

Reverse Migration in India
esakal
सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com
गावाकडे परतणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंजक वाटावा, असा काही ड्रामा असेलच असं नाही. काही जण आईवडिलांसोबत राहण्यासाठी गावी परततात. काही जण गावात राहूनच शहरातली नोकरी करतात. कुणी छोटा व्यवसाय सुरू करतं, तर कुणी गाजावाजा न करता हळूहळू नव्या आयुष्याशी जुळवून घेतं. यात काहींचे प्रयोग यशस्वी होतात, तर काहींना यश मिळायला वेळ लागतो.
रिव्हर्स मायग्रेशनच्या गोष्टींमध्ये एक ठरावीक ड्रामा असतो. शहरातलं आयुष्य सोडण्याचा निर्णय, गावाकडे परतणं, एखादा नवा प्रयोग आणि त्यातून मिळालेलं यश! बातमीसाठी किंवा व्हायरल रीलसाठी एवढा हूक पुरेसा ठरतो; पण जगणं हूकवर चालत नाही. प्रत्यक्ष आयुष्यात भावनेसोबत व्यवहाराचाही विचार करावा लागतो.
गावाकडे शिफ्ट होण्याचा विचार करण्याच्या खूप आधीपासून माझ्या फीडमध्ये ठरावीक प्रकारच्या बातम्या सतत दिसायच्या. मी स्वतः डिजिटलमध्ये काम करीत असल्यानं अल्गोरिदम कसं काम करतं याची कल्पना होतीच. ‘नोकरी सोडली, गाव गाठलं आणि आता भारी चाललंय,’ अशा स्टाईलच्या बातम्या वारंवार समोर येत होत्या.
हा लेख लिहिण्यापूर्वीही असंच झालं. उठल्याउठल्या फोन हातात घेतला, तर ‘कोकण कॉलिंग पेज’वरचा एक रील फीडमध्ये आला. डॉ. पूजा आत्मविश्वासाने बोलत होती. तिने ३६५ दिवसांचं चॅलेंज घेतलंय. त्यातले १०० दिवस पूर्ण झालेत. चार महिन्यांपूर्वी पुण्यातली नोकरी सोडून फोंडा गावात ‘अॅग्रो टुरिझम’चा प्रयोग सुरू केलेल्या पूजाचा व्हिडिओ बघून माझी मॉर्निंग गुड नाही, तर बेस्ट झाली होती. थोड्या वेळाने तिचा नंबर मिळवला आणि तिच्याशी फोनवरही बोललो.