Cricket News- Sarfaraz Khan : धावांचा डोंगर, पण टीम इंडियातील स्थान फिटनेस अभावी गमावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट आणि फिटनेस}

Sarfaraz Khan : धावांचा डोंगर, पण टीम इंडियातील स्थान फिटनेस अभावी गमावलं?

(प्रणाली कोद्रे)

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट वर्तुळात एक विषय सातत्याने चर्चेत आहे, तो विषय म्हणजे सर्फराज खानची भारतीय संघान न झालेली निवड. यावर अगदी इरफान पठाण ते सुनील गावसकर अशा अनेक आजी- माजी क्रिकेटपटूंनी भाष्य केले. स्वत: सर्फराज खाननेही त्याची प्रतिक्रिया देत निराशा व्यक्त केली आहे...

फलंदाजीबाबत बोलायचे झाले, तर सर्फराज अगदी स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे, हे कोणीही अमान्य करणार नाही, पण मग गाडी अडतेय कुठे, तर त्याच्या फिटनेसवर. त्याच्या फिटनेसवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न विचारले जात आहेत. (Cricket News in Marathi Sunil Gavaskar comment of Sarfaraj Khan Fitness)

पण, नुकतेच भारताचे महान क्रिकेटपटू गावसकरांनी (Sunil Gavaskar) फिटनेसबाबत मोठे वक्तव्य केले आणि पुन्हा एकदा क्रिकेटपटूचा फिटनेस (Fitness) ही चर्चा सुरू झाली. गावसकरांनी म्हटलं की क्रिकेट फिटनेस असणं महत्त्वाचं आहे, यो-यो टेस्ट वैगरे गोष्टी असल्या तरी खेळाडू क्रिकेटसाठी (Cricket) फिट असणे गरजेचे आहे. जर तो खेळाडू शतक केल्यानंतरही क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर येत असेल, तर तो फिट आहे. आणि भारतीय निवड समीतील स्लीम खेळाडू हवे असतील, तर त्यांनी फॅशन शोमध्ये जावं.

आता गावसकरांचं असं म्हणणं आलं, त्यामुळे क्रिकेट फिटनेस म्हणजे काय अन् भारतीय संघाचे असलेले अनेक नियम चर्चेत आले. त्यातच काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय संघात यायचं असेल, तर यो-यो टेस्ट आणि डेक्सा टेस्ट अनिवार्य केली आहे. यातून पास होणारे खेळाडूच भारतीय संघातील निवडीसाठी पात्र असतात. बीसीसीआयने गेल्या काही दिवसात सातत्याने खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला होता.

यो-यो टेस्ट म्हणजे ऍरोबिक एंड्यूरन्स फिटनेस टेस्ट. यामध्ये २० मीटरच्या अंतरात ठेवलेल्या खूणांदरम्यान धावायचे असते. यात वेग वाढवत थकवा येईपर्यंत धावायचे असते. ही टेस्ट जगभरात फिटनेस लेव्हल तपासण्यासाठी वापरली जाते. तसेच डेक्सा म्हणजेच ड्युएल-एनर्जी एक्स-रे ऍब्सॉर्पशोमेट्री (Dual-energy X-ray absorptiometry). ही १०

मिनिटाची टेस्ट असून यामध्ये खेळाडूंच्या स्नांयूंचे वजन, पाण्याचे प्रमाण आणि हाडांचे वजन (bone density) आणि शरीरातील फॅट तपासण्यासाठी केली जाते. ही टेस्ट स्पेक्ट्रल इमेजिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका विशेष तंत्राचा वापर करून करण्यात येते. त्यात वेगवेगळ्या ऊर्जा स्तरांवरील दोन एक्स-रे बीम खेळाडूच्या हाडांकडे निर्देशित केले जातात आणि त्यातून खेळाडूंच्या हाडांची आणि फॅट्सची तपासणी केली जाते.

पण, आता गावसकरांनी केलेल्या विधानानंतर बीसीसीआयच्या (BCCI) फिटनेस टेस्टवर चर्चा सुरू झाली. अनेकांनी फलंदाज जर धावा करतोय, तर या टेस्टची गरज काय असं मतही मांडलं. पण गावसकरांनी असंही म्हटलंय की क्रिकेट फिटनेस असणं महत्त्वाचं आहे. आता क्रिकेट फिट म्हणजे काय, तर फलंदाज-गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख निभवावीच, पण त्यांचे क्षेत्ररक्षणातील योगदानही महत्त्वाचे आहे. एकूणच खेळाडूला गोलंदाजी किंवा फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात त्याचे योगदान द्यावे लागते आणि त्यासाठी लागणारी कौशल्य आत्मसात सावी लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे तो खेळाडू मानसिक आणि शारिरीकदृष्ट्याही तंदुरुस्त असणे महत्त्वाचे असते.

हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

यावर अनेक जण असंही म्हणतील, पूर्वी कुठे असं काय होतं. इंझमाम उल हक, विरेंद्र सेहवाग अगदी आत्ताआत्ता अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद हे क्रिकेट खेळलेच की. मग आत्ता असं काय झालं की फिटनेसला इतकं महत्त्व दिलं जातंय. काहीप्रमाणात हे खरं असलं तरी आता हे पण लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की पिढीनुसार काही गोष्टी बदलत असतात. आत्ताची खेळाडूंची पिढी फिटनेसला महत्त्व देणारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फिटनेस स्तरही उंचावलेला आहे.

फक्त बीसीसीआयच नाही, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड यांसारख्या अव्वल क्रिकेट बोर्डाचेही फिटनेस नियम आहेत आणि सांगण्याची गोष्ट अशी की यांसारख्या क्रिकेट बोर्डांचे यो-यो टेस्टचे बेंचमार्क बीसीसीआयने ठरवल्यापेक्षाही जास्त आहेत. आता अशा गोष्टींचा विचार केला, तर जर अन्य संघातील खेळाडूंचा फिटनेस उच्च स्तराचा असेल, तर त्यांना टक्कर देण्यासाठी समोरील खेळाडूही तितके फिट असणे महत्त्वाचे आहे, हे साधे समीकरण आहे.

आजकाल आंतरराष्ट्रीय स्तरावरच नाही, तर अगदी लीग स्पर्धांमध्येही क्रिकेटपटू क्षेत्ररक्षणात कमालीची कामगिरी करतात. अनेकांनी अफलातून क्षेत्ररक्षणाचे नमुने देणारे व्हिडिओ पाहिलेही असतील. काही वर्षांपूर्वी फिटनेस आणि क्षेत्ररक्षण म्हटलं की जॉन्टी ऱ्होड्सचे उदाहरण दिले जायचे. पण आज असंख्य क्रिकेटपटू त्यांच्या क्षेत्ररक्षणाने लक्ष वेधतात. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करताना आडवलेल्या धावाही संघाला विजयासाठी महत्त्वाच्या ठरतात.

आजकाल संघ ३००-३५० धावांचे आव्हानही सहज पार करू लागले आहेत. अशावेळी क्षेत्ररक्षण महत्त्वाचा पैलू बनतो. ज्यावेळी खेळाडू प्रत्येक धाव रोखण्याचा प्रयत्न करतात, तेवढ्या त्याच्या संघाच्या विजयाच्या आशाही उंचावत जातात. भारताने २०१३ साली जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफी याचे उत्तम उदाहरण आहे. या स्पर्धेतीलभारताची सर्वात जमेची बाजू कोणती ठरली होती, तर ती होती क्षेत्ररक्षण. उत्तम क्षेत्ररक्षण भारताच्या विजयाचे सर्वात मोठे कारण ठरले होते. याबद्दल चर्चाही झालेली. ज्यावेळी खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उतरतो त्यावेळी त्याचे पूर्ण फिट असणे महत्त्वाचे ठरते. कारण त्याला चौकस राहून सातत्याने मैदानात वावरायचे असते. आता यासाठी तो खेळाडू सडपातळच दिसायला हवा, असे नसते. तर त्या खेळाडूचा एंड्यूरन्स, मॅच फिटनेसही महत्त्वाचा असतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर खेळाडू संपूर्ण डावात मैदानावर उभा राहण्यासाठी सुदृढ असावा लागतो.

सांगण्याचा मुद्दा इतकाच की फलंदाजाने खोऱ्याने धावा काढल्या तरी, जर क्षेत्ररक्षणावेळी चांगले क्षेत्ररक्षण केले गेले नाही, तर समोरचा संघ तुम्ही धावांचा डोंगर जरी उभारला तरी तो पार करणारच. तसेच गोलंदाजाने त्याच्या षटकात कितीही चांगली गोलंदाजी केली, तरी दुसऱ्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवेळी चांगले क्षेत्ररक्षण केले नाही, तर संघाला फटका बसणारच आहे. अशा परिस्थितीत संघातील एकजरी क्षेत्ररक्षक पूर्ण फिट नसेल, तर त्याचा फटका त्याच्या संघाला बसतो. त्यातच आता अन्य संघातील खेळाडूंच्या फिटनेसचा स्तर उंचावला असेल, तर भारतीय खेळाडूंनी याकडे कानाडोळा करणे नक्कीच परवडणारे नाही.

