डॉ. राजेंद्र बर्वे
मुलांना रंगवून रंगवून गोष्टी सांगणं, त्यातलं नाट्य उभं करणं आणि मुलांना त्यात गुंतवून ठेवणं ही मोठी कला आहे. कथाकथन हा पिढ्यांना बांधून ठेवणारा मोठा पूल आहे. या कथा चिरपरिचित असतील, पुराणातल्या असतील, किंवा नव्यानं रचलेल्या असतील; त्यांचा परिणाम सारखाच होतो.
ओटीटीवरच्या ॲडोलसन्स या मालिकेनं किशोरावस्थेतली मुलं, त्यांचं छोटं त्रिकोणी कुटुंब, त्यांच्यातील नातेसंबंध आणि मुलांमधली आक्रमकता यांविषयी भीतीयुक्त अस्वस्थता निर्माण केली आहे. खरंच का मुलांमध्ये इतका हिंस्रपणा असतो? आई-वडिलांनाही आपल्या मुलांच्या मनःस्थितीचा थांगपत्ता किंवा सुगावा लागत नाही? हजारो मैलांवरच्या पाश्चात्त्य जगात उद्भवलेली ही परिस्थिती आपल्या देशात उद्भवणंही शक्य आहे का? वर्तमानपत्रातील बातम्यांचा वेध घेतला, तर या प्रश्नांची उत्तरं मिळतील.