

Urban to Rural Migration
esakal
मोठा पगार, शहरातलं करिअर आणि धावपळीचं आयुष्य... सगळं असूनही मनातली अस्वस्थता कायम राहिली तर? एका प्रश्नाने सुरू झालेला आत्मशोधाचा प्रवास अखेर गावाच्या वाटेवर येऊन थांबला. शहराच्या गर्दीतून बाहेर पडत मातीशी पुन्हा नातं जोडणाऱ्या एका तरुणाच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ची गोष्ट वाचा आजपासून दर शनिवारी...
कल्पना करा, तुम्ही एका रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवरून चालताय. एक गोष्ट हमखास घडतेच घडते! कुणीतरी धक्का मारत, घाई करत, जागा शोधत पुढे पुढे जाण्यासाठी धावपळीत दिसतोच. त्या पळत जाणाऱ्या माणसाच्या एकूणच वागण्यात काय असतं? विचित्र आणि भयंकर वेग असतो. पटकन पुढे जाण्याची तगमग असते... पण कशासाठी?
ही तगमग प्रत्येक गोष्टीत दिसते. ट्रेन पकडण्यापासून ते उतरण्यापर्यंत. स्थानकाचा जिना चढण्यापासून ते उतरण्यापर्यंत! बस स्टॉपवरही तेच. रिक्षा स्टॅण्डवरही तेच. रोडवरही तेच.
जोराजोरात हॉर्न वाजवायचा. प्रचंड ट्रॅफिक खोळंबलेलंय. वेळ लागेल हे माहीत असूनही सतत हॉर्न वाजवत सुटायचा. ही सवय आपल्याला कशामुळे लागली?
भागो... भरभर जायचं. पुढे पुढे चालत राहायचं. मागे राहिलात तर मागेच सुटाल. पुढचे तुम्हाला विचारणार नाही. शर्यतीत सतत जगणं सुरू राहतं. याच शर्यतीचा जीवघेणा भाग आपल्या जगण्यावर एक दिवस मोठा आघात करतो. एका अजाणत्या क्षणी होत्याचं नव्हतं होतं. सगळं खल्लास!