आता सर्फराजची गोष्ट करायची झाल्यास, त्याने नक्कीच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षात खोऱ्याने धावा काढल्यात, शतके केली, अगदी त्रिशतकही केले, तरी काही प्रश्नांची उत्तरे मिळणेही गरजेचे आहे. मुद्दा सर्फराजवर टीका करण्याचा नाही, त्याने फलंदाजीत कमालीची कामगिरी केली आहे, पण त्याच्या फलंदाजी व्यतिरिक्त कधी त्याच्या क्षेत्ररणासाठी चर्चेत आलेला नाही, हे देखील तितकेच खरे आहे.

हेही वाचा: सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सर्फराजने गेल्यावर्षीच म्हटले होते की विराट कोहलीने त्याला ६-७ वर्षांपूर्वी त्याचा फिटनेस सुधारण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तो त्याच्या फिटनेसवर काम करतो. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते, पण त्याचापरिणाम खेळावर व्हायला नको. तसेच त्याने काही दिवसांपूर्वीच असेही सांगितले होते की त्याने यो-यो टेस्टही पास केली आहे आणि तो एकेरी-दुहेरी धावाही चपळाईने धावू शकतो. असे असेल, तर सर्फराजला आता फलंदाजीबरोबरच त्याच्या फिटनेसचा स्तरही उच्च दर्जाचा आहे, हे सिद्ध करावे लागेल. कारण जेव्हा आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाची चर्चा होते. त्यावेळी तुम्हाला त्या दर्जाच्या फलंदाजीबरोबरच मैदानातील अन्य विभागातील योगदानही महत्त्वाचे असते.

सर्फराजने काहीदिवसांपूर्वी सांगितले होते की त्याची गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या बांगलादेश दौऱ्यासाठी विचार केला जाईल, असे निवड समीतीने स्पष्ट केले होते. पण नंतर त्याला संधी मिळाली नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सर्फराजची निवड भारतीय अ संघाने केलेल्या बांगलादेश दौऱ्यासाठी झाली होती. त्यावेळी भारतीय वरिष्ठ संघाचा बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिका सुरू होण्याच्या आधीच भारतीय अ संघाचे प्रथम श्रेणी सामने होणार होते. मात्र, बांगलादेश अ संघाविरुद्धच्या २ सामन्यांमध्ये सर्फराज केवळ २१ धावा करू शकला. त्या सामन्यांमध्ये अभिमन्यू ईश्वरनने दोन शतके करत दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागेवर आपलाहक्क सांगितला होता. ही संधी सर्फराजकडेही होती, पण तो त्यावेळी मोठी खेळी करून लक्ष वेधू शकला नाही.

सर्फराजने भारतीय अ संघाकडून ६ सामने खेळलेत, यात त्याने केवळ ३४ च्या सरासरीने २०५ धावा केल्यात. तसेच आयपीएलमध्येही तो इतर खेळाडूंच्या तुलनेत दर्जेदार खेळ करू शकलेला नाही, त्याने गेल्या तीन आयपीएल हंगामात १३ सामन्यांमध्ये मिळू केवळ 124 धावा केल्यात. यात तो तीन वेळा नाबाद राहिलाय. फक्त आयपीएलमधील कामगिरी जरी भारतीय संघातील निवडीसाठी एकमेव पर्याय ठरू शकत नसली, तरी त्यातून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराचा अंदाज येतो, हे अमान्य करून चालणार नाही. त्यामुळे सर्फराजला त्याच्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊन केवळ भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्येच नाही, तर मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्यावा लागणार आहे.

त्याच्याबद्दल मुंबईचे माजी कर्णधार आणि माजी निवड समीतीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी म्हटले होते की त्याने इतर गोष्टींवर भाष्य करण्यापेक्षा धावा करत राहिल्या पाहिजे, तेच त्याचे काम आहे. त्याने त्याच्या फलंदाजीवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण त्याच्यासाठी सध्या भारतीय संघात जागा कुठे आहे. ११ हजारांहून अधिक धावा केलेल्या अमोल मुजुमदारलाही भारतीय संघात जागा मिळाली नव्हती. कारण त्याच्यासाठी भारतीय संघात जागाच नव्हती. त्यामुळे सर्फराजनेही धावा करत राहिल्या पाहिजेत आणि जेव्हा संधी निर्माण होईल, तेव्हा नक्कीच त्याचा विचार केला जाईल. सर्फराजने रेगे यांनी सांगितलेली गोष्ट ऐकली आणि तो जेव्हा स्वत:ला देशांतर्गत क्रिकेटबरोबरच भारतीय अ संघाकडूनही आणि आयपीएलमध्येही सिद्ध करेल, त्यावेळी नक्कीच त्याच्यावर कोणीही बोट ठेवणार नाही.