esakal | बृहत्तर भारतात रामायणावर तिकिटे
sakal

बोलून बातमी शोधा

Ramayan Tickets}

बृहत्तर भारतात रामायणावर तिकिटे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अजय वर्तक

बृहत्तर भारतातही, अर्थात ज्या देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार झालेला दिसतो, अशा अनेक देशांनी आपल्या टपाल तिकिटांवर रामायणातील प्रसंग आणि त्यातील व्यक्तिरेखा चित्रित केल्या आहेत. त्या-त्या देशातील प्रथा, श्रद्धा, व्यक्तींचा प्रभाव त्या तिकिटांवर दिसतो.

प्राचीन काळापासून कोणत्याही सोयी-सुविधा नसताना साहसी प्रवासी, व्यापारी, असे भारतीय लोक जमिनीमार्गे अथवा समुद्रमार्गे भारताबाहेर गेले. तेथे त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या व आपली संस्कृती रुजवली.

दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये रामायणाची मूळ कथा व त्यातील व्यक्तिरेखा त्याच राहिल्या; परंतु स्थानिक प्रथा, श्रद्धा, व्यक्ती यांचा प्रभाव त्या-त्या देशांतील रामायणातून व्यक्त होताना दिसतो. आपल्या शेजारील अनेक देशांनी त्यांच्या टपाल तिकिटांवर रामायणाला स्थान दिल्याचे आढळते.

नेपाळमध्ये सीतेचा गौरव

नेपाळ हा आपला शेजारील देश. रामपत्नी (जनक राजकुमारी) सीता हिचा जन्म नेपाळमधील जनकपूर येथे झाला, अशी समजूत आहे. नेपाळी भाषेतील ‘भानुभक्त रामायण’ लिहिणारे एकोणिसाव्या शतकातील कवी भानुभक्त आचार्य यांच्या गौरवार्थ दोन तिकिटे १९६२ व २०१३ मध्ये व एक चांदीचे नाणे २०१५ मध्ये काढण्यात आले. तसेच, नेपाळी भाषेतील ‘सिद्धी रामायण’ लिहिणारे सिद्धिदास महाराज यांच्या गौरवार्थ १९८० मध्ये तिकीट काढण्यात आले.

१९६७ मध्ये रामनवमीनिमित्त कोदंडधारी राम व सीता असलेले तिकीट व प्रथम दिवस आवरण काढलेले आहे. ७ मे १९६८ रोजी सीता जयंतीच्या निमित्ताने तिकीट काढले. या तिकिटावर सीता व जनकपूर येथील सीता मंदिर दाखवलेले आहे. १९७४ मध्ये जनक राजावरील तिकीट काढले. १९९१ मध्ये राम-सीता विवाह मंडप, जनकपूर हे दृश्य असलेले तिकीट काढले.

लाओसमध्ये तिकिटांचा संच

लाओसचे मूळ नाव ‘लवदेश’. हे नाव रामाचा मुलगा ‘लव’ याच्यावरून आले. १९५५ मध्ये रामायणावर आधारित ६ तिकिटांचा संच काढला. रामायणाची लाओ संहिता ‘फ्रा लाक फ्रा राम’मध्ये चित्रित केलेल्या व्यक्तिरेखा तिकिटावर आहेत. पहिल्या तिकिटावर राम-सीता, दुसऱ्या तिकिटावर रामायणावर आधारित जो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ तिथे केला जातो, त्यातील व्यक्तिरेखा आहेत. तिसऱ्या तिकिटावर रामाचे चित्र आहे. रावण चौथ्या तिकिटावर दाखविला असून, पाचव्यावर हनुमान, सहाव्यावर वानर आहे.

१९६९ मध्ये रामायणावर आधारित ८ तिकिटांचा संच काढला. यातील एका तिकिटावर जटायू-रावणाचे युद्ध चित्रित केले आहे. एकावर सीता अग्निपरीक्षा देत असल्याचे चित्रित केले आहे. १९७० मध्ये एक तिकीट काढले. त्यावर अंगद मेघनादचे शिर ताटात घेत असल्याचे दृश्य आहे. १९७१ मध्ये काढलेल्या तिकिटावर मत्स्य-हनुमान यांचे युद्ध दाखविले आहे.

२००४ मध्ये रामायणावर आधारित ४ तिकिटांचा संच काढला. एका तिकिटावर रामाने वालीच्या केलेल्या वधाचे दृश्य आहे. व्हिएनटिआन शहराजवळ असलेल्या झिंग कुअन बुद्ध मंदिरात हनुमान आणि मत्स्य यांचे दगडी शिल्प आहे. या दगडी शिल्पाचे चित्र असलेले एक तिकीट २००६ मध्ये काढण्यात आले.

कंबोडियात हनुमानावर तिकिटे

आग्नेय आशियातील एक महत्त्वाचा देश. या देशाचे नाव कम्बू या भारतीय राजावरून पडले. जगातील सर्वांत मोठा विस्तार असलेले देऊळ अंकोरवट (विष्णूचे) याच देशात आहे. १९६४ मध्ये कंबोडियाने हनुमानावरील पाच तिकिटांचा संच काढला. १९६७ मध्ये एका तिकिटावर राम- सीतेच्या भूमिकेत कलाकार नृत्यनाट्य सादर करीत आहेत, असे दाखविले आहे. २००१ मध्ये मस्त्यकन्या आणि हनुमान चित्रित केलेले एक तिकीट काढले. २००६ मध्ये पाच तिकिटांचा संच काढला. त्‍यावर अनुक्रमे लव-कुश धनुर्विद्येचा सराव करीत आहेत; राम, सीता, रावण आणि हनुमान चित्रित केले आहेत.

इंडोनेशियात रामायणावर संच

आग्नेय आशियातील बेटांचा देश इंडोनेशिया. हिंदू देव-देवतांचा आदर राखून या देशानेही त्यावरील पोस्टाची तिकिटे काढलेली आहेत. १९६२ मध्ये ६ तिकिटांचा संच रामायणावर काढला. या तिकिटांवर अनुक्रमे जटायू, हनुमान, रावण, मारीच, सीता, राम हे चित्रित केलेले आहेत. १९६२ मध्ये इंडोनेशियात चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने काढलेल्या तिकिटावर धनुर्धारी राम दाखविला आहे. १९७१ मध्ये ‘रामायण- आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त दोन तिकिटे काढली. एकावर राम-सीता व हरिणाच्या रूपातील मारिच आहे. दुसऱ्यावर राम, हरिणाच्या रूपातील मारिच व त्याच्यामागे रावण चित्रित केले आहे. २०१० मध्ये तीन तिकिटांचा संच काढला. त्यातील एक तिकीट हनुमानावरील आहे.

२०१६ मध्ये चिनी ‘माकड वर्ष’ साजरे करण्यासाठी इंडोनेशियाने तीन तिकिटांचा संच काढला. त्यात अनुक्रमे सुग्रीव, अंगद आणि हनुमान यांवर तिकिटे आहेत. २०१८ मध्ये भारत-इंडोनेशिया यांच्यातील राजकीय संबंधाला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडोनेशियाने रामायणावर एक तिकीट काढले.

थायलंडच्या तिकिटांवर मुखवटे

थाई लोकांचा प्रदेश म्हणून थायलंड. याचे मूळ नाव सयाम किंवा श्याम आहे. या देशाचे राजे आजही स्वतःला राम ही बिरुदावली लावतात. मे २०१९ मध्ये या देशाच्या गादीवर आलेल्या राजाचे नाव दहावा राम आहे.या देशाने १९७३ मध्ये रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित आठ तिकिटांचा संच काढला. यात अशोक-वाटिका, रावणाची छत्री, समुद्र पार करीत असताना वानर सेना इत्यादी दृश्यांचा समावेश आहे.

रामायणाची थायलंडमधील संहिता रामाकेन. यातील पारंपरिक नृत्य-नाटिका ‘खोन’. यामध्ये सर्व व्यक्तिरेखा, अनुरूप असे मुखवटे घालून वावरतात. थायलंडने १९७५ मध्ये चार तिकिटांचा संच या मुखवट्यांवर काढला. यात तोसकंथ म्हणजेच दशकंध रावण, कुंभकर्ण, राम, हनुमान यांचे मुखवटे आहेत.

१९८१ मध्ये एक तिकीट काढले. या तिकिटावर खोन या नृत्य-नाटिकेत वापरल्या जाणाऱ्या मुखवट्याचे चित्र आहे. हा मुखवटा इंद्रजितचा (मेघनाद) आहे. १९९६ मध्ये काढलेल्या तिकीटावर सुवर्ण-मृग मारिचाची शिकार करताना राम आहे. २००५ मध्ये चार तिकिटांचा संच काढला. यात राम- सीतेची भेट, रावण, हनुमान आणि राम-रावण युद्ध दाखविली आहे.

त्रिमितीय पद्धतीची विशेष तिकिटे

थायलंडने ‘टपाल तिकीट प्रदर्शन २००९’च्या निमित्ताने त्रिमितीय पद्धतीची छपाई असलेली दोन विशेष तिकिटे ‘हून लॅकोर्न लेक’ या पारंपरिक थाई कठपुतळी खेळावर काढली. हा खेळ रामायणावर आधारित अाहे. २०१३, २०१४ व २०१५ मध्ये ‘थाई वारसा संरक्षण’ या कार्यक्रमांतर्गत ‘खोनमधील मुखवटे’ या विषयावर प्रत्येक वर्षी आठ तिकिटांचा संच काढला. २०१५ मधील तिकिटावर हनुमानाचे उघडे तोंड दाखविले असून, त्या मुखात राम आराम करीत आहे, असे दृश्य चित्रित केले आहे. २०१६ मध्ये थायलंड-इंडोनेशिया या दोन देशांनी मिळून दोन तिकिटांचा संच काढला. यात रामायणातील विविध प्रसंग चित्रित केले आहेत. रामायणातील प्रसंगांवर इतर काही देशांनीसुद्धा तिकिटे काढली आहेत.

ग्रेनाडा : कॅरेबियन समुद्रातील या देशाने १९९३ मध्ये एका तिकिटावर अशोक-वाटिकेत हनुमान सीतेचे संरक्षण करीत असल्याचे दृश्य दाखविले आहे.

झेक रिपब्लिक : युरोपातील या देशाने २००९ मध्ये राम-सीता आणि हनुमान असलेले एक तिकीट काढले.

(लेखक देशविदेशातील टपाल तिकिटांचे अभ्यासक आहेत.)