
कोविड-19 नामक विषाणूने गेल्या दिड-दोन वर्षांत आशा-निराशा, आत्मविश्वास-अहंगड, प्रगती-अधोगती यांतील उन्नीस-बीस म्हणजे अल्प किंवा सुक्ष्म असा फरक दाखवून दिला. पर्यायाने जीवनाच्या व्याख्येचीच फेररचना झाली.
लॉकडाउनला करुयात नॉकडाउन
"मी कोणत्याही दुखापतीसमोर किंवा दुखापत होण्याच्या भितीसमोर स्वतःला शरण येऊ देणार नाही." रॅफेल नदाल, स्पेनचा टेनिसपटू
"मी रिटायर झाले ते नकारत्मकतेमधून, सततच्या भितीमधून, अनिश्चिततेमधून. अज्ञाताविषयीच्या संपूर्ण अनभिज्ञतेमधून." पी. व्ही. सिंधू, भारताची बॅडमिंटनपटू
पृथ्वीतलावर जणू काही कल्पनातीत अशा स्वनातीत वेगाने धावणाऱ्या प्रत्येकावर परिणाम केलेल्या कोविड-19 विषाणूमुळे लक्षात ठेवावीत किंबहुना अधोरेखित करून तोंडपाठ करावीत, अशी ही दोन वक्तव्ये. कोविड-19 नामक विषाणूने गेल्या दिड-दोन वर्षांत आशा-निराशा, आत्मविश्वास-अहंगड, प्रगती-अधोगती यांतील उन्नीस-बीस म्हणजे अल्प किंवा सुक्ष्म असा फरक दाखवून दिला. पर्यायाने जीवनाच्या व्याख्येचीच फेररचना झाली.
तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मानवी मर्यादा, क्षमतांच्या हाताबाहेर जाणारी परिस्थिती तशी वेळोवेळी उद्वभत असते. इंटरनेटचा वेग प्रकाशाला मागे टाकत असला तरी सर्व्हर हँग होतो. कितीही अत्याधुनिक अन् किंमती स्मार्ट फोन नेटवर्क अभावी निरुपयोगी ठरतो अन् पर्यायाने माणूस निरुत्तर बनतो. अवकाशात पर्यटक धाडणाऱ्या उद्योजकांची श्रीमंती काही लाख डॉलरने कमी होते. एका विषाणूने जगासमोर आव्हान निर्माण केले.
या पार्श्वभूमीवर खेळाच्या मैदानाकडे अन् मुळ विषयाकडे वळूयात. ऑलिंपिकचा विक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट, आजघडीचा लोकप्रिय फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो असे कोविड-19 पॉझिटिव्ह आले. याचा अर्थ मानवी क्षमता अन् मर्यादांच्या संदर्भात उत्तुंग कामगिरी केलेले दिग्गजही या विषाणूसमोर बीट झाले. यानंतरही क्रीडापटूंनी अॅक्शनमध्ये खंड पडू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
खरे तर त्यांच्यासमोरील आव्हान आणखी बिकट झाले होते. तसे पाहिले तर खेळाडूला नॉकडाउन होणे नवे नसते. हार-जीत हा खेळाचा अविभाज्य भाग असतो. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करता यावी म्हणून तो वैयक्तिक आवडीनिवडींवर काट मारून शिस्तीच्या चौकटीत स्वतःला लॉकडाउन करून घेत सरावात सक्रीय असतो. Practice makes man perfect ही उक्ती तो जगत असतो.
यानंतरही खेळाडूला कारकिर्दीत दुखापतींना सामोरे जावे लागले. फॉर्मला ग्रहण लागण्याच्या जोडीला एखादी वारंवार उद्भवणारी दुखापत त्याला जेरीस आणते. दुखापतींचे दोन प्रकार असतात. एक मानसिक अन् दुसरी शारिरीक. यातील शारिरीक दुखापतीला नॉकडाउन केलेल्या नदालची विचारसरणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. अलौकिक क्षमतेच्या जोरावर अतुलनीय कामगिरी केल्यानंतर नदालने हे उद्गार काढले. फ्रेंच ओपन जिंकण्याचा स्वतःचाच उच्चांक 13 पर्यंत वाढविणे, ही स्पर्धा जेथे पार पडते त्या रोलाँ गॅरोवर 100वा विजय संपादन करणे, समकालीन दिग्गज प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याच्या 20 ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या उच्चांकाशी बरोबरी साधणे, सलग 789 आठवडे जागतिक क्रमवारीत टॉप टेनमध्ये राहणे असे पराक्रम त्याने केले.
