Ravi Amale writes special articles on disinfo in social media
Ravi Amale writes special articles on disinfo in social media

असा मारा समाजमाध्यमी डोहातील अफवांचा कालिया

आपल्या मनातले कोरोनाबाबतचे भय आता तसे कमी झाले आहे. याचा अर्थ कोरोना विषाणूने काढता पाय घेतला आहे असे नाही. याचा अर्थ एवढाच की भयाची विक्री करून करून भागलेली मंडळी आता इतर प्रचारी उद्योगात गुंतली आहेत. गेल्या फेब्रुवारीपासून कोरोना एके कोरोना करीत असलेल्या वृत्तवाहिन्यांनी आता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाकडे आपला मोहरा वळविला आहे. ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (बार्क) ही संस्था सातत्याने दूरचित्रवाणी वाहिन्यांतील कार्यक्रम, बातम्यांची संख्या आणि विषय, झालेच तर जाहिरातदार यांवर लक्ष ठेवून असते. त्याचे अहवाल ते नित्यनेमाने सादर करीत असतात. तर ही संस्था आणि नेल्सन नामक मार्केट रिसर्च संस्था यांनी मिळून याबाबतचा एक ताजा अहवाल नुकताच जाहीर केला.

या ‘देशभरातील दूरचित्रवाणीचे प्रेक्षक आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे वर्तन यांवर कोरोनाकाळाचा झालेला परिणाम’ नामक अहवालाची ही अकरावी आवृत्ती. त्यानुसार, २५ जुलै ते २१ ऑगस्ट या काळात दूरचित्रवाणीवर कोणत्या बातम्यांचे अधिक वर्चस्व होते तर ते सुशांतसिंह याच्या मृत्यूप्रकरणाशी निगडित असलेल्या बातम्यांचे. त्याचा मृत्यू १४ जूनला झाला. त्यानंतर महिना उलटल्यानंतरही आणि अगदी अजूनही त्याच्याशी संबंधित बातम्याच मोठ्या प्रमाणावर दाखविल्या जात आहेत. प्रेक्षकांना त्याचे अगदी अजीर्ण झाले आहे. परंतु तरीही त्याच बातम्या रेटल्या जात आहेत. 

तर या काळात पहिल्या क्रमांकावर होते सुशांतसिंह प्रकरण. त्याला खीळ बसली १ ते ७ ऑगस्ट दरम्यान. तेव्हा राममंदिर भूमीपूजनाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर चालविण्यात आल्या. शिवाय अधूनमधून विमान अपघात, महेंद्रसिंग धोणीची निवृत्ती, राजस्थानातील राजकीय पेचप्रसंग अशा बातम्यांनी भाव खाल्ला. या सगळ्यात कोरोनाच्या बातम्या मागेच पडल्या. त्यांचा मारा कमी झाला. कोरोनाबाबतचे भय कमी झाले, त्याला ही एक गोष्ट मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे.

पण आपल्या मनातील महामारीच्या महाभयगंडाला केवळ वृत्तवाहिन्याच जबाबदार होत्या का? तसे म्हणणे हा आपल्या हातातील मोबाईल फोनवरील अन्याय ठरेल!

अपमाहितीचा पूर

या काळात भयगंड पसरविण्यात, कोरोनाबाबतच्या विविध अफवा, विविध अपमाहिती - डिसइन्फर्मेशन, असत्ये, बनावट वृत्त पसरविण्यात आपल्या हातातील मोबाईलचा आणि वैयक्तिक संगणकांचा किती तरी मोठा वाटा होता. फेसबुक आणि व्हाट्सअॅप या समाजमाध्यमी डोहांमध्ये या काळात अफवांचा कालिया बिनदिक्कत गरळ ओकत होता आणि आपल्यातील अनेक जण ते डोळे झाकून प्राशन करीत होते. 

