
मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)
mohinigarge2007@gmail.com
स्वातंत्र्य! माणसाचा मूलभूत अधिकार! मात्र, तोच अधिकार परत मिळवण्यासाठी एकेक नाविक झटत होता. समोर होता उधाणलेला समुद्र... एकामागून एक लाटा उसळत होत्या... या लाटा होत्या असंतोषाच्या, विद्रोहाच्या! त्यांना बांध घालणं केवळ अशक्य होतं. हा होता वडवानल... शत्रूला भस्मसात करण्यासाठी पेटलेला!
‘१८५७ चं स्वातंत्र्यसमर’ जसं इंग्रज सैन्यातल्या भारतीय सैनिकांपासून सुरू झालं, तसंच १९४६ ला फेब्रुवारी महिन्यात ‘रॉयल इंडियन नेव्ही’ने (आरआयएन) इंग्रजांविरुद्ध एक महत्त्वपूर्ण लढा दिला. भारतीय नाविकांनी स्वातंत्र्यासाठी केलेलं हे सशस्त्र बंड अत्यंत महत्त्वाचं ठरलं! या घटनेला लवकरच आठ दशकं पूर्ण होतील. या प्रेरणादायी लढ्याच्या स्मृतीला आपल्या भारतीय नौदलाने अभिमानाने जतन केलेलं दिसून येतं. यालाच ‘शेवटचं स्वातंत्र्ययुद्ध’ असंही संबोधलं जातं.