
काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या वर्षभरापासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. एक वर्षांत त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येणार नाही. मात्र, त्यांनी सुरुवात सकारात्मक केली आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांना अद्याप सुधारणा करण्याची गरज असून, पुढील चार वर्षे त्यांना ठाम आणि आक्रमक राहावे लागणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या वर्षभरापासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. या कार्यकाळामध्ये त्यांचा संसदेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध मुद्द्यांवरून ते सरकारला जबाबदार धरतात आणि नागरिकांचे मुद्दे संसदेत मांडण्याचे काम करीत आहेत. विरोधी पक्षनेत्याची भूमिका राज्यघटनेमध्ये नमूद केली नसली तरीही गांधींना ही भूमिका बजावताना महत्त्वाची संधी मिळते. वरिष्ठ नोकरशहा, सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांची निवड करण्यात मदत करण्याची आणि सरकारवर बारकाईने नजर ठेवण्याची त्यांना संधी मिळते. ते विविध संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही राहू शकतात.