गोव्यात राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळणार का? | Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Will there be an end to political instability in Goa Article by Dhananjay Bijale}

गोव्यात राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळणार का?

पणजीत टॅक्सीतून प्रवास करताना ड्रायव्हरला विचारले, यंदा गोव्यात कोणाची सत्ता येणार? त्याचे उत्तर होतो, यंदा आप, तृणमूल कॉंग्रेससारखे पक्ष पहिल्यांदाच रिंगणात आहेत. त्यामुळे खूप रस्सीखेच होणार. पण कोणाचे कितीही आमदार निवडून येवोत सत्ता मात्र भाजपच स्थापन करणार. गोव्यातील आयाराम - गयारामांच्या अस्थिर राजकीय परिस्थितीचे त्याने एका वाक्यात वर्णन केले होते. याचे कारण म्हणजे गेल्या वेळी तेरा आमदार निवडून आलेला भाजप पाच वर्षे सत्तेत होता तर १७ आमदारांच्या कॉंग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले होते.मधल्या काळात मांडवीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. कॉंग्रेसच्या १७ पैकी १६ आमदारांनी पक्षाला रामराम ठेवला होता. त्यातील बारा जणांना तर यंदा भाजपनेच उमेदवारी दिली होती. यावरून गोव्यात काहीही घडू शकते हे कोणालाही पटेल.

भाजपसाठी यावेळची निवडणूक पार महत्त्वाची अशी होती. कारण गेली तीन दशके गोवा म्हणजे मनोहर पर्रीकर असेच जणू समीकरण झालेले. गोव्यात पर्रीकर यांनी भाजपचे रोपटे रुजवले, ते वाढवले आणि त्याचे वटवृक्षात रूपांतरही केले. त्यांच्यामुळेच गोव्यात भाजप सलग दोनदा सत्तेत विराजमान झालेला होता. गेल्या वेळी तर पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तर पाठिंबा देण्याचे धोरण मगो पक्षाने घेतले होते. त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास परवानगी घेत त्यांच्या मंत्रिमंडळातून संरक्षणपदाचा राजीनामा देत गोव्यात परतावे लागले होते. यावरून पर्रीकर यांचे पक्षातील स्थान अधोरेखित होते. त्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली होती. असा स्थितीत भाजप निवडणुकांना सामोरे गेल्याने पक्षाची यावेळी मोठी कसोटी लागलेली होती.

हेही वाचा: अशी दुर्बीण ज्यामुळे कदाचित एलियनही दिसतील..!

गोव्याचा शांत, सुशेगाद प्रचार

गोव्यात दहा दिवस निवडणूक वार्तांकनासाठी फिरताना राजकीय ताणेबाणे सहज जाणवत होते. २५ ते ३० हजार मतदारांच्या मतदारसंघात पक्षांपेक्षा उमेदवारांना जास्त महत्त्व होते. निवडणूक म्हटले की प्रचाराचा तामझाम, पोस्टर- बॅनर्सचे युद्ध, पदयात्रा, कोपरा सभा असा माहोल अनुभवण्याची आपली सवय. गोव्यात मात्र याउलट चित्र असते. गोवेकरांच्या स्वभावाप्रमाणे तेथील प्रचारही सुशेगाद पद्धतीचा असतो. उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतो. उमेदवार घरी न आल्यास मतदार नाराज होतात. त्यामुळे अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भव्य सभांना फाटा देत पक्षासाठी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. त्यामुळे वरवरच्या वातावरणातून गोव्याच्या निकालाचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ञांना कठीण जाते. याचा प्रत्यय १० मार्चच्या निकालावरून आला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकारविरोधी जनमताची (अटी इन्कंबन्सी) लाट थोपवत पुन्हा सत्तेला गवसणी घालण्याची किमया साध्य केली आहे. याचे कारण म्हणजे पक्षाचे त्या त्या भागातील प्रभावशाली उमेदवार. यावेळचे निकाल दोन अर्थांनी वैशिष्ठ्यपूर्ण ठरले. एक म्हणजे ४० जणांच्या विधानसभेत भाजपने २० जागा जिंकल्याने राजकीय अस्थिरतेला बसलेला लगाम बसणार आहे. दुसरे म्हणजे आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, रिव्होलेशनरी गोवन्स या तीन नव्या पक्षांची धमाकेदार ‘एंट्री़'. यामुळे गोव्याचे राजकारण बहुपक्षीय होण्यास सुरवात झालेली आहे.

