रिता राममूर्ती गुप्ता
info@reetaramamurthygupta.in
प्रसिद्ध लेखिका व आशियातील पहिल्या रिडिंग कोच अशी ओळख असलेल्या रिता राममूर्ती गुप्ता वाचन चळवळ नव्याने विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ या पाक्षिक सदरातून त्या वाचनापुढील अडथळे, वाचनामुळे आयुष्यात होणारे बदल, मेंदूचा विकास इत्यादी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणार आहेत.
पुस्तक वाचन म्हणजे मेंदूला ऊर्जा देण्यासारखे आहे. मात्र, मोबाईलवर सातत्याने स्क्रोलिंग करणे ही मेंदूची ऊर्जा कमी करण्याची कृती आहे. माझ्या पहिल्या स्तंभातून या महत्त्वाच्या विषयावर मी प्रकाश टाकणार आहे. रिडिंग कोच (वाचन प्रशिक्षक) म्हणून माझे काम मेंदूशास्त्रावर म्हणजेच मेंदूच्या अभ्यासावर आधारित आहे. या विषयावर माझे सातत्याने संशोधन सुरू असते. यातून आजूबाजूच्या डिजिटल वातावरणाचे आपल्या मेंदूवर नेमके काय काय परिणाम होतात, तेदेखील आपण समजून घेऊया...
डिजिटल कन्टेंट अत्यंत वेगाने, छोट्या छोट्या रिल्स, बाईट्सच्या स्वरूपात आपण ग्रहण करतो. मोबाईल किंवा स्क्रीनच्या प्रत्येक स्वाइपमध्ये काहीतरी नवीन पाहायचे असते. पुन्हा पुन्हा पाहिलेली गोष्ट कंटाळवाणी वाटते. त्यामुळे मेंदू सतत नव्या उत्तेजनांसाठी सज्ज राहतो; पण त्याच वेळेस कोणताही विषय खोलवर समजून घेण्याची आपली वृत्ती कमी होते. स्क्रीनवर अधिक वेळ घालवल्याने, विशेषतः स्क्रोलिंगसारख्या कृतीमुळे मेंदूच्या सगळ्यात बाहेरील स्तरावर, म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये, जो आपल्या मेंदूची स्मरणशक्ती, निर्णयक्षमता व समस्या सोडवण्याची क्षमता नियंत्रित करतो, त्यामध्ये मोजता येईल इतकी घट होते.