डॉ. अविनाश भोंडवे
वय १९ ते ५० या काळातला आहार आरोग्याचा पाया असतो; या प्रत्येक टप्प्यावर केलेल्या छोट्या-मोठ्या सुधारणा म्हणजे दीर्घायुष्याची मुहूर्तमेढ असते.
उत्तम आरोग्यासाठी आहार नितांत महत्त्वाचा असतोच, मात्र जन्माला आल्यापासून वाढत्या वयानुसार शरीराच्या गरजा बदलत असतात आणि त्याप्रमाणे आहारही बदलत न्यावा लागतो. वयाच्या विविध टप्प्यांवर सजगतेने केलेला आहार दीर्घायुष्याचा आणि निरोगी वृद्धत्वाचा पाया ठरतो.
वयाच्या १९ ते ३० या काळात योग्य आहारामुळे तारुण्याची ऊर्जा टिकवता येते; तिशीनंतर केलेल्या संतुलित पायाभूत भक्कम आहारामुळे मध्यमवयीन आयुष्यातली आव्हाने पेलता येतात आणि चाळिशी उलटल्यावर प्रौढत्वामधील आरोग्य वृद्धिंगत करता येते. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही जीवनातल्या १९ ते ५० वर्षे या काळातल्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेल्या आहाराबाबत, शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यशैलीची माहिती असणे गरजेचे ठरते.