
जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’(१९७५)तील क्रूरकर्मा डाकू गब्बरसिंग हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील आजही गाजत असलेला खलनायक. अमिताभ बच्चनलाही दिग्दर्शक रामगोपाल वर्माने अतिशय हट्टाने केलेल्या ‘शोले’ची अतिशय स्वैर, बोथट रिमेक केलेल्या ‘रामगोपाल वर्मा की आग’ (२००७) या चित्रपटात मूळ चित्रपटातील गब्बरसिंग साकारायचा मोह झाला. अमिताभसारखा अष्टपैलू, चतुरस्र, कसलेला कलाकारही अमजद खानने अतिशय थंड डोक्याने नि प्रसंगी अतिशय प्रचंड हिंसक अशा गब्बरसिंगचा ठसा पुसू शकला नाही. अमिताभने साकारलेल्या या क्रूरकर्मा व्यक्तिरेखेचे नाव बब्बन सिंग होते. हीच ‘शोले’तील गब्बरसिंगची प्रचंड गाजलेली भूमिका आपल्या हातून निसटली याचे रणजीतला अजिबात दु:ख नाही.
रमेश सिप्पीने ‘शोले’साठी एकेक कलाकार निश्चित करताना आपल्याच दिग्दर्शनातील ‘सीता और गीता’ (१९७२)मधील धर्मेंद्र, हेमा मालिनी व संजीवकुमार अगोदर निश्चित केले. मग अमिताभ बच्चन आणि जया बच्चनही निश्चित झाले. गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी डॅनी डेन्झोपाची निवड झाली. बंगलोरजवळ रामगढ गावाचा सेट लावला जाऊ लागला. ‘शोले’च्या मुहूर्तासाठी ३ ऑक्टोबर १९७३ ही तारीख निश्चित झाली. तत्पूर्वीच रमेश सिप्पीने मुंबईत ‘शोले’तील कलाकारांसोबत एक बैठक केली. सिनेमाच्या जगात त्याला स्टोरी सीटिंग म्हणतात. त्याचा एक फोटोही काढला गेला (आणि गंमत बघा, कालांतराने सोशल मीडियाच्या युगात तोच फोटो मोठ्याच प्रमाणावर व्हायरल होतोय. ‘शोले’त गब्बरसिंगच्या भूमिकेत डॅनी होता हे दिसतेय.)