1. हा विखारी डोस केवढा होता, याचा अंदाज येतो इटलीतील ब्रुनो केस्लर फाऊंडेशनच्या ‘कोव्हिड-१९ ऑब्झर्व्हेटरी’ने केलेल्या अभ्यासातून. या संस्थेने कोरोनाबाबत जगातील ६४ भाषांत फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या ११.२ कोटी पोस्टचे आणि ट्विटरवरी ११.७ कोटी ट्विपण्यांचे  विश्लेषण केले. त्यात आढळले, की फेसबुकवरील ४० टक्के पोस्ट या अविश्वासार्ह स्त्रोतांकडून प्रसिद्ध झालेल्या होत्या, तर सुमारे ४२ टक्के ट्विपण्या या बॉट्सने - म्हणजे संगणकीय प्रोग्रामद्वारे - केलेल्या होत्या, तर ४० टक्के अविश्वासार्ह होत्या. 

2. अपमाहितीशी लढणाऱ्या ‘ब्लॅकबर्ड डॉट एआय’ या कंपनीनेही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोरोनाशी संबंधित पाच कोटी ट्विपण्यांचा अभ्यास केला. त्यातील १.९ कोटी म्हणजे ३८ टक्के ट्विपण्या या ‘मॅनिप्युलेटेड कंटेन्ट’ म्हणजे ज्यातून सत्याचा अपलाप करण्यात आला आहे अशा होत्या. 

3. अशीच एक पाहणी रॉयटर इन्स्टिट्यूटने केली होती. सहा देशांत करण्यात आलेल्या त्या पाहणीत असे आढळले, की समाज माध्यमांतून दिशाभूल करणारी माहिती मिळत असल्याचे एक तृतीयांश वापरकर्त्यांचे मत होते. 

4. खुद्द फेसबुकनेही वेगळ्या प्रकारे हेच म्हटले होते. फेसबुकला मार्चमध्ये कोरोनाशी संबंधित सुमारे चार कोटी ‘प्रॉब्लेमॅटिक पोस्ट’ आढळल्या. तसा इशारा त्या पोस्टसमोर देण्यात आला होता. त्यातील कोरोना विषाणूबाबत चुकीची माहिती देणाऱ्या आणि ज्यामुळे लोकांना शारिरीक हानी पोचू शकेल अशा शेकडो पोस्ट नंतर फेसबुकने काढून टाकल्या. 

बरे हे केवळ फेसबुकच्या माध्यमातूनच चालले होते आणि भारतासारख्या देशात त्याला व्हाट्सअॅपचीही जोड मिळाली होती असे नव्हे. माहितीच्या महाजालातील असंख्य संकेतस्थळे, ब्लॉग, यूट्यूब ध्वनिचित्रफिती हेही त्यात भरच घालीत होते.

5  न्यूजगार्ड ही वृत्तसंकेतस्थळांच्या पत्रकारिताविषयक दर्जावर लक्ष ठेवून असलेली कंपनी. युरोप आणि अमेरिकेतील तब्बल १९१ संकेतस्थळे ही कोव्हिड-१९ विषाणूबाबत चुकीची माहिती देत असल्याचे या कंपनीला आढळले. 

6. कोरोनाव्हायरस फॅक्ट्स अलायन्स’नुसार, ७० देशांतील आणि ४० हून अधिक भाषांतील सुमारे साडेतीन हजार लेख वा मजकूर हा दिशाभूल करणारा होता. हे सर्व या ना त्या मार्गाने आपल्यापर्यंत येत होते. 

फेसबुकचे न्यूजफीड, व्हाट्सअॅप फॉरवर्ड यांतून ही सारी अपमाहितीची गटारगंगा आपल्या माथ्यावर येऊन आदळत होती. वॉशिंग्टनमधील प्यू रिसर्च सेंटर या विचारमंचानुसार, ज्या लोकांचा माहितीचा प्राथमिक स्त्रोत हा समाजमाध्यमे आहे, त्यांच्यात चुकीच्या माहितीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. हेच या काळात घडत होते. आणि ही अपमाहिती कशी होती? 

