
पत्रकार-संपादकाच्या भूमिकेतील महात्मा गांधी!
भारतातील वृत्तपत्रकारितेच्या इतिहासातही महात्मा गांधींचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. संपादकांच्या परंपरेतील हे लखलखते झुंबर अगदी आजही डोळे दिपवून टाकते. त्यांच्या कामगिरीचे काही पैलू पूर्वार्धात आपण पाहिले. या लेखात आणखी काही पैलूंची चर्चा येथे केली आहे.
भारतीय भाषाभगिनींविषयी गांधीजांना आस्था होती. "इंडियन ओपिनियन'मध्ये त्यांनी इंग्रजीप्रमाणेच गुजरातीतूनही विपुल लिखाण केले. भारतात "नवजीवन' हे गुजरातीतून निघत होते. याशिवाय हरिजन (इंग्रजी), हरिजनबंधू (गुजराती), हरिजनसेवक (हिंदी) अशी विविध भाषांतील नियतकालीके त्यांनी चालविली. एक भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यास त्यांचा विरोध नव्हता. मात्र शिक्षणाचे विशेषतः प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असणे हे घातक आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. ५ जुलै १९२८ च्या "यंग इंडिया'तील "द कर्स ऑफ फॉरेन मीडियम' या शीर्षकाच्या लेखात त्यांनी ते मांडले आहे. नबाब मसूद जंग बहादूर यांचे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत व्याख्यान झाले. त्यात शिक्षणाचे माध्यम भारतीय भाषाच असल्या पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. "टाइम्स'ने त्यावर टीका करताना म्हटले, की ""राजा राममोहन रॉय यांच्यापासून महात्मा गांधी यांच्यापर्यंत जे अनेक थोर नेते भारतीयांना मिळाले आहेत, तो पाश्चात्त्य शिक्षणाचाच परिपाक आहे.''
आपल्या लेखात गांधींनी हा युक्तिवाद खोडून काढला. चैतन्य, नानक, कबीर आणि तुलसीदास हे इंग्रजी शाळांमध्ये गेले होते काय, आणि समजा त्यांना तसे शिक्षण मिळाले असते, तर त्यांनी काही वेगळी कामगिरी केली असती, असे मानायचे काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ते लिहितात ः
""परकी राजवटीमुळे देशाचे जे काही नुकसान झाले, त्यातील सर्वात मोठे नुकसान म्हणजे इथल्या मुलांवर लादण्यात आलेले परकी भाषेचे माध्यम. असे करून त्यांनी देशातील ऊर्जेचा ऱ्हास घडविला आहे. शिक्षण विनाकारण महाग केले आहे. शिक्षितांना बहुजनांपासून तोडले आहे. देशाच्या आत्म्यावरच घाव घातला आहे.''
हेही वाचा: Bangladesh Liberation Day 2021: मिलाफ राजकीय, लष्करी मुत्सद्देगिरीचा
काय प्रसिद्ध करायचे, या इतकेच काय प्रसिद्ध करायचे नाही, हे ठरविणे हे संपादकाचे कामच असते. गांधीजी चळवळीचे नेते, पत्राचे मालक-संपादक अशा सगळ्याच भूमिका निभावत असल्याने याबाबतीतील निर्णय त्यांना घेता येत असे हे खरेच; परंतु त्यांनी याबाबतीतही त्यांच्या मर्मदृष्टीचा प्रत्यय दिला. अहमदाबादमधील कापड गिरणीमधील संपात गांधींनी कामगारांच्या बाजूने लढा दिला. तो अर्थातच खास त्यांच्या शैलीतला लढा होता.