तीन दशके गोव्यात पर्रीकर म्हणजे भाजप असे समीकरण दृढ होते. यंदा भाजप त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जात होता. त्यांचे पुत्र उत्पल यांच्या बंडखोरीने जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी होती. अशावेळी प्रभारी या नात्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी होती. भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांत कोणतीच कसूर ठेवली नाही. ते स्वतः दोन महिने तेथेच तळ ठोकून होते. सावंत तसेच कॉंग्रेसमधून आलेले बलाढ्य नेते विश्वजित राणे, बाबूश मोन्सेरात यांच्याशी समन्वय साधण्याचे कसब दाखवीत फडणविसांनी पक्षासाठी विजय खेचून आणला.

हेही वाचा: नेमेची येतो तो’ अर्थसंकल्प

विरोधकांच्या मतांची फाटाफूट


भाजपच्या या यशात विरोधी पक्षांच्या मतांची फाटाफूट हेही महत्त्वाचे कारण आहे. आप, तृणमूल आणि रिव्होलेशनरी गोवन्स या पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसची मते घेतली. त्यामुळे कॉंग्रेसचे अनेक उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले. २०१७ मध्ये भाजपला १३ जागा मिळाल्या होता. यंदा ही संख्या वीसपर्यंत वाढली तरी पक्षाची मते अवघी ०.८ टक्के वाढली आहेत. २००७ मध्ये भाजपला एकूण ३२.५ टक्के मते मिळाली होती यावेळी ३३.३ टक्के मते मिळाली आहेत. याउलट कॉंग्रेसला गेल्या वेळी २८.५ टक्के मते मिळाली होती. यंदा २३.५ टक्के मते मिळाली. त्यांची पाच टक्के मते नव्या पक्षांनी घेतली आणि येथेच त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला.फडणवीसांचे महत्त्व वाढले


महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात अपयश आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे गोव्यात पक्षाची सत्ता राखणे फार महत्त्वाचे होते. त्यामुळे फडणवीस यांनी महाराष्ट्रून प्रचारासाठी तीन खासदार व १७ आमदारांची फौज उतरविली होती. मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत गोव्यात भाजपची सत्ता पुन्हा आणल्याने फडणवीस यांचे भाजपमधील दिल्लीतील राजकीय वजन वाढले आहे. बिहारमध्येदेखील फडणवीस पक्षाचे प्रभारी होते. तेथेही सत्ता आली. मात्र तेथील प्रचारात व विजयात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व पक्षाचे नेते सुशिल मोदी यांचा सिंहाचा वाटा होता. गोव्यात मात्र सारी निवडणूक फडणवीस यांनी स्वतःच्या जबाबदारीवर शिरावर घेतली होती. तेथील अपयशाची जबर किंमत त्यांना मोजावी लागणार हे गृहीत धरून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. अशा स्थितीत भाजपला विजयाकडे नेत फडणवीस यांनी बाजी मारली आहे. भाजपचे नेतृत्व फडणवीस यांच्याकडे हळूहळू केंद्रीय स्तरावर जबाबदाऱ्या देवून त्यांना वेगळ्या प्रकारे तयार करीत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.आप व तृणमुलचा चंचुप्रवेश


गोव्यात यंदा आप व तृणमूल या पक्षांनी चंचुप्रवेश केला आहे. आपचे दोन आमदारही निवडून आले असून पक्षाला ६.८ टक्के मते मिळाली आहेत. रिव्होलेशनरी गोवन्स या नव्या पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. सुरवातीला प्रचंड चर्चा झालेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमुलला खातेही उघडता आले नसले तरी पक्षाला ५.२ टक्के मते मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न हे पक्ष हिरिरीने करतील. हे पक्ष जितके ताकदवान होतील तितके गोव्याचे राजकारण रंगतदार होणार आहे. तूर्तास भाजपच्या यशामुळे गोव्यातील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top