फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१! | How Was the 2021 Year For Football World | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How Was the 2021 Year For Football World }

फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१!

- चंद्रकांत बोरूडे


२०२१ हे वर्ष फुटबॉलप्रेमी (FootBall)आणि गेल्या वर्षी कोरोनाने ग्रासलेल्या खेळाडूंसाठी खूप चांगले ठरले. पुन्हा एकदा प्रेक्षक फुटबॉल स्टेडिअमवर परतले. तसेच, या वर्षी असे अनेक प्रसंग आले की, ज्याने फुटबॉल चाहत्यांना आनंदाने उड्या मारायला लावल्या. २०२० मध्ये कोरोनामुळे(Corona) पुढे ढकलण्यात आलेल्या अनेक स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आल्या. ज्यामुळे यावर्षी अनेक नवीन विक्रमांची नोंद झाली. त्याचवेळी अशा अनेक घटना समोर आल्या ज्यांनी फुटबॉल चाहत्यांना धक्का बसला. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या अग्रगण्य खेळाडूंनी त्यांच्यातील जुनी स्पर्धा यंदाही कायम राखली. त्याचबरोबर दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना कधी आनंदी तर कधी खूप निराश केले. रोनाल्डो, मेस्सी आणि रामोस सारख्या जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी या वर्षी आपल्या जुन्या क्लबला सोडचिठ्ठी दिली. त्याच वेळी, २०१८ च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता गमाविलेल्या इटलीच्या संघाने युरो कप जिंकून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. चला तर मग अशाच काही यंदा फुटबॉल विश्वात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा मागोवा घेऊयात...(How was the 2021 year For football world Important Events)

हेही वाचा: कुस्तीला घरघर!

सायमन किरने वाचवले एरिक्सनचे प्राण

सायमन किरने वाचवले एरिक्सनचे प्राण

१. सायमन किरने वाचवले एरिक्सनचे प्राण


१२ जून २०२१ः फिनलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान डॅनिश खेळाडू क्रिस्टियन एरिक्सन हा हृदयविकाराच्या झटक्याने मैदानातच बेशुद्ध पडला. हाफ टाईमच्या आधी एरिक्सन जमिनीवर पडला आणि डॉक्टरांना मैदानावर येण्याचे संकेत दिल्याने रेफ्रिंनी लगेचच सामना थांबविला. तथापि, डॉक्टर मैदानात येण्यापूर्वी, संघाचा कर्णधार सायमन किरने घाईघाईने एरिक्सनकडे धाव घेतली आणि तो आपली जीभ गिळणार नाही याची खात्री केली. त्यानंतर त्याला मैदानावरच सीपीआर देण्यात आला. एरिक्सनची ही अवस्था पाहून जगभरातील फुटबॉल चाहते थक्क झाले होते. एरिक्सनवर नंतर शस्त्रक्रिया झाली आणि त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले.

लिओनेल मेस्सीने सातव्यांदा जिंकला बॅलन डी’ओर

लिओनेल मेस्सीने सातव्यांदा जिंकला बॅलन डी’ओर

२. लिओनेल मेस्सीने सातव्यांदा जिंकला बॅलन डी’ओर


२९ नोव्हेंबर २०२१ः सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने विक्रमी सातव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला. त्याने पोलंडच्या रॉबर्ट लेवांडोस्की आणि पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना मागे टाकून २०२१ चा पुरस्कार जिंकला. मेस्सीने यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ आणि २०१९ मध्ये बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला होता. मात्र, यावेळी त्याच्या विजेतेपदावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. रॉबर्ट लेवांडोस्कीला हा पुरस्कार न दिल्याने चाहत्यांनी आणि फुटबॉल विश्वातील अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. हा पुरस्कार न मिळाल्याबद्दल खुद्द लेवांडोस्की यानेही संताप व्यक्त केला.

हेही वाचा: एक चहावाला कसा बनला फुटबॉलचा देव?

