

Salman Khan Stardom
esakal
सलमान खानच्या आजवरच्या सगळ्या कारकिर्दीकडे डोळसपणे पाहिले तर त्याची सिनेमातील प्रतिभा, सामाजिक प्रतिमा यांच्या दरम्यानचा लंबक सातत्याने लोकप्रियता, अपराधभाव, प्रायश्चित्त आणि स्वतःचेच नवनिर्माण यांना स्पर्श करताना दिसतो. या सगळ्यामुळे सलमानचे आयुष्य हे एखाद्या बहुरेषीय सिनेमाच्या गोष्टीसारखे आहे. ते एकाच पातळीवर किंवा एकाच पद्धतीने कधीही पाहता येणार नाही.
आज वयाच्या साठाव्या वर्षात पदार्पण करताना सलमान खान हा फक्त बॉलीवूडमधील प्रदीर्घ काळ ‘स्टारडम’ अनुभवलेला कलाकार राहिलेला नाही तर, गेल्या चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूड आणि त्याचसोबत विविध निमित्ताने सातत्याने चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. साधारणतः भारतीय सिनेजगताचा विचार करताना एवढी दीर्घ वर्षे सकारात्मक आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात नकारात्मक बाबींचा वेताळ आपल्या खांद्यावर वाहून नेणारा दुसरा कलाकार क्वचितच अन्य कोणी असेल.