
‘मटियाबुर्ज’ नाटक म्हणजे अकिरा कुरोसावा यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘राशोमोन’चा रंगमंचीय अवतार. दीड तास चालणारा नाट्यप्रयोग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि क्षणभरही सिनेमाची आठवण येऊ देत नाही. जागतिक पातळीवर गाजलेल्या चित्रपटाच्या कथानकावर नाटक सादर करायला वेगळीच हिंमत लागते. त्याबद्दल दिग्दर्शक आणि संहिताकारांचं विशेष अभिनंदन करायला हवं...
मुंबई मायानगरीत अनेक जण अनेक कारणांसाठी येत असतात. त्यातही एकेकाळी सिनेमात आणि आजकाल रंगभूमी, टीव्ही मालिका वगैरेंत नशीब आजमावण्यासाठी येणारे कलावंत मोठ्या संख्येने असतात. भारताच्या निरनिराळ्या राज्यांतून ते येत असतात. मध्य प्रदेशातून आलेल्या कलावंताचा एक अनौपचारिक गट आहे. यावर्षी हे कलाकार एकत्र आले आणि त्यांनी मध्य प्रदेशातील कलावंतांच्या नाटकाचा ‘मध्यरंग’ हा नाट्यमहोत्सव पहिल्यांदा भरवला. ‘मध्यरंग’ हा महोत्सव जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अंधेरीच्या ‘रंगशाला’ नाट्यगृहात पार पडला. या वर्षीच्या नाट्यमहोत्सवात चार नाटकं सादर झाली.
त्यातील मी ‘मटियाबुर्ज’ हे नाटक बघितलं. हे नाटक म्हणजे नामवंत जपानी सिने-दिग्दशक अकिरा कुरोसावा यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘राशोमोन’चा रंगमंचीय अवतार आहे. अकिरा कुरोसावा (१९१०-१९९८) यांचा ‘राशोमोन’ हा कृष्णधवल चित्रपट १९५० मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत या चित्रपटाचं गारूड टिकून आहे. हा चित्रपट आणि सत्यजित रे यांचा ‘पथेर पांचाली’ बघितला नाही, असा सिनेरसिक सापडणं केवळ अशक्य.