एक चहावाला कसा बनला फुटबॉलचा देव? | The story of veteran Brazilian footballer Pele | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक चहावाला कसा बनला फुटबॉलचा देव?}

एक चहावाला कसा बनला फुटबॉलचा देव?

- चंद्रकांत बोरुडे

फुटबॉल म्हटल्यावर दोन-तीन नावं आपल्याला हमखास आठवतात, ती म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार वगैरे अजून थोडे पाठीमागे गेले तर पेले आणि मॅराडोना. आणि त्यातले त्यात भारतातील फुटबॉल बद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार सुनील छत्री व्यतिरिक्त कोणत्याही फुटबॉलपटूचे नाव आपल्याला माहिती आहे का हाही एक मोठा प्रश्न आहे. भारतात दुर्दैवाने जितके प्रेम एखाद्या क्रिकेटपटूला मिळते तितके ते फुटबॉल या संपूर्ण खेळालाही मिळत नाही. भारतात क्रिकेटपटूंची अगदी देवा प्रमाणे पूजा केली जाते, त्याचे उदाहरण म्हणून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे घेता येतील. त्याचप्रमाणे फुटबॉल या खेळामध्येही ज्या खेळाडूला देवाचा दर्जा मिळाला, ते खेळाडू म्हणजे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले.

८१व्या वर्षात पदार्पण केलेल्या पेलेंवर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या तंदुरुस्तीबद्दल अनेक फुटबॉलप्रेमींकडून काळजी व्यक्त करण्यात येत होती. परंतु, लहानपणापासून संघर्षपूर्ण जिवन जगलेले पेले या गंभीर परिस्थितीवरही यशस्वीरीत्या मात करून बाहेर आले. त्यामुळे पेले हे नाव गेल्या काही आठवड्यात खूप चर्चेत आहे.


बरं, फुटबॉलचे देव मानले जाणारे पेले काय साधेसुधे खेळाडू नव्हते, त्यांच्या तावडीतून चेंडू मिळवणं म्हणजे एक मोठा दिव्य मानलं जायचं. अतिशय संघर्षमय परिस्थितीतून आलेल्या पेले यांच्या कारकिर्दीची सुरुवात चहाच्या दुकानात चहा विकायला सुरुवात करण्यापासून झाली होती. घरची परिस्थिती अगदी बेताची असल्यामुळे लहानग्या पेलेला चहाच्या दुकानात कामास जावं लागत असे. त्यामुळे चहा विक्रेता म्हणून सुरु झालेला पेले यांचा प्रवास पुढे चालून फुटबॉलचे देव बनण्यापर्यंत कसा येऊन ठेपला ते आज पाहूया.

२३ ऑक्टोबर १९४० रोजी पेलेंचा जन्म ब्राझीलमधील ‘ट्रेस कोरॅ कस’ या तत्कालीन खेड्यात झाला. तोही अतिशय सामान्य कुटुंबात. त्यांच्या घरात अगदी दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची.
पेलेंचं खरं नाव ‘एडिसन एड्सन अरांटिस डो नैसीमेंटो’, वाचायला लागले की अगदी दमछाक होते नं, काहीशा अशाच कारणामुळे ते नंतर ‘पेले’ या छोट्याशा नावाने ओळखले जाऊ लागले. खरंतर फुटबॉलचे बाळकडू पेलेंना त्यांच्या घरातूनच मिळालं. पेलेंचे वडील डॉनडीनहो हे सुद्धा एक फुटबॉलपटू. लहानपणापासून पेलेंना फुटबॉलचं भयंकर वेड होतं. घरची परिस्थिती बेताची असल्याने लहानगा ‘एडिसन’ चहा विकण्याचे काम करायचा. घरची परिस्थिती इतकी वाईट होती की, पेलेला फुटबॉल खरेदी करण्यासाठी पैसे सुद्धा नसायचे म्हणून लहानगा पेले सॉक्समध्ये कचरा भरून त्याने फुटबॉल खेळायचा.

हेही वाचा: CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

पेलेंवर आलेल्या सिनेमात बऱ्याच गोष्टी असल्या तरी त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये या सर्व गोष्टींवरती अगदी विस्तृतपणे लिहिलं गेलेलं आहे. लहानग्या पेलेचा फुटबॉलचा खेळ बघून तत्कालीन फुटबॉल सुपरस्टार ‘वाल डी मार्ट ब्रे टो’ हेही अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यामुळे त्यांनी पेलेला ‘पेशेवर क्लब एस एफ सी’मध्ये सामील करून घेतले. १९५६ साली पेलेनी पेशेवरसाठी पहिला सामना खेळला आणि आपली फुटबॉलची कला सर्वांना दाखवून दिली. त्यामुळे पेलेची वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘सोंटोस क्लब’सोबत खेळण्यासाठी निवड झाली. तिथला त्यांचा खेळ बघून त्यांची लगेचच ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड झाली. ७ जुलै १९५७ रोजी अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला फुटबॉल विश्वकरंडक खेळताना त्यांनी तो त्यांनी ब्राझीलला जिंकून दिला. त्यानंतर पेलेंची कारकीर्द पुढे बहरतच राहिली.

