esakal | रामकथेच्या विकासाचा आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

Ramayan Katha}

रामकथेच्या विकासाचा आढावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनन्द लक्ष्मण बापट

'संपूर्ण रामकथांचा आढवा घेणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथ कोणता?' याचे उत्तर फादर कामिल बुल्क्रे यांचा 'रामकथा, उत्पत्ति और विकास' हा ग्रंथ असे देता येईल. हा ग्रंथ सुमारे बारा वर्षांच्या कठोर परिश्रमाने लिहिला. पुढे सुमारे अडीच दशके त्यात नवीन संदर्भांची भर पडत होती. विशेष म्हणजे हा ग्रंथ इंग्रजीतून नसून हिंदीत आहे.‘रामकथा, उत्पत्ति और विकास’ या ग्रंथाचे लेखक फादर कामिल बुल्के हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. ते मूळचे बेल्जियन. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९०९ रोजीचा.

अभियांत्रिकीमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते चर्चच्या सेवेमध्ये रुजू झाले आणि १९३४ मध्ये भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी हिंदी भाषेचे शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी तुलसीरामायणाचा अभ्यास केला आणि ते रामकथेकडे आकृष्ट झाले. रामकथेच्या विकासाचा आढावा घेणारा आपला शोधप्रबंध त्यांनी १९४९ मध्ये पीएच.डी.च्या पदवीकरिता अलाहाबाद विद्यापीठास सादर केला. त्या काळात शोधप्रबंध फक्त इंग्रजी भाषेत सादर करण्यास परवानगी होती. फादर बुल्के यांनी तसे करण्याचे ठामपणे नाकारले.

इतकेच नव्हे तर ‘देश स्वतंत्र झाल्यावरही इंग्रजीचा आग्रह धरणे, हे लाजिरवाणे आहे’, हे कुलगुरूंना पटवून दिले. भारतीय भाषेमध्ये प्रबंध सादर करण्यास स्वतंत्र भारतात प्रथमतः परवानगी मिळाली ती त्यांनाच!

पीएच.डी.ची पदवी प्राप्त झालेला हा प्रबंध १९५० मध्ये प्रसिद्ध झाला. त्याची दुसरी सुधारित आवृत्ती १९६२ मध्ये प्रसिद्ध झाली, तर तिसरी सुधारित आणि परिवर्धित आवृत्ती १९७१ मध्ये आली. तिच्यामध्ये तब्बल ८१५ पृष्ठे आहेत! तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतरही फादर बुल्के यांचा रामकथेवरील व्यासंग सुरूच राहिला. ग्रंथाचे भाषांतर इंग्रजीमध्ये करण्यास त्यांनी नकार दिला. ‘ग्रंथ ज्याला वाचावयचा असेल, त्याने हिंदी भाषा शिकावी’, अशी त्यांची भूमिका होती. ख्रिस्ताचा उपदेश, तुलसीरामायण, न्याय- वैशेषिक दर्शने अशा विविध विषयांवरही फादर बुल्के यांनी हिंदीमध्ये ग्रंथ लिहिले, तसेच इंग्रजी-हिंदी कोशाची रचना केली. त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव भारत सरकारने केला. भारताचे नागरिकत्व त्यांना १९५१ मध्ये देण्यात आले, तर १९७४ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ बहाल करण्यात आले.

ग्रंथाची चार भागांत विभागणी

‘रामकथा, उत्पत्ति और विकास’ या ग्रंथाचे चार विभाग आहेत. त्यातील पहिल्या भागात रामकथेच्या संदर्भातील साहित्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. वैदिक वाङ्‍मय, बौद्ध आणि जैन साहित्य, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये सापडणाऱ्या रामकथेच्या मूळ स्वरूपाचा आढावा त्यात घेतलेला आहे.

दुसऱ्या भागामध्ये रामकथेच्या उत्पत्तीचे आणि तिच्या उत्क्रांतीचे विश्लेषण करण्यात आले आहे. दशरथ जातकापासून प्रारंभ करून रामाच्या कथेमधले त्याच्या जीवनाचे निरनिराळे टप्पे कसकसे तयार होत गेले, त्याचे विवेचन या भागामध्ये करण्यात आलेले आहे. वाल्मीकी रामायणाचा आढावा घेतल्यावर त्याचे पडसाद पुढच्या साहित्यामध्ये कसकसे उमटले, हे सविस्तर सांगण्यात आलेले आहे.

रामकथेविषयीच्या मध्ययुगीन वाङ्‍मयाविषयीचा भाग यापुढे येतो. संस्कृत भाषेतील धार्मिक आणि धर्मेतर ललित साहित्य, तसेच हिंदी भाषा आणि तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बांग्ला, मराठी, गुजराती, कश्मीरी इत्यादी प्रादेशिक भाषांमधील साहित्याची आढावा घेतलेला आहे. यानंतर रामकथेचा भारताच्या बाहेर, विशेषतः तिबेट, खोतान, मध्य आशिया या प्रदेशात, तसेच इंडोनेशिया, बाली, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया इत्यादी आग्नेय आशियामधील प्रदेशांमध्ये झालेल्या विस्ताराचे सविस्तर विवेचन केलेले आहे. रामकथेच्या विकासाचा कांडशः तपशील ग्रंथाच्या चौथ्या भागामध्ये सांगितलेला आहे. रामायाणातील महत्त्वाच्या पात्रांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेण्यात आलेला आहे. शेवटी रामकथेच्या विकासाचा तक्ता कालक्रमाने मांडण्यात आलेला आहे. या तक्त्यामुळे तसेच सविस्तर विषयसूचीमुळे ग्रंथाची उपयुक्तता अधिकच वाढलेली आहे. (सुदैवाने हा ग्रंथ इंटरनेटवर डाउनलोड करण्याकरिता मोफत उपलब्ध आहे.) अत्यंत साक्षेपाने आणि त्रयस्थ आपुलकीने रामकथेचा धांडोळा घेण्यामध्ये आपल्या जीवनाची तब्बल साडेचार दशके

खर्च करणारे फादर बुल्के यांचे निधन दिल्लीच्या एम्स इस्पितळामध्ये १७ ऑगस्ट १९८२ रोजी झाले. रामकथेविषयीच्या त्यांच्या विधानाने लेखाची सांगता करणे उचित ठरेल. ते लिहितात, ‘भारत की समस्त आदर्श भावनाएँ रामकथा में, विशेषकर मर्यादापुरुषोत्तम राम तथा पतिव्रता सीता के चरित्रचित्रण में केन्द्रिभूत हो गई है। फलस्वरूप रामकथा भारतीय संस्कृति के आदर्शवाद का उज्ज्वलतम प्रतीक बन गई है।’

(लेखक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे निबंधक व अभिरक्षक आहेत.)