
भारताने तुर्कीये आणि अझरबैजान यांच्याबरोबरील व्यापार, प्रवास आणि पर्यटनावर बहिष्कार टाकला आहे. परिणामी राष्ट्रीयत्वामध्ये आर्थिक धोरणांचे महत्त्व दिसून येत आहे. अशा प्रकारच्या आर्थिक राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रहिताला प्राधान्य देण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये सरकारचा हस्तक्षेप. अति आर्थिक राष्ट्रवाद हा अपायकारक ठरू शकतो; पण त्याची धोरणात्मक अंमलबजावणी केल्यास त्यामुळे घरगुती उद्योगांचे सक्षमीकरण होईल, परदेशांवरील अवलंबित्व कमी होईल आणि राष्ट्रीय ओळख दृढ होईल.
आर्थिक राष्ट्रवादाचा प्रकार एकविसाव्या शतकात वाढीला लागला. आर्थिक अस्थैर्य, भूराजकीय ताणतणाव आणि जागतिकीकरणामुळे आलेले असमाधान यामुळे हा बदल झाला आहे. नुकताच भारताने तुर्कीये आणि अझरबैजान यांचा व्यापार, प्रवास आणि पर्यटन यांच्यावर टाकलेला बहिष्कार अन् गलवान येथील चकमकीनंतर चीनबरोबरचा व्यापार कमी करण्याचा निर्णय यामुळे राष्ट्रीयत्वामध्ये आर्थिक धोरणांचे महत्त्व दिसून येत आहे. यामुळे द्विपक्षीय संबंध दीर्घकाळ गोठून राहण्याची शक्यता आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांमधील सहकार्य कमी होईल आणि प्रादेशिक आघाड्यांची फेररचना होईल. मात्र या निर्णयामुळे खरोखर या दोन शत्रू देशांवर दीर्घकालीन आर्थिक बहिष्कार घातला जाईल का, की चीनप्रमाणे राष्ट्रीयत्वाच्या आरोळ्या ठोकूनही चीनबरोबरचा व्यापार वाढतच गेला, तसे होईल का, हे प्रश्नच आहेत.