

Bangladesh violence 2025
esakal
विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंसाचाराने पुन्हा डोके वर काढले असून, यामध्ये अल्पसंख्याक आणि माध्यमांनाही लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारामध्ये भारतविरोधी भावनाही स्पष्ट दिसत आहे. हिंसाचाराचा हा भडका दीर्घकाळ साचलेल्या तणावाचा आणि अपूर्ण संक्रमण प्रक्रियेतून उडाला आहे. त्यामुळे, बांगलादेशासाठी हे निर्णायक वळण आहे.
डिसेंबरच्या उत्तरार्धात बांगलादेशमध्ये उसळलेला हिंसाचार हा केवळ एखाद्या क्षणिक राजकीय असंतोषाचा भाग नव्हता, तर ते देशातील दीर्घकाळ साचलेल्या तणावांचे, अपूर्ण संक्रमण प्रक्रियेचे आणि वैचारिक संघर्षांचे स्फोटक प्रकटीकरण आहे. लोकशाही, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा यांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे, अशा वळणावर बांगलादेश उभा असल्याचे राजधानी ढाक्यासह अन्य प्रमुख शहरांमध्ये घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते. प्रसारमाध्यमे, सांस्कृतिक केंद्रे, अल्पसंख्याक समुदाय आणि परकीय राजनैतिक कार्यालयांना लक्ष्य करणारा हिंसाचार ही केवळ अराजकाची चिन्हे नाहीत, तर ती सत्ता, वैधता आणि राष्ट्रीय ओळख यांवरील संघर्षाची लक्षणे आहेत.