
अनिल घनवट
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे म्हणून भारत कृषिप्रधान देश म्हणवला जातो. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना शेतकरी मात्र आत्महत्या करत आहेत. शेती फायद्याची व्हावी यासाठी सरकार योजना राबवते, आयोग नेमते, कर्जमाफी करते पण शेती व्यवसाय काही फायद्यात येताना दिसत नाही.
शेतकरी कर्जमुक्त व्हावा, शेती फायद्याची व्हावी यासाठी देशात अनेक शेतकरी संघटना कार्यरत आहेत. कर्जमाफीची मागणी सर्वच संघटना करतात. दुसरी महत्त्वाची मागणी हमी भावाची. बाकी वीजपुरवठा, सिंचन प्रकल्प, भूसंपादन मोबदला या विषयांवर स्थानिक पातळीवर आंदोलने होतच असतात. उत्तर भारतात हमी भावाचा कायदा करण्याची मागणी जोर धरते आहे. किमान आधारभूत किमतीच्या खाली शेतीमाल खरेदी करू नये असा कायदा करावा व ती आधारभूत किंमत सी २ अधिक पन्नास टक्के नफा धरून असावी अशी अपेक्षा आहे.