
इंग्लंड दौरा चालू होत असताना बऱ्याच क्रिकेट जाणकारांना शंका होती, की कोहली आणि रोहित शर्मा संघात नसताना भारतीय संघाचा निभाव कसा लागेल? पहिल्याच कसोटी सामन्यात रिषभ पंतने दोनही डावांत शतक झळकावून शंकांना उत्तर दिले. पंतच्या फलंदाजीचे कौतुक करताना नको त्या वेळी त्याने केलेली खेळी भारताला अडचणीत आणणारी ठरतेय का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
वाहन चालवण्याचे लायसन्स सोबत न ठेवता बरेच नियम तोडून दुचाकी वेगाने चालवणे हे चुकीचे असले तरी ते बिनधास्त प्रकारात धरता येईल; पण हेल्मेट न घालता राँग साइडने म्हणजेच वाहतूक चालू आहे त्याच्या विरुद्ध दिशेने दुचाकी भयानक वेगाने चालवणे याला बेपर्वा म्हणावे लागेल. नव्या जमान्यातील बरेच तरुण-तरुणी बिनधास्त जगायला जातात. असे करत असताना ते हळूच लक्ष्मणरेषा ओलांडून बेपर्वा कधी होतात, त्यांचे त्यांनाच कळत नाही.
लेखाच्या सुरुवातीला हे उदाहरण देण्याचे कारण आहे, ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामन्यात रिषभ पंतला झालेली दुखापत. रिषभ पंतची फलंदाजीची शैली वेगळी आहे. तो साचेबद्ध पद्धतीने फलंदाजी करत नाही. बऱ्याच वेळा तो बिनधास्त फटकेबाजी करणे पसंत करतो. त्याच्या शैलीला संघ व्यवस्थापन जोरदार पाठिंबा देते. चौथ्या कसोटी सामन्यात रिषभने फलंदाजी करताना चूक केली, की आपल्या नशिबाला जरा जास्तच तपासण्याचा प्रयत्न केला, समजत नाहीये. जी दुखापत पंतला झाली त्याचा विचार करता क्रिकेटने त्याला चांगलाच धपाटा तर घातला नाही ना, असा विचार मनात नक्कीच डोकावून गेला.