केलेल्या समाजवादी पक्षाशी कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने युती केली होती. भाजपला रोखण्यासाठी त्यावेळी ‘मिले मुलायम- कांशीराम, हवा हो गये जय श्रीराम’ अशी घोषणा देण्यात आली होती. त्याप्रमाणे घडलेदेखील. भाजप सत्तेपासून दूर राहिला आणि सप- बसप युतीला सत्ता मिळाली. त्यानंतर आता २९ वर्षांनी भाजपला अपेक्षित असलेल्या हिंदुत्ववादी राजकारणाने उत्तर प्रदेशवर पुन्हा पोलादी पकड घेतली असून गेली ३०-३२ वर्षे निर्णायक ठरलेल्या बहुजन समाज पक्षावरच ‘हवा होण्याची’ वेळ आली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निकालानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या मायावती यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९९५ ते २००३ या कालखंडात मायावती काही महिन्यांसाठी तीनवेळा मुख्यमंत्री बनल्या. २००७ ला त्यांना पूर्ण बहुमत मिळाले. मात्र त्यांची सत्ता गेल्यानंतर बसपची वेगाने वाताहत सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत सदस्य निवडून गेलेल्या पक्षांच्या यादीत बसपला सर्वांत शेवटचे स्थान आहे. मायावती यांच्या तुलनेत नवख्या आणि छोट्या असलेल्या नेत्यांनी आघाडीची गणिते करून आपले आमदार निवडून आणले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या एनडीएला २७३ जागा मिळाल्या आहेत. त्यात एकट्या भाजपच्या २५५ आहेत. अपना दल (सोनेलाल) १२ आणि निषाद पार्टीचे ६ असे १८ आमदार भाजपच्या मित्रपक्षांचे निवडून आलेले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने १२५ जागा जिंकल्या आहेत. त्यात समाजवादी पक्षाच्या १११, राष्ट्रीय लोक दलाच्या ८ आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या ६ जागा आहेत. काँग्रेस पक्ष आणि राजा भैय्यांच्या जनसत्ता दल (लोकतांत्रिक) यांना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर नवव्या आणि शेवटच्या स्थानावर बसप आहे. बलिया जिल्ह्यातून उमाशंकर सिंह हे बसपचे एकमेव आमदार निवडून आले आहेत.

उत्तर प्रदेशातील मतदान होण्याच्या आधीपासून बसप संपूर्ण ताकदीनिशी लढत नसल्याचे, तसेच भाजपला जिंकवण्यासाठीच मैदानात असल्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. पक्षप्रमुख मायावती या सुरूवातीच्या टप्प्यांत प्रचाराला बाहेरही पडत नव्हत्या. बसपा केडरबेस असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात येत होती. शेवटी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी थेट नाव घेऊन मायावतींवर हल्लाबोल केला, मग उर्वरित दोन टप्प्यांत मायावतींनी काही सभा घेतल्या. त्या सभांतूनही काँग्रेसवर टीका केली आणि मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपला सोईस्कर बगल दिली. दुसऱ्या बाजूने भाजपने मायावतींचे महत्त्व अधोरेखित करणारी विधाने केली. प्रत्यक्षात भाजपला अपेक्षित निकाल लागला. समाजवादी पक्षप्रणीत आघाडीचा मोठ्या फरकाने पराभव झाला. भाजपच्या मनासारखे घडले, तसे काही प्रमाणात मायावतींच्यादेखील.

दीड दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने बसपचे उमेदवार ईर्षेने पराभूत केले तेव्हा मायावतींनी भाजप आला तरी चालेल, पण समाजवादी नको, अशी जाहीर भूमिका मांडली होती. यापार्श्वभूमीवर विचार केला तर मायावती समाजवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत, असे म्हणता येईल. यात बसपची १० टक्के मते घटली आहेत. त्यातील बहुतांश समाजवादी पक्षाने खेचली आहेत. असे असलेतरी मायावती यांनी पुरेशी ताकद न लावताही १२.८८ टक्के मतदान बसपच्या हत्तीला मिळालेले आहे, हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. फक्त एक जागा आली असली तरी सुमारे एक कोटी मते बसपने घेतलेली आहेत. समाजवादी आणि बसप एकत्रित आले तरच भाजपला पराभूत करण्याचा फॉर्म्युला तयार होऊ शकतो, असा संदेशही या निकालाने दिला आहे.

हेही वाचा: योगींनी पारंपरिक राजकारणाला छेद दिला.