नदालने क्रमवारीच्या संदर्भात मुळातच अतुलनीय अशा उच्चांकाशी बरोबरी केली. टॉप टेनमधील स्थान सलग 789 आठवडे अबाधित राखून अमेरिकेच्या जिमी कॉनर्स यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. 789 आठवडे म्हणजे 15 वर्षे दोन महिने आणि वर एक आठवडा इतका होतो. कॉनर्स यांचा विक्रम त्याने मग मोडला. 2003 या मोसमाच्या प्रारंभी नदाल जागतिक क्रमवारीत 200च्या आत होता. त्यावेळी स्पेनचा एक क्ले कोर्ट स्पेशालिस्ट म्हणजे मातीच्या कोर्टवर हुकमी खेळ करण्याचे कौशल्य आणि क्षमता असलेला खेळाडू असा होता. त्यानंतर नदालने ग्रास कोर्टवरील सर्वोच्च स्पर्धा सुद्धा जिंकली आणि मग एक परिपूर्ण तसेच अष्टपैलू टेनिसपटू म्हणून आपले स्थान टेनिसच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले.
2003च्या एप्रिलमध्ये टॉप हंड्रेड, ऑगस्टमध्ये टॉप फिफ्टी, 2004च्या ऑगस्टमध्ये पहिले एटीपी विजेतेपद, 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश, माँटे कार्लो येथील स्पर्धेत फेडररला हरवून पहिले मास्टर्स विजेतेपद अशी आगेकूच त्याने केली. त्या मोसमात एप्रिल महिन्यात तो टॉप टेनमध्ये आला. मग नदालने जी यशोमालिका साकारली ती अतुलनीय अशीच आहे. नदालची ही वाटचाल सोपी नाही. त्याला कारकिर्दीत दुखापतींचा अनेकदा सामना करावा लागला. यात अलिकडे पोटाच्या स्नायूंची दुखापत त्याला त्रस्त करीत होती.
नदाल म्हणतो की, सर्वोत्तम टेनिस खेळण्यास सज्ज झाल्याचे मला वाटते. भूतकाळातील दुखापतींची चिंता मी करीत नाही. एखाद्या स्पर्धेत खेळायला आल्यानंतर मी दुखापतींचा विचार करीत नाही, अन्यथा मी खेळलो नसतो. मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यास मी सज्ज होतो. आधीच्या वर्षांच्या तुलनेत परिस्थिती वेगळी आहे हे खरे आहे. नव्या आव्हानांशी तुम्हाला जुळवून घ्यायचे आहे. काही गैरसोयी स्विकारव्या लागतील. अशावेळी मी सर्वोत्तम टेनिस खेळण्यास सज्ज आहे.
नदालची दुखापत ही फक्त शारिरीक होती. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने शारिरीक अडथळ्यांवर मात केली. दुखापतींच्याच संदर्भात अशीच लक्षवेधी प्रतिक्रिया व्यक्त केली ती सिंधूने. मी रिटायर होतेय अशा ट्विटमुळे एकच खळबळ उडाली. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे सुद्धा त्यामुळे चकले.
श्वास रोखून धरलेल्या या ट्विटमधील प्रत्येक वाक्य गुढ वाढविणारे, कोड्याचा गुंता वाढविणारे होते. गेल्या काही दिवसांपासून भावनेत स्पष्टता आणण्यासाठी विचारमग्न होते. त्यासाठी झगडावे लागत असल्याचे मी मान्य करते. यात इतके काहीतरी चुकीचे वाटत असते की जे तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळेच मी म्हणते की, होय, आता माझी मोहिम पूर्ण झाली आहे. (मी रिटायर झाले आहे) तुम्हाला धक्का बसला असेल तर ते मी समजू शकते, पण माझा दृष्टिकोन तुम्हाला समजेल आणि तुम्ही पाठीशी उभे राहाल अशी आशा आहे.
मग सिंधू नेमकी कशातून रिटायर झाली असा प्रश्न चाहत्यांना पडला. तर याचे उत्तर ती पुढे देते. ती सांगते की, सध्याच्या अशांततेच्या, अस्वस्थतेच्या स्थितीतून मी रिटायर व्हायचे ठरविले. मी रिटायर झाले ते नकारत्मकतेमधून, सततच्या भितीमधून, अनिश्चिततेमधून. अज्ञाताविषयीच्या संपूर्ण अनभिज्ञतेमधून रिटायर व्हायचे मी ठरविले. याहून महत्त्वाचे म्हणजे स्वच्छतेबाबत दुय्यम दर्जा आणि विषाणूबाबत उदासीन दृष्टिकोनामधून. यातून सिंधूने काय साध्य केले याचेही उत्तर मिळते ती म्हणते की, मी कडवी झुंज दिल्याशिवाय हार मानणार नाही. भितीवर विजय मिळविल्याशिवाय मी हार मानणार नाही आणि जोपर्यंत जग आणखी सुरक्षित होत नाही तोपर्यंत मी ही वाटचाल कायम ठेवेन.
सिंधूच्या या वाक्यातील जग हा शब्द महत्त्वाचा आहे. खरे तर खेळाडूसाठी त्याचा सराव, त्याची स्पर्धा, त्याचा सामना, त्याचा गुण, त्याचा विजय हेच सर्वस्व असते. अशावेळी नदाल असो किंवा सिंधू, हे त्यांच्या कामगिरीद्वारे वैशिष्ट्यपूर्ण अशी विचारसरणी सादर करतात. मुळात ती त्यांनी अंगी बाणवलेली असते, स्वतःच्या मनावर बिंबवलेली असते. कोरोनाच्या जागतिक साथीने जगात थैमान घातले असताना सगळीकडे नकारात्मकता ठासून भरली आहे. उद्योगपती इलॉन मस्क यांनी अवकाशात पर्यटक धाडण्याच्या प्रकल्पात लक्षणीय टप्पा गाठला. चंद्राच्या सुर्यप्रकाशित भागात पाण्याचे अंश आढळले. हायड्रोजनवर चालणाऱ्या मोटारीचा प्रकल्पही एक पाऊल पुढे गेला. यानंतरही एका विषाणूवर कोणती गोळी द्यायची, त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी कोणते औषध घ्यायचे, आणखी परिणामकारक ठरेल अशी लस कशी शोधायची याचे उत्तर शोधण्यासाठी जगभरातील संशोधक झटत आहेत.
कोरोनाच्या संदर्भात जगातील विमानसेवा, पर्यटन ठप्प झाले असताना खेळाच्या मैदानावरील अॅक्शनचे कमबॅक होत आहे. प्रेक्षकांशिवाय खेळ ही अशक्य-अनपेक्षित वाटणारी घडामोड घडते आहे. आखातामध्ये आयपीएल अशीच रंगते आहे. स्टेडियममधील खुर्च्यांवर प्रेक्षकांची कट-आऊट लावण्यात आली आहेत. फ्रेंच ओपनच्या संयोजकांनी तर प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धा घेतली. खेळाचे आणि खेळाडूंचे वेगळेपण असे असते की खेळ हे खरेखुरे व्यासपीठ, तर खेळाडू हा अस्सल पात्र असतो. अगदी रुपेरी पडद्यावरील जेम्स बाँड सुद्धा शेवटी एक पात्र असतो, जो कितीही जिगरबाज असला तरी वास्तववादी नसतो.
खेळाच्या मैदानावर रिटेक नसतो, दुसरी संधी नसते, ती मिळवायची असेल तर पुढील सामन्यापर्यंत वाट पाहावी लागते. मुख्य म्हणजे त्या सामन्याची सुरवात शून्य गुणापासून करायची असते. दरवेळी खाते नव्याने उघडावे लागते. त्याचे मुदत ठेवीत रुपांतर करण्यासाठी बेमुदत सराव करावा लागतो.
यशाला शॉर्टकट नसतो ही उक्ती खेळाडू आचरणात आणतात. 2020 मध्ये या उक्तीची व्याख्या आणखी व्यापक झाली. ती म्हणजे लॉकडाउनला करा नॉकडाउन. त्यासाठी शरीर आणि मन अशा दोन्ही पातळ्यांवर सुसज्ज व्हा, संघटित व्हा आणि संघभावनेने काम करा हाच संदेश देणारे नदाल आणि सिंधू हे प्रातिनिधीक क्रीडापटू ठरतात. घातक अशा कोविड-19 विषाणूचे हे फळच ठरेल. तसेच फळ मिळविण्यासाठी अन् त्याची गोडी चाखण्यासाठी सज्ज होऊयात.