
केतकी घाटे
औद्योगिकरणावर अनेक मजुरांच्या किंबहुना समाजातील मोठ्या भागाच्या उपजीविका अवलंबून आहेत. या परिस्थितीत काय शक्य आहे, तर संसाधनांचा वापर जबाबदारीने करणे आणि उपसा पूर्ण झाल्यावर त्या नैसर्गिकसंस्था पूर्वस्थितीत आणणे. दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लेख.
चो वीस वर्षांपूर्वी ठरवलं.. निसर्गासाठी पूर्ण वेळ काम करायचं. किंबहुना स्वार्थापोटी आणि आवड जोपासण्यासाठी. आवड कसली तर जंगलात भटकण्याची. झाडा-प्राण्यांची ओळख माणसाला करून देण्याची. त्यांची किचकट शास्त्रीय नाव शोधायची. जमिनीचे सुंदर चित्ररुपी आराखडे रेखाटायची. जमिनीवर निसर्ग कसा फुलतो हे बघण्याची. राहिलेल्या त्रुटींमधून शिकण्याची...अधिकाधिक समृद्धतेकडे जाण्याची.. गेली २४ वर्ष आम्ही या `वनवासा’चा पुरेपूर उपभोग घेत आलो.
परवा एकानं विचारलं की काय साधलं एवढ्या काळात? याकरता सांख्यिक उत्तरं देता येतीलच.. पण हे सगळंच समस्यांच्या मानाने तसं किरकोळ. आणि तसंही जमीन पूर्णतः राखून केवळ तिथे निसर्ग पुनरुज्जीवन ध्येय ठेवणारे जमीनधारक हाताच्या बोटावर मोजण्याइतके. पण हा प्रयत्न जमीनधारकाला आणि आम्हाला आनंद देणारा आहे. आणि त्यात फायदा निसर्गाचा आहे. केंद्रस्थानी निसर्ग आहे. वैयक्तिक फायद्याचा मुद्दा इथे नाही. या निमित्ताने निसर्ग फुलवण्याची काही प्रारुपं बनताहेत.