संप जाहीर करून मोकळे व्हायचे आणि वाटाघाटींच्या वेळीच हजर व्हायचे, असा प्रकार गांधीजींना स्वप्नातही सुचला नसता. संप किती काळ चालेल, हे माहित नाही. अशावेळी कामगारांमध्ये वैफल्य निर्माण होण्याचा, ते व्यसनांत अडकण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांच्या सतत संपर्कात राहून गांधी त्यांना वेगवेगळे कार्यक्रम देत राहिले, मात्र हा अंतर्गत प्रश्न असल्याने आपल्या लढ्याला व्यापक प्रसिद्धी देण्याचे त्यांनी टाळले. त्याच सुमारास सुरू झालेला खेडा येथील सत्याग्रह हा ब्रिटिशांच्या प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांचा संघर्ष होता. प्रश्न स्थानिक असला तरी बलाढ्य साम्राज्याच्या विरोधातील जो महत्त्वाचा लढा होता. यात शेतकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडत, या लढ्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी मिळेल, हे गांधीजींनी पाहिले.
हा केवळ स्ट्रॅटेजीचा भाग आहे, असे म्हणता येणार नाही. हा संपादकाचा विवेक आहे. याची कैक उदाहरणे त्यांच्या पत्रकार-लेखक-संपादक या भूमिकेच्या अभ्यासातून मिळतील, पण याविषयीच्या त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांमधून सर्वोच्च महत्त्वाचे असे एकच निवडायचे म्हटले तर ते निःसंशय "नैतिकतेचा आग्रह' हेच असेल. समाजाला काही सांगण्यासाठी, लोकांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी संपादकाजवळ नैतिक अधिकार असावा, तो टिकविण्याची त्याने काळजी घ्यायला हवी, त्यासाठी सतत स्वतःला तपासत राहायला हवे, ही त्यांची भूमिका होती. ते स्वतः याप्रकारे वागत होते. त्यांच्या साप्ताहिकाचे पहिले पान बऱ्याचदा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावरील लेखाने किंवा पत्राने सुरू होत असे. ६ जून १९२१ च्या अंकात एक मोठा तक्ता त्यांनी प्रसिद्ध केला होता. तो होता, नुकताच पार पडलेल्या आंध्र प्रदेश दौऱ्याचा खर्चाचा तपशील. तो साऱ्या जनतेपुढे सादर करून गांधीजी लिहितात ः
"एखाद्या दौऱ्याचा खर्च किती झाला, याच्या खोलात यापूर्वी मी कधी शिरलो नाही. परंतु ताज्या दौऱ्यात मला असे आढळून आले, की कार्यकर्त्यांकडून आपल्या सुखसोईंचा विचार करून अगदी सैल हाताने खर्च केला गेला, तो वैयक्तिक स्नेहापोटी, असे सांगितले जाईल.
"दारिद्रीनारायणाच्या उद्धारा'च्या नावाने जेव्हा असा पैसा गोळा केला जातो, तेव्हा या वर्तनाची चिकित्सा करावी लागते. प्रत्येक कार्यकर्त्याने राष्ट्रीय निधी अत्यंत काटेकोरपणेच वापरला पाहिजे. कष्टाने जमविलेले पैसे एखादी गृहिणी किंवा गृहस्थ ज्या निगुतीने, काटेकोरपणे खर्च करेल, त्याच पद्धतीने हा खर्च झाला पाहिजे. लेखाच्या शेवटी ते म्हणतात. Beware... स्वातंत्र्योत्तर वाटचालीत हा इशारा सगळ्यांनीच गांभीर्याने घेतला असता तर?
हेही वाचा: Bangladesh liberation Day 2021: भारत - सोव्हिएत करार आवश्यक होता का?
