

Emotional Development Of Children
esakal
आरती बनसोडे - bbansodeaarti@gmail.com
गुन्हेगारीला ठरावीक जात, आर्थिक स्तर किंवा जेंडर नसते. घरात कितीही पैसा असला, तरी जर मुलांचे ‘भावनिक व्यवस्थापन’ कच्चे असेल, तर ती वाटेवरून भरकटू शकतात. केवळ कायदे करून चालणार नाही. केवळ गुणांची टक्केवारी वाढवणारी नव्हे; तर मनाची समृद्धी आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारी संवेदनशील पिढी घडवणे, ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
सकाळचा चहा पिता पिता वर्तमानपत्र हातात घ्यावे आणि पहिल्याच पानावर नजर टाकावी, तर काळीज चर्रर्र करणारी एखादी बातमी समोर येते. आपण चहाचा कप बाजूला ठेवतो, दोन मिनिटे हळहळतो आणि ‘आजकाल जमानाच खराब आलाय’ असे म्हणून आपल्या कामाला लागतो. पण, कधी शांतपणे बसून विचार केलाय, का की आपण ज्या समाजाचा भाग आहोत तो समाज नक्की कोणत्या दिशेने चालला आहे? सध्या अवतीभवती घडणाऱ्या घटना पाहिल्या, की अंगावर काटा येतो. सुसंस्कृत, पुरोगामी आणि संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या समाजात अचानक हिंसेचा आणि क्रूरतेचा पूर कसा काय आला?