

Will Does Not End Property Ownership
esakal
मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट करून संपत्ती उभी करणारे अनेक पालक उतारवयात मात्र स्वतःच्या गरजा, इच्छा आणि स्वप्ने बाजूला ठेवतात. परंतु, आपल्या कष्टाने उभ्या केलेल्या संपत्तीवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा मालकांचाच असतो. इच्छापत्र केले म्हणजे संपत्तीवरील मालकी संपत नाही, हा मूलभूत कायदेशीर मुद्दा अनेकांना माहिती नसतो. एका वयस्कर दाम्पत्याच्या निर्णयातून केवळ कायद्याची जाणीवच नव्हे, तर आयुष्याच्या उत्तरार्धात स्वाभिमानाने आणि आनंदाने जगण्याचा संदेशही समोर येतो.
आई-वडिलांचे नोंदणीकृत इच्छापत्र आणि त्यानंतर त्यांनी केलेला फ्लॅटविक्रीचा दस्त घेऊन सुजित आणि अपर्णा माझ्याकडे आले होते. त्यांच्या आई-वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. घरातील कागदपत्रे आवरताना त्यांना हे दोन्ही दस्तऐवज सापडले. मोठ्या अपेक्षेने त्यांनी विचारले, ‘‘आई-बाबा ज्येष्ठ नागरिकांच्या वसाहतीत भाड्याच्या घरात राहत होते. आम्हाला वाटले, तिथे राहणे त्यांना सोयीचे पडत असावे म्हणून ते तिथे राहत असतील; पण आता कागदपत्रे पाहिली तर त्यांनी आमच्या नावाने इच्छापत्र करून दिलेला फ्लॅट नंतर विकून टाकल्याचे दिसत आहे. आम्हाला तर फार मोठा धक्का बसला आहे. इच्छापत्र केल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी त्यांनी विक्रीचा दस्त केला आहे. असे कसे काय? आम्हाला काहीही न सांगता त्यांनी घर विकलेच कसे? आमच्या किती आठवणी त्या घरात होत्या, आम्हाला विश्वासात न घेता, ते इतके मध्यवस्तीतले मोठे घर आम्हाला न सांगता कसे काय विकून टाकले त्यांनी? त्यांनी नोंदणीकृत इच्छापत्र केल्याचे आमच्या कानावर घातले होते. आम्ही अगदी निर्धास्त होतो, की आम्हाला त्यांच्या निधनानंतर हे घर मिळणार आहेच! नोंदणीकृत इच्छापत्र करूनही आई-बाबा त्या घराची विक्रीच करून टाकतील, असे आमच्या स्वप्नातही कधी आले नाही! आता तुम्ही सांगा बरं, आई-बाबा असे कसे करू शकतात?’’... त्या दोघांच्या आवाजात आश्चर्यापेक्षा अधिक हक्काची भावना होती.