संवादोत्सुक वाचकवर्ग ही कोणत्याही माध्यमाची ताकद असते. गांधीजींना ती नेहमी मिळाली, याचे कारण त्यांची शैली, वृत्ती आणि दृष्टी. ""ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून बाहेर पडा असे मी सांगतो आहे, याचा अर्थ त्यानंतर माझी गुलामगिरी पत्करा, असा नाही'' ही त्यांची भूमिका होती. त्यामुळेच इतरांच्या अभिव्यक्तीविषयी त्यांना आदर असे. जास्तीत जास्त वाचकांची मते जाणून घेण्यास ते उत्सुक असत. ते स्वमताविषयी ठाम असले आणि त्यांची खास अशी जीवनदृष्टी असली तरी सर्व प्रकारच्या मतांसाठी आपल्या नियतकालिकांची पाने त्यांनी खुली ठेवली होती, असे आपल्याला दिसते. त्यांच्याकडे देशभरातूनच नव्हे, तर परदेशांतूनही पत्रांचा ओघ वाहात असे. त्यातल्या अनेक पत्रांना ते पहिल्या पानावर प्रसिद्धी देत. त्यांच्या अनेक अंकांची सुरुवातच अशा वाचकपत्रांनी झालेली आपल्याला दिसते. मग गांधीजी त्या पत्राला सविस्तर उत्तर देत. आपली भूमिका स्पष्ट करीत. शंकांचे निराकरण करीत. मतभेद असतील तर ते व्यक्त करीत. एखाद्या कार्यक्रमामागची आपली भूमिका विशद करीत. ते उत्तर जरी त्या मूळ पत्रलेखकाला असले, तरी त्यांच्या डोळ्यासमोर समस्त वाचकवर्ग असे. या साप्ताहिकाचे स्वरूप ते कमालीचे संवादी ठेवू शकले, ते त्यांनी स्वीकारलेल्या या संपादकीय धोरणामुळे. पत्रांचे विषयही किती विविधप्रकारचे असत! व्ही. डी. कृषी यांनी "लाईफ आफ्टर डेथ' नावाचे पुस्तक लिहिले होते. ते वाचून एका पत्रलेखकाने, मृत व्यक्तीकडून जिवंत माणसाला काही संदेश मिळतात का, असा प्रश्न विचारणारे पत्र पाठवले. ते जवळजवळ जसेच्या तसे प्रसिद्ध करून लगेचच गांधीजी त्याचे उत्तर लिहितात.
हेही वाचा: पद्म ‘श्री’ तुळशी गौडा!
"मला असे कोणतेही संदेश मिळत नाहीत. पण जे असा दावा करतात, तेदेखील फसवे असतात. अशा प्रकारचे संदेशवहन होतच नाही, असे दाखविण्यासारखा काही पुरावा नाही. समजा असे होत असेल तरी ती कृती योग्य नाही. संदेश देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्याही दृष्टीने'', असे मत गांधीजी व्यक्त करतात. त्यापुढचे त्यांचे वाक्य महत्त्वाचे आहे. ""अशा प्रकारचे संदेश मिळतात, असा दावा करणाऱ्या व्यक्ती मनाचे संतुलन बिघडलेल्या, दुबळ्या मनाच्या किंवा लौकिक जीवनातील व्यावहारिक कार्य करण्यास असमर्थ असतात, असे मला वाटते.''
अग्रलेखातील गांधीजींचे युक्तिवाद विस्तृत असत. ज्या प्रश्नावर आपल्याला विचार द्यायचा आहे, तो प्रश्न आधी नीट मांडणे, मग त्याच्या वेगवेगळ्या बाजू दाखवून देणे आणि अखेरीस त्यावर आपल्याला काय म्हणायचे आहे, हे स्पष्ट करणे अशी त्यांची पद्धत होती. संपादकांच्या मतांवर टीका करणारी, तुटून पडणारी अशी पत्रेही प्रसिद्ध केली जात. त्याच्या प्रदीर्घ उत्तरांमधून जाणवते ते हे की प्रतिपक्ष मांडणाऱ्याला लेखणीने घायाळ करणे, त्याला हास्यास्पद बनवणे असा प्रयत्न ते करीत नसत. त्यांच्या भर असे तो युक्तिवादावर. विषयाच्या सर्व बाजू लख्खपणे वाचकांच्या समोर आल्या पाहिजेत, यावर त्यांचा कटाक्ष असे.
गांधीजींचा स्वतःचा "वर्ल्ड व्ह्यू' होता. त्याचे थेट प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडे. त्यावर वादंगाचे मोहोळ उठले तरी ते आपल्या भूमिकेपासून विचलित न होता आत्मविश्वासाने आपला विचार मांडत.
हेही वाचा: मंजुनाथ शेट्टी ते मंजम्मा जोगती!