अर्जेंटिनाने जिंकले कोपा अमेरिकाचे जेतेपद

अर्जेंटिनाने जिंकले कोपा अमेरिकाचे जेतेपद

३. अर्जेंटिनाने जिंकले कोपा अमेरिकाचे जेतेपद


११ जुलै २०२१ः अर्जेंटिनाने कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझीलचा १-० ने पराभव करून तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका विजेतेपदावर कब्जा केला. अर्जेंटिनासाठी एंजल डी मारियाने सामन्याच्या २२व्या मिनिटाला रॉड्रिगोच्या पासवर सामन्यातील एकमेव गोल केला. या विजयासह लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षाही संपली. अर्जेंटिनाचे हे एकूण १५वे कोपा अमेरिका विजेतेपद ठरले. यासह मेस्सीच्या संघाने उरुग्वेच्या विक्रमी १५ विजेतेपदांची बरोबरी केली.

इटलीने ५२ वर्षांनंतर युरो करंडक जिंकला

इटलीने ५२ वर्षांनंतर युरो करंडक जिंकला

४. इटलीने ५२ वर्षांनंतर युरो करंडक जिंकला


११ जुलै २०२१ः इटलीने एका अतिशय रोमांचक सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव करून युरो करंडक २०२० चे विजेतेपद पटकाविले. लंडनच्या ऐतिहासिक विंबले मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव केला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला ल्यूक शॉने गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. इटलीच्या लिओनार्डो बोनुचीने ६७व्या मिनिटाला गोल करून स्कोअर १-१ अशी बरोबरीत आणला. पूर्णवेळपर्यंत १-१ अशी बरोबरी होती. त्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचे मार्कस रॅशफोर्ड, जॅडन सँचो आणि बुकायो साका गोल करू शकले नाहीत. या विजयासह इटलीच्या संघाला ५२ वर्षांनंतर युरो करंडक जिंकण्याची संधी मिळाली. याआधी या संघाने १९६८ मध्ये या विजेतेपदावर कब्जा केला होता.

हेही वाचा: लॉकडाउनला करुयात नॉकडाउन

Cristiano Ronaldo

Cristiano Ronaldo

५. रोनाल्डोने केले अनेक नवे विक्रम


सध्या, जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक, ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू बनला आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वकरंडक पात्रता सामन्यात गोल करून इराणचा माजी स्ट्रायकर अली देईंचा सर्वाधिक १०९ गोलचा विक्रम मोडला. त्याच वेळी, रोनाल्डोने इटालियन लीग सेरी-ए मध्ये कॅग्लियारी विरुद्ध हॅटट्रिक केली आणि एकूण सर्वाधिक गोल करणाऱ्या ब्राझिलियन दिग्गज पेलेंलाही मागे टाकले. पेलेंचा ७६७ गोलचा विक्रम मोडून रोनाल्डो व्यावसायिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याच वेळी, रोनाल्डो चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू देखील बनला.

६. रोनाल्डो, मेस्सी आणि रामोस यांची क्लब सोडचिठ्ठी


दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि सर्जिओ रामोस यांनी यावर्षी आपला फुटबॉल क्लब सोडला. ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुव्हेंटस सोडले आणि मँचेस्टर युनायटेडशी पुन्हा करार केला. त्याचवेळी लिओनेल मेस्सीने बार्सिलोना सोडून पॅरिस सेंट जर्मनशी (पीएसजी) करार केला. तर सर्जिओ रामोसनेही रिअल माद्रिद सोडून पीएसजीमध्ये प्रवेश केला. तसेच, या वर्षी मँचेस्टर सिटी सोडून बार्सिलोनाबरोबर करारबद्ध झालेल्या सर्जिओ अग्युरोने हृदयविकारामुळे फुटबॉलला अलविदा केला. ३३ वर्षीय अॅग्युरोला एका सामन्यादरम्यान श्वास घेण्यास त्रास झाला होता.

हेही वाचा: मैदानावरच्या रणरागिणींचे पुढचे पाऊल!

