

Extreme Summer Climate In Vidarbha Region
esakal
नागपूर व विदर्भातील उन्हाळा सर्वपरिचित आहे. भर उन्हाळ्यात विशेषतः मे महिन्यात येथील कमाल तापमान तब्बल ४७-४८ अंशांपर्यंत उसळी घेते. घामफोड गरमी आणि भयंकर तापमानामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरचे लोक सहसा विदर्भात पाय ठेवण्याची हिंमत करीत नाही. ‘विदर्भातला उन्हाळा नको गं बाई!’ अशीच त्यांची पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया असते. केवळ विदर्भात राहणारी व्यक्तीच येथील असह्य उन्हाळा सहन करू शकते.
नागपूर व विदर्भातील अन्य शहरांचा इतिहास बघितल्यास तापमानाने नेहमीच विक्रमी उसळी घेतली आहे. मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यात नागपूरकरांनी हा अनुभव घेतला. या महिन्यात अक्षरशः रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली. ३०पैकी तब्बल १८ दिवस नागपूरचा पारा चाळिशीपार राहिला. गेल्या दहा वर्षांत नागपूरकरांना प्रथमच इतका उष्ण व तापदायक एप्रिल महिना अनुभवायला मिळाला. या महिन्याच्या उत्तरार्धात दीर्घकाळपर्यंत उन्हाची तीव्र लाट अनुभवायला मिळाली. सर्वाधिक ४५.४ अंश सेल्सिअस तापमान २६ एप्रिल रोजी नोंदविण्यात आले. उच्चांक मात्र यावेळी मोडीत निघू शकला नाही.