११ फेब्रुवारी १९२६ च्या अंकात "यंग इंडिया'च्या स्वीडनमधील चाहत्याने लिहिलेले पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. तेथील एका वृत्तपत्रात गांधीजींच्या नेतृत्वाखालील लढ्यावर, त्यामागच्या तत्त्वज्ञानावर झोड उठविणारा लेख प्रसिद्ध झाला होता. या पत्रलेखकाने त्या लेखाचे इंग्रजीत साररूपाने भाषांतर करून ते "यंग इंडिया'कडे पाठवले. ते पाठवण्याचा उद्देश भारतीय स्वातंत्र्य चळवळीविषयी असलेली आस्था हाच आहे, असे सुरवातीलाच नमूद करून हा पत्रलेखक म्हणतो, "हे तुमच्याकडे पाठवावे की नाही' असे विचार मनात येत होते. पण "Love drives away fear` (प्रेम भीतीला पळवून लावते) या बायबलमधील वचनाचा आधार घेऊन लिहित आहे. त्यानंतर ज्या लेखाने त्यांना अस्वस्थ केले, त्याचे सार दिले होते. त्या लेखात म्हटले होते.
"गांधीजी आपल्या "आध्यात्मिक साम्राज्यवादा'च्या (Spiritual Imperialism) माध्यमातून पश्चिमद्वेष पसरवित आहेत. यातून ते एका निव्वळ प्रतिक्रियावादी भारताची उभारणी करीत आहेत. एकीकडे ते स्वावलंबनासाठी चरख्याची शिफारस करतात. त्यायोगे पाश्चात्त्यांच्या गुलामीतून आपण मुक्त होऊ, असे त्यांना वाटते. संपूर्ण प्रशासनावरील ब्रिटिशांचे नियंत्रण हटविण्यासाठी त्यांचे राजकारण सुरू आहे. ते ज्या पश्चिमी संस्कृतीविषयी तिटकारा व्यक्त करताहेत, तिचीच रेल्वे ही देन आहे. चळवळ चालविणाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता येते ते रेल्वेमुळेच. सूतकताईच्या कार्यासाठी देखील रेल्वेचा उपयोग होत आहे. एकीकडे खेड्यांच्या स्वयंपूर्णतेचा गौरव आणि दुसरीकडे जातिभेदाचा धिक्कार यातही विसंगती आहे.'' या आक्षेपांना गांधीजींनी सविस्तर उत्तर दिले आहे. ""मी अजिबात रेल्वेच्या विरोधात नाही. चरख्याचा प्रसार आणि रेल्वेचे अस्तित्व यात विसंगती नाही. सूत उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी माझी धडपड सुरू आहे. शेतीनंतरचा रोजगार पुरविणारा हा सर्वात मोठा उद्योग आहे आणि त्याच्या माध्यमातून संपत्तीचे न्याय्य फेरवाटप व्हावे, हा माझा उद्देश आहे. आळस आणि भिक्षांदेही वृत्ती ही वैगुण्ये मला दूर करायची आहेत. ब्रिटिशांना हुसकावून लावणे, हे नव्हे तर भारतीय शासनसंस्थेकडे पाहण्याचा ब्रिटिशांच्या दृष्टिकोनात मला आमूलाग्र बदल घडवायचा आहे. इंग्रजांना येथे "मालक' म्हणून नाही, तर "मित्र' म्हणून स्थान आहे.''
हेही वाचा: शेजारधर्म बिघडवण्यासाठी चीनच्या कुरापती
गांधीजी प्रतिवाद करून थांबत नाही. त्यानंतर ते आक्षेपकाच्या भूमिकेत जाऊन विचार करतात. दूर सातासमुद्रापार राहून भारतीय चळवळीचे मर्म जाणून घेणे अवघड वाटत असणार, हे स्वाभाविक आहे, असे ते लिहितात. इथे, या शेवटच्या वाक्यात गांधीजींच्या संवादशैलीची खासियत दिसते. ते चर्चेला, विचारमंथनाला खुले व्यासपीठ उपलब्ध करून देतात. शंका-आक्षेप-तक्रारी-टीका यांना उत्तरे देताना ठामपणे अभिव्यक्ती करतात. मात्र हेतूविषयी शंका घेत नसत. त्यामुळे त्यांच्या नियतकालिकांमध्ये वितंडापेक्षा संवाद प्रकर्षाने आढळतो.
