
स्मृती सागरिका कानुनगो
पुरी येथे नुकतीच जगन्नाथाची यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीमध्ये तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर डझनभर भाविक जखमी झाले. या घटनेनंतर ओडिशात सध्या बिजू जनता दल आणि काँग्रेस या विरोधकांनी भाजप सरकारवर एकच हल्ला चढवला आहे. ही दुर्घटना एक निर्णायक वळण ठरेल की पूर्वीप्रमाणेच ही घटना विस्मरणात जाईल, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या निमित्ताने भारताच्या विविध राज्यांत होणाऱ्या धार्मिक यात्रा, उत्सव येथील गर्दीचे व्यवस्थापन कसे केले जाते, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा नुकतीच पार पडली. भक्ती, प्रेम आणि एकता यांचा एक भव्य-दिव्य उत्सव म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. मात्र, या रथयात्रेदरम्यान एक दुःखद घटना घडली. गुंडीचा मंदिराजवळ गर्दीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि एक डझनाहून अधिक भाविक जखमी झाले. वार्षिक रथयात्रा ही केवळ एक धार्मिक उत्सव नसून, ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे. भारतभरातून आणि जगभरातून लाखो भाविक पुरी येथे दर वर्षी येतात. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवी यांचे भव्य रथ ग्रँड रोडवरून नागरिकांच्या मदतीने ओढले जातात. ‘जय जगन्नाथ’च्या घोषणेने वातावरण उत्साहित होते. शतकानुशतकांची ही परंपरा अतिशय उत्साहात पार पडते. हिंदू नसलेल्या भक्तांना जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परवानगी नाही. त्यामुळे भगवंताचे दर्शन सार्वजनिक घेण्याची ही एकमेव संधी असते. त्यामुळे रथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळते.