

ओंकार वर्तले
ovartale@gmail.com
रामटेकशिवाय तुमची विदर्भातील भटकंती अपूर्णच म्हटली पाहिजे. याचे कारण रामटेकच्या इतिहासात आणि धार्मिक महत्त्वतेत दडले आहे. रामटेक म्हणजे प्रभू रामाची टेकडी. रामचंद्रांनी वनवासकाळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून यास रामटेक नाव पडले, अशी आख्यायिका या भागात सांगितली जाते. याशिवाय पौराणिक काळातले संदर्भही या ठिकाणाला चिकटलेले दिसतात.
या टेकडीवर विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला व त्याच्या रक्ताने येथील दगड तांबडे झाले म्हणून यास ‘सिंदूरगिरी’ असेही नाव पडल्याचे सांगितले जाते. या ठिकाणाबाबत आणखी एक संदर्भ आपल्याला चकित करतो तो म्हणजे महाकवी कालिदास यांचा. महाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यांतील ‘मेघदूत’ या काव्याची कथाही या रामटेकवर म्हणजेच रामगिरीवर घडल्याचे सांगितले जाते. तर असे अनेक संदर्भ लाभलेले हे रामटेक आपल्यासारख्या भटक्यांची पावले वळवायला भाग पाडते.