
सुनील चावके
दीर्घकाळ विरोधी बाकांवर बसून सत्तेत येण्याची आशा धूसर होत जाते, तशी पक्षसंघटना खिळखिळी होते. पण तरीही पक्षनेतृत्वाविषयी मतदारांच्या मनात आशा निर्माण झाल्यास परिस्थिती प्रतिकूल असूनही यश मिळू शकते. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. राहुल गांधी हे लक्षात घेणार का?
आजवर झालेल्या अठरा लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात काँग्रेस पक्ष प्रथमच लागोपाठ तिसऱ्यांदा शंभराच्या आत गुंडाळला गेला. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचे चित्र असे होते. २०१४ : भाजप २८२, काँग्रेस ४४, २०१९ : भाजप ३०३, काँग्रेस ५२, २०२४: भाजप २४०, काँग्रेस ९९. काँग्रेस पक्षाने लढविलेल्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील ही सलग तिसरी नीचांकी कामगिरी. या तिन्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस अशा लढती झाल्या होत्या.