भय, विखार आणि मूर्खपणा

युनेस्कोच्या ‘जर्नालिझम, प्रेस फ्रीडम अँड कोव्हिड-१९’ या ‘धोरण निबंधा’त उपरोक्त माहिती देऊन, असे म्हटले आहे, की ‘या सर्व अपमाहितीमध्ये वंशवादी, तसेच द्वेषयुक्त मजकूर आणि स्थलांतरितांविषयीचे भय हीच थीम वा सूत्र दिसले.’ असत्यांचा, अपमाहितीची पूरच होता तो. पण केवळ तीच समस्या नव्हती. त्या अपमाहितीला भावनिकतेची जोडही देण्यात आलेली होती आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींद्वारे ती पसरविली जात होती. 

त्यातील ‘गो कोरोना गो’ गाण्यासारखा फोकनाडपणा सोडला, तर बाकीच्या गोष्टींतला मूर्खपणा, त्यातील अपमाहिती सामान्य जनांच्या लक्षात येण्यासारखी नव्हती. त्यातील कोव्हिड-१९ हे चीनने वा अमेरिकेने विकसित केलेले जैविक अस्त्र आहे वगैरे षड्यंत्र सिद्धांत सोडून द्या. त्यांतून भयगंड पसरविण्यात येत होता. त्याचा वापर अतिरेकी राष्ट्रभक्ती जागविण्यापासून आपला माल खपविण्यापर्यंत विविध पातळ्यांवर करण्यात येत होता. पण त्यांपासून निदान कुणाचा थेट वैयक्तिक तोटा तरी नव्हता. परंतु इतर संदेशांचे काय? कोव्हिड-१९ हा विषाणू नव्हे, तर जीवाणू आहे येथपासून गरम चहा वा पाणी पिल्याने किंवा गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोव्हिड-१९ मरतो येथपर्यंतच्या अनेक गोष्टी लोक विश्वासाने एकमेकांना अग्रेषित करीत होते. 

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना उपचारांसाठी मुंबईतील नानावटी इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच नानावटी इस्पितळातील डॉक्टरांच्या नावे एक संदेश व्हाट्सअॅपवरून फिरू लागला, की त्या रुग्णालयात 'क' जीवनसत्वासाठी गरम पाण्यात अर्धे लिंबू पिळून देण्यात येते. दिवसातून तीनदा आले, गूळ आणि तूपाचे चाटण देण्यात येते. हळदीचे गरम दूध हे ‘अँटी कोरोना’ आहे. आणि रोज एकदा तरी वाफ घ्यावी. असे उपचार त्या डॉक्टरांनी सुचविले आहेत. सगळ्याच रुग्णालयांतून हेच उपचार देण्यात येतात. तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. या अशा प्रकारच्या सगळ्या संदेशांवर कडी केली होती केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी. राजस्थानातील गंगाशहरमधील भाभीजी पापड खाल्ल्याने कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज शरिरात तयार होतात, अशी ध्वनिफीतच त्यांनी जारी केली. 

आता गरम पाणी पिणे, काढे पिणे, वाफारा घेणे अशा काही घरगुती उपायांमुळे साध्या सर्दीपडसे झालेल्याला तात्पुरता आराम मिळतो. जीवनसत्त्वांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. हे ज्ञान भारतीयांना तरी नवे नाही. पण हे सारे कोरोना विषाणूला रोखू शकतात असे या प्रकारच्या संदेशांतून ध्वनित होत होते. ते घातक होते. काढ्यांचे अतिसेवन करून काहींना त्रास झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. याहून घातक होते ते मुखपट्टिका वापरून काहीही फायदा होत नाही असे सांगणारे संदेश. २९ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या खुद्द सर्जन जनरलनेच मुखपट्टिका खरेदी करू नका अशी ट्विपणी केली होती. किंवा आपल्या आयुष मंत्रालयाने एका विशिष्ट होमिओपॅथिक औषधाने कोरोना रोखता येतो असा दावा केला होता. तोही कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाशिवाय. हे सारेच भयंकर होते. अपायकारक होते.

