डॉ. अविनाश भोंडवे
डॉक्टरांना फक्त एवढेच अपेक्षित आहे, की आदर नाही केलात तरी चालेल, पण सार्वजनिक चव्हाट्यावरची बिनबुडाची निंदानालस्ती नको. सेवा देताना रुग्णांनी डॉक्टरांबाबत संशय न बाळगता त्यांच्यावर विश्वास ठेवावा. अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करताना एक सभ्य, सुसंस्कृत वातावरणात रुग्णांना सर्वोत्तम सेवा देता यावी, यासाठी डॉक्टरांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना हवी, हिंसेची भीती नको.
भा रतामध्ये १ जुलै १९९१पासून दरवर्षी देशभरात ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य चळवळीत महात्माजींसोबत स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय अग्रभागी असलेल्या, भारतरत्न डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हा दिवस निवडला गेला. डॉ. रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी आणि मृत्यूदेखील १९६२च्या
१ जुलैला झाला होता. पेशाने नामांकित फिजिशियन आणि वैद्यकीय शिक्षक असलेल्या डॉ. रॉय यांनी अनेक धर्मार्थ आणि सरकारी रुग्णालये, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली होती. डॉ. बी. सी. रॉय यांना ४ फेब्रुवारी १९६१ रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.
डॉक्टर्स डेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे, सेमिनार्स घेतले जातात; सामाजिक सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉक्टरांच्या सेवेचा सन्मान प्रत्येक शहरात आणि गावात केला जातो. पण भारतातील वैद्यकीय क्षेत्रामधील आजची परिस्थिती पाहिली, तर सत्काराचा एवढा हा दिवस सोडला, तर बाकीचे ३६४ दिवस डॉक्टरांना रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे १ जुलै हा दिवस फक्त पुष्पगुच्छ आणि ‘थँक्यू डॉक्टर’ स्टेटसचा नसून, डॉक्टरांची सद्यःस्थिती समजून घेण्याचाही असावा.