गांधी नावाचा जबरदस्त "ब्रॅंड' आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील हे भारलेले वातावरण. केवळ खपाच्या आधारावर यशस्वीरित्या आपली नियतकालिके चालविणे या दोन गोष्टींच्या आधारे संपादक-पत्रकार गांधींना शक्य झाले. त्या दोन्ही गोष्टी आज नाहीत हे खरेच, पण सत्याचा शोध, त्याच्याशी प्रामाणिक राहण्याची धडपड आणि जनसंज्ञापन माध्यमांत काम करणाऱ्यांनी नैतिक अधिकार मिळवला आणि टिकवला पाहिजे, हा आग्रह याची गरज कालबाह्य झालेली नाही. उलट आज ती अधिकच प्रकर्षाने जाणवत आहे. प्रभावी माध्यमे आज आपल्या हातात आली आहेत, पण ती इतकी "प्रभावी' झाली आहेत, की मार्शल मॅक्लुहान या माध्यम अभ्यासकाने म्हटल्याप्रमाणे "माध्यम हाच संदेश' (मीडियम इज दि मेसेज) अशी अवस्था तयार होत आहे. आपण माध्यमांना वापरण्याऐवजी तीच आपल्याला वापरू लागली आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गांधीजींच्या माध्यमयात्रेत संदेशाला जास्त महत्त्व आहे, हे उघड आहे.
हेही वाचा: पाकिस्तानी लेफ्टनंट कर्नलला पद्मश्री का?
उच्च "कोटी'तील संपादक
एका अभ्यासकाने नमूद केल्यानुसार, गांधीजींनी लिहिलेले शब्द आहेत जवळजवळ दोन कोटी. नुसते शब्द बापुडे... असा हा प्रकार नव्हता. "इंडियन ओपिनियन' या दक्षिण आफ्रिकेतील साप्ताहिकाचे मुख्य आधारस्तंभ होते. भारतात परतल्यावर "यंग इंडिया' साप्ताहिकाचे संपादक त्यांनी भूषविले. ते तुरुंगात असतील वा आंदोलनात. उपोषणात गुंतलेले नसतील तो काळ सोडला तर हे क्षण त्यांनी अथकपणे केले. त्यांची पत्रकार-संपादक ही भूमिकादेखील त्यांच्या इतर भूमिकांइतकीच लखलखीत आहे. या सर्व साप्ताहिकांचे अंक सुदैवाने उपलब्ध आहेत. त्यावर नजर फिरवताना मनावर पहिला ठसा उमटतो, तो हा की ती पत्रे विलक्षण संवादी आहेत. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये (चित्रचौकट) ज्याप्रमाणे दिग्दर्शक दिसतो तसा प्रत्येक अंकात आणि प्रत्येक पानावर हा संपादक दिसतो.
एम. के. गांधी या नावाने लिहिलेल्या प्रत्येक लेखाची अग्रलेखाची सुरुवात जगभरात कुठल्या ना कुठल्या वाचकाने नोंदविलेले मत, पाठविलेले पत्र, विचारलेल्या शंका, केलेल्या तक्रारी, घेतलेले आक्षेप यांच्या संदर्भाने होते आणि मग त्याला उत्तर देताना गांधीजी विस्ताराने त्या त्या विषयावरील आपली भूमिका स्पष्ट करीत. पारदर्शित्वाचे, सुसंवादाचे आणि त्याचवेळी वैचारिक भूमिकेबाबत आपला ठामपणा दाखविणारे असे उदाहरण क्वचितच दुसरे सापडेल. अगदी नवनव्या आणि सर्वसामान्य वाचकाला एवढे महत्त्वाचे स्थान देणारी संपादकीय शैली त्यांच्या द्रष्टेपणाचेच एक उदाहरण आहे. वृत्तपत्र आणि साधे पत्र या माध्यमांचा इतका पुरेपूर उपयोग एवढ्या ताकदीने कोणी केला असेल असे वाटत नाही.
(उत्तरार्ध)
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”