हे झाले आरोग्याविषयी. पण या महामारीच्या आडून सामाजिक आरोग्याला बाधा पोचविणारे संदेशही अग्रेषित केले जात होते. मुस्लिम समाजाने महामारी पसरविण्यासाठी ‘कोरोना जिहाद’ सुरू केला आहे हे बनावटवृत्त आपल्याकडचेच. याला जोडूनच मांस, अंडी यातून कोरोनाबाधा होते अशा प्रकारच्या संदेशांनी या देशातील मांस आणि पोल्ट्री उद्योगावर अवकळा आणली. आता सचिन तेंडुलकर यांच्या नावानेच असा संदेश आल्यानंतर त्यावर कोण अविश्वास ठेवणार? अखेर केंद्रीय मत्स्य, पशुपालन व दुग्धोत्पादन विभागाचे केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांना त्याबाबत खुलासा करावा लागला. 

या अशा बनावटवृत्तांचे, अपमाहितीचे, अफवांचे प्रचंड प्रमाण लक्षात घेता, त्या प्रत्येकाचे बिंग उघड करणे कठीणच. आणि तसे केले गेले नाही, तर त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढणार. हे सारे अंतिमतः देशहिताला बाधक. या परिस्थितीचा, त्यातून निर्माण होणाऱ्या भय वा मूर्खपणा वा द्वेष यांनी ग्रस्त असलेल्या भावनांचा मुकाबला करायचा तरी कसा? ते समजून घेण्याआधी हे जाणून घेतले पाहिजे की आपल्यातलेच लोक अफवा वा अपमाहितीचा प्रसार करण्यात जो हातभार लावतात तो का? 

अफवा वा अपमाहिती पसरविणारे असतात तरी कोण?

हे कोणी परग्रहावरचे प्राणी नसतात. ते आपल्यातलेच असतात. त्यांची ढोबळ यादी अशी करता येईल - 

1. राजकीय हितसंबंध असणारे वा राजकीय हेतूंनी प्रोपगंडा करणारे. यात मग ते सारे राजकीय पक्षांचे आयटी सेल, राजकीय कार्यकर्ते, एखाद्या विचारसरणीचे अनुयायी, हल्ली ज्यांनी गोदी मीडिया म्हटले जाते त्या वाहिन्यांतील पत्रकार आदी येतात. 

2. षड्यंत्रसिद्धांतकार. हे सगळ्याच समाजात असतात. आपल्या अवतीभवतीच्या गोष्टी, घटना यांमागील कार्यकारणभाव आपल्याला समजावा ही सर्वांचीच इच्छा असते. षड्यंत्रसिद्धांतकार मंडळी त्यापुढे एक पाऊल टाकतात. त्या घटनांमागील संगती, त्यांची अधिकृत मीमांसा त्यांना सहसा मान्य नसते. किंबहुना अधिकृत, सरकारी वा जनमान्य माहिती ती सारी खोटे. त्या सगळ्यामागे कुणाचे तरी कारस्थान असते अशी त्यांची भूमिका असते. त्यातून मग ही मंडळी विशिष्ट घटनांबाबत आपली स्वतःची भूमिका मांडतात. त्यांच्या त्या सिद्धांतांत आपल्याला सत्याची, तथ्यांची पखरण दिसते. परंतु त्यांचे नीट परीक्षण केले की दिसते, की अशा सिद्धांतांत जी तथ्ये वा सत्ये मांडलेली असतात, ती फक्त या सिद्धांतकारांची सत्ये असतात. त्यांचा वास्तवाशी फक्त चवीपुरता संबंध असतो. ‘फाइव्ह जी’ लहरींमधून कोरोनाचा विषाणू पसरतो, चीनने मुद्दामच हा विषाणू जगात सोडला, किंवा मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी पृथ्वीचा लोकभार कमी करण्यासाठी हा विषाणू सोडला, हे असेच काही षड्यंत्रसिद्धांत. त्यांवर विश्वास ठेवणारे लोक अजूनही आहेत. 

3. स्वतःला ज्ञानी, माहितगार वा तज्ञ मानणारे, अर्धवट माहितीवर विसंबून आपल्या अकलेचे दिवे पाजळणारे लोक समाजात भरपूर असतात. अशी मंडळीही अपमाहिती वा अफवा निर्माण करून पसरविण्याच्या उद्योगात मोठ्या संख्येने दिसतात. कोरोनापासून बचावाचे अशास्त्रीय उपाय सांगणारे होते ते हेच.

