
डॉ. विनया घाटे
भारत जैविकदृष्ट्या जगातील सर्वांत श्रीमंत राष्ट्रांपैकी एक आहे. वनस्पती आणि जीवजंतूंमध्ये अत्यंत समृद्ध असण्यासोबतच भारताला निसर्गाचे संरक्षण करण्याची उज्ज्वल परंपरादेखील लाभली आहे. प्राचीन संस्कृतीत निसर्ग संवर्धनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्षपूजेची परंपरा आहे. त्याची पाळेमुळे सिंधू संस्कृतीत आढळतात.
तद्नंतरच्या काळात ऋषिमुनींनी वृक्षपूजा हा धर्म सांगितला आहे. वृक्ष हाच देव. उदाहरणार्थ, वड म्हणजे शंकर, पिंपळ म्हणजे विष्णू, बेल म्हणजे लक्ष्मी, कदंब म्हणजे कार्तिकेय, औदुंबर म्हणजे दत्त. त्यातून वृक्षाची पूजा आणि पर्यायाने संरक्षणाची संस्कृती निर्माण झाली. वृक्षपूजेचे आणखी काही प्रकार आहेत. त्यात २७ नक्षत्र वृक्ष (नक्षत्रांच्या पूजनासाठी विशिष्ट वृक्ष), २८ बोधी वृक्ष (बुद्धांचे वृक्ष), २४ तीर्थंकर वृक्ष, स्थल वृक्ष (वृक्षपुरुषोत्तम) इत्यादींचा समावेश होतो.