पुढे १९५८ मध्ये पेलेंनी विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये ब्राझील कडून उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत योगदान देताना चार सामन्यांमध्ये सहा गोल नोंदवले. खरेतर हा एक मोठा पराक्रम होता ज्याच्यामुळे पेलेंच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. १९६० च्या दशकात पेलेंची फुटबॉल कारकीर्द धोक्यात आली होती परंतु, त्यांनी पूर्ण ताकदीनिशी पुनरागमन केले. १९६२ सालीही पेलेंना भयंकर मोठी दुखापत झाली आणि पूर्ण वर्षभर ते संघाबाहेर राहिले. १९६४ ते १९६८ च्या दरम्यान विश्वकरंडकासाठीच्या ब्राझील संघात त्यांना स्थान देखील देण्यात आले नाही. पण इतके असूनही पेलेंनी १९६९ मध्ये ‘वास्को दि गामा’ विरुद्धच्या सामन्यात एक हजारावा गोल नोंदवत इतिहास रचला. १९७० मध्ये पेलेंचा शेवटचा विश्वकरंडक होता. या विश्‍वकरंडकात पेलेंनी सगळ्यांना अचंबित करणारा खेळ केला. आणि ब्राझीलकडून तब्बल एकोणीस गोलची नोंद केली. त्यांच्या या दमदार कामगिरीचा जोरावरती ब्राझीलने विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. या कामगिरीमुळे त्यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले.

१९९९ मध्ये, आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघ (आयएफएफएचएस) द्वारे पेलेंची शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. त्याच वर्षी, फ्रान्स-फुटबॉल या फ्रेंच साप्ताहिक मासिकाने शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटू निवडण्यासाठी आपल्या माजी ‘‘बॅलोन डी’ओर’’ विजेत्यांचा सल्ला घेतला. त्यातही पेलेंनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. फुटबॉलमधून निवृत्त होईपर्यंत पेलेंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७६० अधिकृत गोल केले, त्यापैकी ५४१ लीग चॅम्पियनशिपमध्ये होते, ज्यामुळे पेले आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. एकूण १३६३ सामन्यांत पेलेंनी १२८१ गोलची नोंद केली. पेलेंच्या या फुटबॉलमधील भरीव योगदानामुळे त्यांना खऱ्याअर्थाने फुटबॉलचा देव बनवलं.

हेही वाचा: धाव क्रीडासंस्कृतीच्या दिशेने

पेलेंची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

पेलेंनी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ जुलै १९५७ रोजी अर्जेंटिना विरुद्ध खेळला होता, ज्यात त्यांच्या संघाचा २-१ असा पराभव झाला. त्या सामन्यात, पेलेंने ब्राझीलसाठी पहिला गोल केला जेव्हा तेव्हा लहानग्या पेलेचे वय केवळ १६ वर्षे आणि ९ महिने इतके होते. यासह पेले वयाच्या १६ वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू बनले.

१९५८ चा विश्वकरंडक

गुडघ्याच्या दुखापतीनंतर १९५८ मध्ये पेलेंचा फिफा विश्वकरंडकाच्या पहिल्या फेरीचा सामना युएसएसआर विरुद्ध झाल्या ज्यात पेलेंनी दोन गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर उपांत्य फेरीत फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली. अशाप्रकारे त्यांनी विश्वकरंडक इतिहासातील सर्वात तरुण हॅट्ट्रिक करणारा खेळाडू होण्याचा बहुमान पटकावला. पेलेंचा पहिला गोल सर्वांच्या लक्षात राहणारा होता कारण, पेलेंनी नेटच्या कोपऱ्यात जाण्यापूर्वी चेंडू एका डिफेंडरवर फ्लिक केला होता, जो विश्वकरंडकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलपैकी एक म्हणून निवडला गेला. पेलेंच्या गोलनंतर, स्वीडिश खेळाडू सिग्वर्ड पार्लिंग टिप्पनी करताना म्हणाले की, ‘‘पेलेंनी जेव्हा तो गोल मारला तेव्हा मी अक्षरशः जागेवर उभे राहून टाळ्या वाजवल्या होत्या.’’