4. उपरोक्त मंडळींनी तयार केलेल्या अफवा वा अपमाहितीचा भंडारा सर्वत्र उधळणाऱ्या लोकांचाही समावेशही या यादीत करावे लागेल. हे सारे म्हणजे आपणच. आलेले संदेश वा वाचलेल्या पोस्ट सत्यापित न करता, कोणतीही शहानिशा न करता पुढे पाठविणारे, शेअर वा लाईक करणारे आपण सारेच अफवांना हवा देणारे असतो. 

यातील पहिल्या तीन मंडळींचा हात धरणे कठीण. त्यांच्यापुढे सरकारी यंत्रणाच नव्हे, तर फेसबुकादी कंपन्यांनीही हात टेकलेले आहेत. समाजमाध्यमांतील अफवांचा, अपमाहितीचा, बनावट बातम्यांचा पूर रोखण्याचे फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम आदींचे प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत. पण आपण आपल्या पातळीवर आणि आपल्यापुरता याला आळा घालू शकतो. त्यासाठी आपल्याला एकच करावे लागेल. ते म्हणजे आपल्या ओळखीपाळखीतील, नात्यागोत्यातील अफवाखोरांना अडवावे लागेल. यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे ध्यानात घ्यावे लागेल, की आपल्यातलेच हे साधेसुधे लोक हेच मुळात अफवांचे बळी आहेत. ते हे मुद्दाम करीत नसतात. पण मग ते हे उद्योग का करतात? त्यामागील मानसशास्त्र काय असते?

सामान्य लोक अफवा वा अपमाहिती का ‘फॉरवर्ड’ करतात?

समाजमाध्यमांद्वारे लोक अफवा ‘फॉरवर्ड’ करतात, याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ती अफवा आहे हेच त्यांना माहित नसते. किंबहुना त्यांचा त्या माहितीवर विश्वासच असतो. आपल्याला फालतू, विश्वास ठेवण्याच्या लायकीची नसलेली माहिती कोणीच कुणाला सांगत नसते. सांगितली तर लोकांत आपलेच हसे होईल असे भय त्यामागे असते. एखादी माहितीपूर्ण गोष्ट फॉरवर्ड करण्यामागील एक कारण हे स्वप्रतिमेला झळाळी आणणे हे असते. जे इतरांना ठाऊक नाही, ते आपल्याला माहित आहे, इतरांच्या तुलनेत आपल्याकडे ही अधिकची माहिती आहे, सर्वांत आधी आपल्यालाच ते समजले आहे, असे दाखविणे हे त्या फॉरवर्ड करण्यामागे असते आणि त्यातून आपली प्रतिमा उंचावण्याचा तो प्रयत्न असतो. अशा ‘आतल्या’ गोष्टी माहित असणारे, समाजातील घटना-घडामोडींना सर्वप्रथम प्रतिसाद देणारे इतरांच्या आदरास प्राप्त होत असतात. याशिवाय अशा ‘फॉरवर्डीकरणाचा’ वापर समाजातील आपले बंध बळकट करण्यासाठीही केला जात असतो. अफवा वा अपमाहिती वा बनावट वृत्त अग्रेषित करून आपण समाजातील विशिष्ट टोळीशी, समुदायाशीही स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. 

अफवा ओळखायच्या कशा?

अफवा वा अपमाहिती वा खोट्या गोष्टी पसरविणे हा गुन्हा आहे, चूक आहे हे आपल्याला माहित असूनही अजाणता तो प्रमाद लोकांच्या हातून घडतो, याचे कारण त्यांना ती माहिती चुकीची आहे हेच समजलेले नसते. ते कसे ओळखायचे हा खरा प्रश्न आहे. त्याचे काही सोपे मार्ग आहेत. उदाहरणार्थ - 