देशातील पहिल्या दलित मुख्यमंत्री म्हणून मायावती यांनी स्वतःचे वेगळे वलय नर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर त्या पंतप्रधान होतील, अशी आस त्यांचे समर्थक बाळगून होते. २००९ ला उत्तर प्रदेशात बसपचे मोठ्या संख्येने खासदार निवडून येतील, अशी हवा होती. मात्र त्या पद्धतीचे यश बसपला मिळाले नाही. उत्तर प्रदेशात २० आणि मध्य प्रदेशात १ जागा मिळाली. २०१४ च्या मोदी लाटेत बसप थेट शून्यावर आल्या. २०१९ च्या लोकसभेवेळी उत्तर प्रदेशात सप- बसप आघाडी झाली. त्याचा फायदा होऊन बसपचे १० खासदार निवडून आले, मात्र निवडणुकीनंतर ही आघाडी तुटली. आता उत्तर प्रदेशात १० खासदार आणि १ आमदार अशी बसपची परिस्थिती आहे. यापार्श्वभुमीवर बसपच्या अवनतीला स्वतः मायावतीच जबाबदार असल्याची टीका आता जाहीरपणे होऊ लागली आहे. बसप संस्थापक कांशीराम यांच्या तालमीत तयार झालेले अनेक नेते मायावतींवर तोंडसुख घेत आहेत. मायावती या बहुजन सोडून सर्वजण संकल्पनेसोबत गेल्याने, तसेच त्यांनी स्वतःचे भक्त तयार केल्याने ही गत झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मायावतींनी सत्तेच्या माध्यमातून संपत्ती कमावली, तसेच तिकीट विक्रीतूनही माया कमावल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.यासंदर्भाने त्यांच्या भावावर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली. हे प्रकरण मिटविण्यासाठी मायावती या भाजपला मॅनेज होऊन काम करीत असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. पंतप्रधान असतानाही मोदी उत्तर प्रदेशात मुक्कामास राहिले, पराभव समोर दिसत असतानाही प्रियांका गांधी लढल्या, अखिलेश यादव यांनी सहकारी पक्षांची मोट बांधून सत्ता बदलाचे वारे तयार केले,त्यातुलनेत मायावती स्वतःच्या पक्ष जिंकावा म्हणून घराच्या बाहेरही ताकदीने पडल्या नाहीत, या बाबी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ठळकपण जाणवल्या. त्यामुळे मायावतीच हवेत विरल्यासारखे परिस्थिती झाली आहे. सद्यःस्थितीत मायावतींचे महत्त्व कमालीचे घटलेले आहे.

हेही वाचा: सोन्यात गुंतवणूक करावी काय?

मायावतींवर टीकाटिप्पणी होत असताना बसपचे संस्थापक कांशीराम व त्यांनी चालविलेल्या बहुजन चळवळीवर भरभरून बोलले जात आहे. कांशीराम हे १९६० च्या दशकात नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना त्यांचा आंबेडकर विचारधारेशी संबंध आला. त्यातून कांशीराम यांनी बहुजन समाजाची चळवळ सुरू केली. अगोदर बामसेफ, डीएसफोर या संघटनांची बांधणी केल्यानंतर १९८४ ला आंबेडकर जयंतीदिवशी दिल्लीत बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाचे ४ खासदार निवडून आले. त्यातील ३ उत्तर प्रदेशातील होते तर १ पंजाबमधून आला होता. १९९८ ला वाजपेयी सरकार एका मताने पडले, ती किमयाही बसपने केली होती. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेशातून बसपाचे खासदार निवडून आले तर उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश, पंजाब बरोबरच जम्मू काश्मीर, बिहार, राजस्थानमधून बसपचे आमदार निवडून आले. कांशीराम यांनी बांधलेले संघटन आणि देशभर केलेल्या प्रवासाचे ते फलित होते. कांशीराम यांचे व्यक्तिमत्त्व निर्भीड होते. त्यांची संवादाची एक शैली होती. कांशीराम यांनी चळवळीसाठी घरादाराचा त्याग केला होता. कांशीराम हे मिशनरी जीवन जगले आणि त्यांनी उत्तर भारताचे राजकारण बदलवून दाखवले. मात्र मायावतींच्या प्रतिमेचा प्रवास ‘दलित की बेटी’ ते ‘दौलत की बेटी’ असा झाला.

महाराष्ट्राच्या मातीतील बीजे घेऊन कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बसपची निवडणूक निशाणी हत्ती आहे. हीच निशाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल़्ड कास्ट फेडरेशनची होती. कांशीराम हयात असताना आरपीआय नेत्यांसोबत त्यांची टीकाटिप्पणी व्हायची. हत्ती आरपीआय ला हवा, असा नेत्यांचा आग्रह होता. त्यावेळी ‘‘बाबासाहब हा हत्ती मैंने पंजाब के जंगलमें छोड दिया है..’’ अशी टिप्पणी करून कांशीराम बसपने मिळवलेले राजकीय यश अधोरेखित करायचे. २००६ साली कांशीराम यांचे निधन झाले, पण तत्पूर्वीच बसपची सर्व सूत्रे मायावती यांच्याकडे आलेली होती. त्यांनी कांशीराम यांची कार्यपद्धती, तसेच विचारधाराही बदलून टाकली. त्याचा दृश्य परिणाम म्हणून गेली ३० वर्षे निर्णायक राहिलेला बसप गलितगात्र होण्याच्या दिशेने निघाला आहे. कांशीराम यांनी महाराष्ट्रातून उत्तर भारतात नेलेला बाबासाहेबांचा हत्ती’ मायावतींच्या कार्य काळात तयार झालेल्या दलदलीत खोलवर रूतला आहे. तो दलदलीतून बाहेर काढणे, हे मोठे आव्हान नेतृत्वाबरोबरच पक्षाच्या केडरवर असणार आहे.

(लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तीक मतं आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top