
वाढता लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी समोसा अन् जिलेबीसारख्या पदार्थांमध्ये फॅट किंवा साखरेचे प्रमाण किती आहे याची माहिती देणारे फलक ‘जनजागृती’साठी जेवणाच्या ठिकाणी लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या खाद्यपदार्थात किती पोषणमूल्ये आहेत आणि अपायकारक काय आहे, याची जाणीव असायलाच हवी... आपण काय खातो याची थोडी जरी काळजी घेतली तर आपले आरोग्य खऱ्या अर्थाने ‘गोड’ होऊन जाईल.
एका सामान्य आकाराच्या साधारण १०० ग्रॅम वजन असलेल्या समोशामध्ये जवळपास २५० ते ३०० कॅलरी असतात. ५० ग्रॅम वजन असलेल्या एका जिलेबीत १५० ते २०० कॅलरी असतात. त्यातही पाक किती प्रमाणात शोषला गेला आहे, त्यानुसार कॅलरीचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. एक समोसा आणि एक जिलेबी मिळून ४०० ते ५०० कॅलरी होतात. म्हणजेच एका वयस्क व्यक्तीला दिवसभराच्या आहारातून जितक्या कॅलरीची शिफारस करण्यात आली आहे, त्यातील बहुतांश भाग एकाच वेळच्या स्नॅकमधून, फक्त या दोन पदार्थांमधून खाल्ला जातो. आता इतक्या कॅलरी पचवण्यासाठी संबंधित व्यक्तीला पुढील क्रिया करण्याची गरज असते... पहिले म्हणजे, जवळपास ९० ते १०० मिनिटे जलद चालणे, मध्यम गतीने ३० ते ४० मिनिटे चालणे आणि सायकलिंग किंवा एरोबिक्ससारख्या अतिजोमाने करावयाच्या हालचाली ४५ ते ५० मिनिटे करणे.