
हर्ष काबरा
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय न्यायभावना अजूनही जिवंत असल्याची ग्वाही देते. आजच्या भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात त्याची गरजही आहे. परंतु ती पूर्ण करण्यासाठी रचनात्मक बदल करावे लागेल.
नेदरलँड्सच्या हेगमधील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची भव्य इमारत. न्यायाधीशांच्या आणि वकीलांच्या काळ्या झग्यांची लगबग. एका बाजूला पीडितांचे अश्रू. दुसरीकडे आरोपींच्या डोळ्यांतील भीती. पण हल्ली लक्ष वेधून घेत आहेत या दैनंदिन दृश्यांमागे दडलेले प्रश्न. जागतिक न्यायसत्तेच्या नाट्यगृहात न्याय हा केवळ बड्या सत्तांच्या स्वार्थाचा मुखवटा आहे का, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट- आयसीसी) नवसाम्राज्यवादाच्या जोखडात अडकल्याची स्थिती का निर्माण झाली आहे, आफ्रिकन नेत्यांवर कारवाई करताना जी तत्परता दाखवली जाते, ती शक्तिशाली राष्ट्रांच्या बाबतीत का दिसत नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.