
Rural development India
esakal
अस्थिर जागतिक परिस्थितीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे. आतापर्यंतच्या धोरणांमुळेही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यायी बाजारपेठांचा विचार करताना, शहरीकरणाऐवजी ग्रामीणीकरणावर भर दिला, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेलच; त्याचबरोबर स्वावलंबनाचे उद्दिष्टही गाठण्यास मदत होणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेविषयी सातत्याने चर्चा होत असते. एका बाजूला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून, लवकरच पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करेल, असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात येतो. तर, दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात येते. यामध्ये केंद्र सरकारची धोरणे, या धोरणांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोट ठेवण्यात येते. सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारपेठेचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो. हीच बाजारपेठ अन्य देशांनाही संधी वाटत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करताना, स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक पावलेही उचलण्याची गरज आहे. यामध्येही महानगरांवरील ताण वाढण्यापेक्षा विकासाचे विकेंद्रीकरण गरजेचे असून, यासाठी ग्रामीणीकरणावर भर द्यायला हवा.