 रोनाल्डोने दिला कोका-कोला धक्का

रोनाल्डोने दिला कोका-कोला धक्का


७. रोनाल्डोने दिला कोका-कोला धक्का


ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो करंडकादरम्यान पत्रकार परिषदेपूर्वी त्याच्या टेबलावरून कोका-कोलाच्या दोन बाटल्या काढल्या. रोनाल्डोने टेबलवरून बाटली काढताच जगभरात एकच गोंधळ उडाला. अधिक माहितीनुसार, पोर्तुगालच्या हंगेरीविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या या घटनेमुळे कोका-कोला कंपनीचे सुमारे ३० हजार डॉलर म्हणजेच २९३ अब्ज रुपयांचे नुकसान झाले. आता यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी होती की, रोनाल्डो त्याच्या तब्येतीची खूप काळजी घेतो. त्यामुळेच त्याने चांगल्या आरोग्यासाठी लोकांना कोल्ड्रिंक्सऐवजी जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यासाठी ही गोष्ट केली होती.

८. युरोपियन सुपर लीगमध्ये गोंधळ


एप्रिल महिन्यात युरोपियन फुटबॉलमध्ये भूकंप झाला जेव्हा युरोपातील १२ मोठे फुटबॉल क्लब एकत्र येऊन युरोपियन सुपर लीग स्पर्धेत सहभागी होण्याबाबत चर्चा झाली. या लीगचे प्रकरण समोर येताच यूईएफए चॅम्पियन्स लीग आणि इतर देशांच्या लीगचे अस्तित्व धोक्यात आले. योजनेनुसार, या लीगमध्ये युरोपातील अव्वल संघ सहभागी होतील आणि सर्व एकमेकांशी सामने खेळतील. त्यामुळे छोट्या क्लबचे अस्तित्वही धोक्यात आले होते. मात्र, बराच गदारोळ झाल्यानंतर १२ पैकी ९ संघांनी माघार घेतली. तर रिअल माद्रिद, बार्सिलोना आणि जुव्हेंटस या संघांनी आपली नावे मागे घेण्यास नकार दिला. मात्र, लीगचे आयोजन करण्याचे प्रकरण तूर्तास स्थगित ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान!

९. रॉबर्ट लेवांडोव्स्कीने नावे केले अनेक विक्रम


बायर्न म्युनिकचा स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्स्कीने या वर्षी जर्मन फुटबॉल इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या गर्ड मुलरचे दोन जुने विक्रम मोडले. लेवांडोव्स्की हा बुंडेस्लिगाचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. लेवांडोव्स्कीने वुल्फ्सबर्गविरुद्ध सामन्यात गोल करून हे यश संपादन केले. त्याने २०२१ मध्ये ३४ बुंडेस्लिगा सामन्यांमध्ये एकूण ४३ गोल केले. गर्ड मुलरने १९७२ मध्ये बुंडेस्लिगामध्ये ४२ गोल केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, लेवांडोव्स्कीने त्याचा ४१ वा गोल केला आणि बुंडेस्लिगा हंगामात सर्वाधिक गोल करण्याचा गर्ड मुलरचा विक्रम देखील मोडला. लेवांडोव्स्कीने या वर्षी एकूण ६९ गोल करून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक गोल करण्याच्या रोनाल्डोच्या विक्रमाची बरोबरीही केली.

१०. यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या ‘ड्रॉ’बाबत प्रश्न


यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम-१६ च्या ‘ड्रॉ’वरून वाद सुरू झाला. पूर्वी काढलेल्या ड्रॉनंतर, अनेक संघांनी त्यावर आक्षेप घेतला आणि यूईएफएला पुन्हा ‘ड्रॉ’ काढण्यास भाग पाडले. तांत्रिक बिघाडामुळे यूईएफएला पुन्हा एकदा ‘ड्रॉ’ काढावा लागल्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ होती. मात्र, या वादानंतर यूईएफएने ही चूक बाह्य सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे झाल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top