
डॉ. प्रकाश पवार
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे राज्यारोहण २ एप्रिल १८९४ रोजी झाले होते. त्यामुळे १९व्या शतकाच्या शेवटी छत्रपती शाहू महाराजांचा शासनव्यवहार सुरू झाला. त्यांच्या शासन व्यवहाराचे मुख्य स्रोत चार होते. ते व्यापक अर्थाने आधुनिकतेच्या संदर्भातील होते. छत्रपती शिवरायांचा विचार, महात्मा फुले यांचा विचार, विज्ञान आणि शिक्षण पद्धती या चार विचारांच्या चौकटीमध्ये राजर्षींनी आपला शासन व्यवहार केला.
छत्रपती शाहू महाराजांच्या शासन व्यवहारांचे एक प्रेरणास्थान छत्रपती शिवराय हे होते. शिवरायांनी न्यायावर आधारलेल्या आदर्श समाजाची संकल्पना वस्तुस्थितीमध्ये उतरवली होती. शाहू महाराजांच्या डोळ्यासमोर शिवरायांची न्यायावर आधारलेली आदर्श समाजाची संकल्पना होती.