डॉ. अंजली भट्ट
किशोरावस्था म्हणजे झपाट्याने घडणाऱ्या बदलांचा काळ. शरीर, मन आणि संपूर्ण आयुष्याच्या पायाभरणीचा टप्पा. या वयात योग्य आहार, व्यायाम आणि भावनिक समतोल अशा सवयी रुजल्यास त्या केवळ आजच नव्हे, तर आयुष्यभर आरोग्यदायी जगण्याचा मूलभूत पाया ठरू शकतात.
मानवी आयुष्यातील संप्रेरकांच्या (हार्मोनल) आणि चयापचयाच्या (मेटॅबोलिक) घडामोडींसाठी १३ ते १८ वर्षे हा कालखंड अत्यंत निर्णायक टप्पा मानला जातो. या वयात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास झपाट्याने घडत असतो. मुलांमध्ये पुरुषसदृश दुय्यम लैंगिक गुणधर्म (Secondary Sexual Characteristics) विकसित होतात आणि स्नायूंची वाढ झपाट्याने होते; तर मुलींमध्ये स्त्रीसदृश दुय्यम लैंगिक गुणधर्म विकसित होऊन मासिक पाळी सुरू होते. या अवस्थेत योग्य आहार घेतल्यास मुला-मुलींच्या उंचीची आणि एकूण शरीराची वाढ चांगली होते.