

Public Space and Religious Rights
esakal
राहुल गडपाले - rahulgadpale@gmail.com
एखादा रस्ता किंवा सोसायटीची सार्वजनिक वापरायची जागा कोणत्याही एका समुदायासाठी चिन्हांकित करणे योग्य आहे का, हा मूळ प्रश्न आहे. असहिष्णुतेच्या पांढऱ्या पट्ट्याचा वाद वातावरण बिघडत असतानाही मुद्दाम उकरून काढला जात आहे. धार्मिक प्रथा आणि सार्वजनिक जागेचा वापर यामधील तणावातून तो निर्माण झाला; पण यातून एका विशिष्ट समाजाकडून दुसऱ्या विशिष्ट समाजावर दबाव टाकायचा प्रयत्न केला जातोय, हे मात्र विसरता कामा नये.
लोकशाही जीवनपद्धती आणि धर्मनिरपेक्षतेला आवश्यक असलेली मूल्ये मुळाशी असलेला आपला भारतीय समाज आहे, असे आपण मानतो. निदान अगदी अलीकडेपर्यंत तरी तशी परिस्थिती होती. त्यामुळे आपल्यात असलेले सांस्कृतिक वैविध्य जगभरात आपण मानाने मिरवत होतो. आता या सांस्कृतिक वैविध्याची मान मोडून काढण्याचा घाट आपल्यातीलच काही महाभागांनी घातलेला दिसतो. त्यामुळे सामाजिक समरसतेच्या नाजूक धाग्याला नख लावण्याचे अनेक हिडीस प्रसंग आपल्या अवतीभोवती घडताना दिसत आहेत. त्यातही मुंबईसारख्या जागतिक आणि सर्वसमावेशक म्हणवल्या जाणाऱ्या शहरात जर असे प्रकार होत असतील, तर ती नक्कीच चिंतेची बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जैन धर्मीयांनी सार्वजनिक जागांवर रेघोट्या ओढून सामाजिक सौहार्दाची ऐशीतैशी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. स्वतःला कायम कमी लेखणाऱ्या काही दिलदार मनाच्या मराठी माणसांना त्यात काही चुकीचे वाटले नाही. एका सर्वसामान्य मराठी माणसाने त्याविरोधात आवाज उठवला आणि जेव्हा या रेघोट्या आपल्या दारापर्यंत यायला लागल्या तेव्हा कुठे हे आच्छादन नसून आक्रमण आहे, हे समजायला लागले. मात्र तोपर्यंत पुरेसा वेळ निघून गेला होता.