
संजीव भागवत
sanjeev.bhagwat@esakal.com
हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने लादण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात प्रा. दीपक पवार यांनी एक शांत, पण प्रभावी आंदोलन उभे केले. सरकारची माघार शिवसेना-मनसेच्या पथ्यावर पडल्याने त्यांचा विजयी मेळावा आज होत असला, तरी प्रा. पवार यांनी राज्यात तयार केलेल्या आंदोलनाची मूळ धार त्याला आहे, हे नाकारून चालणार नाही.
महाराष्ट्र राज्यात एकेकाळी शिवसेनेसारखे राजकीय पक्ष प्रभावीपणे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करीत होते. एकीकडे हिंदी मतदारांची वाढती संख्या आणि दुसरीकडे मराठी माणसांचे घटते प्रमाण, अर्थकारण अन् हिंदी-परप्रांतीय उद्योजक यांच्याशी असलेल्या हितसंबंधामुळे मराठीचे आक्रमक राजकारण करणारे राजकीय पक्ष हळूहळू केवळ निवडणूक काळातच तोंडी लावण्यापुरते या मुद्द्याचा वापर करू लागले.