
Storytelling for Kids
esakal
मुंबई: मोबाईलवर कार्टून किंवा यूट्युब लावणं सहज आहे; पण मुलांशी दहा मिनिटं बसून गोष्ट सांगणं ही संस्कृतीची खरी देणगी आहे. ही देणगी एक-दोन वर्षांत तयार होत नाही. पिढ्यान्पिढ्या तयार झालेलं ज्ञान आणि संस्कृती हीच आपल्या मुलांच्या हाती द्यायची, हीच खरी संपत्ती आहे.
भारतीयांना ‘संघर्षातून घडलेल्या’ यशोगाथा फार आवडतात. एखाद्या ऑटोवाल्याचा मुलगा आयएएस झाला किंवा सफाई कामगाराचा मुलगा करोडपती झाला, तर अशा गोष्टी सहजच कुटुंबात चर्चेचा विषय बनतात. अशा यशामागचं गुपित काय? कष्ट, श्रद्धा, निष्ठा, उत्कृष्टता... आणि थोडं खोलवर पाहिलं तर, वाचनाची सवय.
म्हणूनच बुद्धिबळ ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजू याला पुस्तकं आवडतात, यात मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. त्याचं आवडतं पुस्तक ‘Under the Surface’ (लेखक : जॅन मार्कोस). या पुस्तकात एक लक्ष वेधून घेणारं वाक्य आहे - ‘ग्रँडमास्टर आणि सामान्य खेळाडू यातला फरक केवळ अचूक हिशेबाचा नसून, ग्रँडमास्टर अधिक सखोल आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन बाळगतो.’
ही गोष्ट पालकांनाही लागू होते. मुलांच्या यशासाठी प्रत्येक पालक झटतो; पण थोडेच असे असतात जे ‘सखोल दृष्टी’ ठेवतात. हे पालक स्वतः वाचनाची सवय लावतात, मुलांसमोर उदाहरण ठेवतात, अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या गोष्टींवरही चर्चा करतात. हे घरचं वातावरण मुलांच्या यशाचा पाया बनतं.