

Rahul Gandhi Leadership
esakal
सुनील चावके - saptrang@esakal.com
राहुल गांधी यांच्या हाती काँग्रेसची सूत्रे देऊन नियतीने आणि काँग्रेसजनांनी त्यांना जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीं यांच्यापेक्षा कितीतरी जास्त संधी दिली. पण उपयुक्तता शाबूत असलेल्या पक्षातील तसेच मित्र पक्षांतील अनुभवी नेत्यांच्या साथीने भविष्यासाठी समविचारी आघाडीची बांधणी करण्याऐवजी त्यांनी तब्बल २२ वर्षे वाया घालवली. राहुल गांधींनी ‘इंडिया’ आघाडीतील मित्र पक्षांना ताकद देण्यासाठी कोणतेही मनःपूर्वक प्रयत्न केले नाही. उलट पश्चिम बंगाल आणि केरळमधील निवडणूक प्रचारात त्यांनी भाजप सोडून ममता बनर्जी आणि पिनराई विजयन यांनाच लक्ष्य केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील समविचारी पक्षांविषयी अपेक्षा बाळगून असलेल्या देशातील कोट्यवधी मतदारांच्या पदरी त्यामुळे घोर निराशाच पडली आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर देशाच्या राजकारणात नाट्यमय आणि वेगवान घडामोडींचे पर्व सुरू झाले आहे. निर्वाचित पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अखंड ४ हजार ३९८ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध रोखणे आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला अवघड व्हावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील मित्र पक्षांच्या हाती शून्य आले. त्यामानाने काँग्रेसला केरळमध्ये सत्तेचा लाभ आणि तमिळनाडूमध्ये सत्तेत वाटा मिळविण्यात यश आले. पण मित्र पक्षांच्या तोट्याच्या आणि आपल्या अल्पलाभाच्या आनंदात हरखून भाजपला टक्कर देण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्येच आहे, या भ्रमात न राहता आपल्या नेतृत्वात वाया गेलेल्या १२ वर्षांची भरपाई करण्यासाठी २४ तास राजकारण करण्याचे दुप्पट आव्हान काँग्रेस आणि राहुल गांधींपुढे उभे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राजकारण लक्षात घेतले, तर काँग्रेस आणि झपाट्याने कमकुवत होणारे मित्र पक्ष टिकाव धरू शकले नाही तर देशाच्या राजकारणात विरोधी आघाडीची प्रचंड मोठी पोकळी निर्माण होण्याचे संकट ओढवणार आहे.