१९६२ चा विश्वकरंडक


१९६२ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील मेक्सिको विरुद्धच्या पहिल्या सामन्यात, पेलेंनी पहिला गोल करण्यात मदत केली आणि त्यानंतर दुसरा गोल करण्यासाठी चार बचावपटूंना मागे टाकून त्यांना २-० अशी आघाडी मिळवून दिली. चेकोस्लोव्हाकियाविरुद्ध लांब पल्ल्याच्या शॉटचा प्रयत्न करताना ते जखमी झाले. त्याच्या जागी अमरिल्डोचा संघात समावेश करण्यात आला, ज्याने उर्वरित स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तरीही पेलेंची आठवण सर्वांनी काढली होती.


१९६६ विश्वकरंडक


बल्गेरियन आणि पोर्तुगीज बचावपटूंनी पेलेंवर केलेल्या क्रूर हल्ल्यासाठी १९६६ चा विश्वकरंडक स्मरणात आहे. केवळ तीन सामने खेळल्यामुळे ब्राझील पहिल्या फेरीतून बाहेर पडला. पेलेंने ‘फ्री किक’द्वारे बल्गेरियाविरुद्ध पहिला गोल केला, परंतु बल्गेरियन खेळाडूंमुळे झालेल्या दुखापतीमुळे ते हंगेरीविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सहभागी होऊ शकले नाहीत. ब्राझीलने तो खेळ गमावला त्यामुळे पेलेंना संघात पुन्हा पाचारण करण्यात आले. या सामन्यातील अनुभवानंतर पेलेंनी ते पुन्हा विश्वकरंडकात खेळणार नाही अशी शपथ घेतली, परंतु, हा निर्णय त्यांना नंतर बदलावा लागला.


१९७० विश्वकरंडक


१९६९ च्या सुरुवातीला जेव्हा पेलेंना राष्ट्रीय संघात बोलाविण्यात आले, तेव्हा त्यांनी सुरुवातीला नकार दिला, परंतु, नंतर त्यांनी ते मान्य करत सहा विश्वकरंडक पात्रता प्रवेश फेरीचे सामने खेळले आणि सहा गोल केले. १९७० चा मेक्सिकोतील विश्वकरंडक हा पेलेंचा शेवटचा विश्वकरंडक होता. १९६६ च्या संघाच्या तुलनेत या स्पर्धेसाठी ब्राझीलच्या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले. गॅरिंचा, निल्टन सँटोस, वाल्दीर परेरा, जाल्मा सँटोस आणि गिल्मोर यांसारखे खेळाडू आधीच निवृत्त झाले होते, परंतु तरीही पेले, रिव्हेलिनो, जार्झिन्हो, गेर्सन, कार्लास अल्बर्टो टोरेस, टोस्टाओ आणि क्लोडोआल्डो यांचा समावेश असलेला संघ सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानला जात होता. अन झालेही तसेच पेलेंचा सामावेश असलेल्या ब्राझील संघाने त्यावर्षीचाही विश्वकरंडक नावावर केला. त्यामध्ये पेलेंचा वाटा अनमोल होता. त्यामुळेच खऱ्याअर्थाने पेलेंनी देवत्व बहाल झाले.

हेही वाचा: भविष्याची गोष्ट; जाणून घ्या तुमच्या राशीचे स्वभाव वैशिष्टये


फुटबॉलचा निरोप


पेलेंचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १८ जुलै १९७१ रोजी ‘रिओ दि जानेरियो’ येथे युगोस्लाव्हियाविरुद्ध होता. पेले मैदानावर असताना, ब्राझील संघाने ६७ विजय, १४ अपराजित आणि ११ पराभव आणि तीन विश्वकरंडक जिंकण्याचा विक्रम केला होता. पेले आणि गॅरिंचा मैदानावर असताना ब्राझीलने एकही सामना गमावला नव्हता हे विशेष. गॅरिंचाने १९६६ मध्ये हंगेरीविरुद्ध हरवलेला एकमेव आंतरराष्ट्रीय सामना होता, ज्यामध्ये पेले दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. आणि अखेर युगोस्लाव्हियाविरुद्धचा हा सामना खेळून पेलेंनी त्यांच्या सर्वांत प्रिय खेळाचा निरोप घेतला.

पेलेंना मिळालेले पुरस्कार


कोपा लिबर्टाडोरेस: १९६२, १९६३
कॅम्पियोनाटो पॉलिस्टा: १९५८, १९६०, १९६१, १९६२,१९६४, १९६५, १९६७, १९६८, १९६९, १९७३.
ताका ब्राझील: १९६१, १९६२, १९६३, १९६४, १९६५
टोर्नियो रॉबर्टो गोम्स पेड्रोसा: १९६८
टोर्नियो रिओ-सो पाउलो: १९५९, १९६३,१९६४, १९६६
इंटरकॉन्टिनेंटल कप: १९६२, १९६३
रेकोपा इंटरकॉन्टिनेंटल: १९६८

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Football
go to top