1. अपमाहिती, बनावट बातम्या, अफवा या ओळखणे कठीण असते, कारण त्या अत्यंत विश्वासार्ह वाटाव्यात अशा पद्धतीने मांडलेल्या असतात. त्यांत सनसनाटी, थरारकता असते. भय, राग वा नैराश्य अशा भावना निर्माण करण्याची तीव्र क्षमता त्यांत असते. त्यामुळे आपण त्यास पटकन प्रतिसाद देतो. अशी माहिती समोर येताच आपण पहिल्यांदा आपल्या भावनांना लगाम घालावा आणि तर्कशुद्ध पद्धतीने काही प्रश्न विचारावेत, की ही माहिती का देण्यात येत आहे? आपल्या भावना भडकाविण्यात येत आहेत का? एखादे उत्पादन वा व्यक्तिचा ब्रँड विकण्यासाठी हे चालले आहे का? यातून आपणांस एखाद्या संकेतस्थळास क्लिक करा असे सांगण्यात येत आहे का? 

2. व्हाट्सअॅप वा फेसबुकवरील अपमाहितीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यात नेहमीच आपल्या मनातील विशिष्ट भावनेला, खासकरून राग, द्वेष, भय, नैराश्य, देशभक्ती, माणुसकी यांना हात घालण्यात आलेला असतो आणि तो संदेश पुढे पाठवा असे आवाहन त्यात आवर्जून करण्यात आलेले असते. 

3. व्याकरणाची, शुद्धलेखनाची ऐशीतैशी केलेले, इमोजींचा मुक्तहस्ते वापर केलेले संदेश हे बहुतांशी बनावटच असतात. त्यांकडे संशयानेच पाहावे. 

4. हे संदेश कोण्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने प्रसारित केलेले असतात. परंतु ते त्याने कधी म्हटले, कुठे म्हटले याचा काहीही उल्लेख नसतो. काही अभिनेते, पोलिस अधिकारी, झालेच तर डॉ. एपीजे अब्दुल कलाम, रतन टाटा अशा समाजमान्य व्यक्तींच्या नावाने आलेले असे अनेक संदेश आपण पाहिलेलेच असतील. मध्यंतरी कोरोनापासून वाचण्यासाठी मांस खाऊ नका असा संदेश सचिन तेंडुलकरच्या नावाने फिरत होता. नासा, युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना यांना तर यासाठी नेहमीच वेठीस धरलेले आपण पाहिलेले आहे. तेव्हा अशा सर्व संदेशांचा स्त्रोत हा पहिल्यांदा तपासून पाहिला पाहिजे. कोणताही संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याचा लेखक हा प्रतिष्ठित, मान्यताप्राप्त आहे का, हे पाहावे. एखाद्याने नावापुढे डॉक्टर लिहिले म्हणजे तो डॉक्टरच असतो असे नव्हे. अनेकदा खोट्या नावाने हे संदेश प्रसारित केलेले असतात. 

5. एखादी माहिती आपल्याला समाजमाध्यमांतून मिळाली, तर तीच माहिती, त्यातील डेटा (विदा) अन्य कुठले प्रतिष्ठित वृत्तपत्र वा संकेतस्थळ देत आहे का हे पाहावे. तसे नसेल आणि ‘कोणताही मीडिया तुम्हाला हे दाखविणार नाही’ असे ते सारे असेल तर ती माहिती संशयास्पदच समजावी.

6. हल्ली कोणीही बनावट छायाचित्र तयार करू शकते. तेव्हा छायाचित्र आहे वा व्हिडिओ आहे म्हणून तो विश्वासार्हच आहे असे मानू नये. त्याची खातरजमा करण्यासाठी गुगल करावे. रिव्हर्स इमेज सर्च करून छायाचित्रांची वा ध्वनिचित्रफितींची खातरजमा करून देणारी संकेतस्थळे आहेत. त्यांचा वापर करावा.

हे आपण करणार असू, तरच आपण कोणत्याही प्रकारच्या महामारीला - मग ती साथरोगांची असो वा सामाजिक समस्यांची असो - सक्षमपणे तोंड देऊ शकू. समाजमाध्यमांच्या डोहांतील अफवांच्या कालियाचा समूळ नाश करू शकू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com