

AI Companion and Human Relationships
esakal
डॉ. बाळ फोंडके
ती खरोखरच थकली होती. निराश व्हायला लागली होती. तिच्याही नकळत, बहुतेक नाईलाजानं तिनं त्याला होकार दिला. आता ओरायन बाबांच्या उशाशी बसून राहायला लागला. शर्वाणी बसत असे तसाच. तो त्यांना गोष्टी ऐकवू लागला. त्याच्या नाही, शर्वाणीच्याच. खिडकीजवळ बसून वडिलांची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या एका लहान मुलीची. त्यांनी येऊन तिला उचलून मिठीत घेतल्याबरोबर हरखून जाणाऱ्या मुलीची. एका वाढदिवसाच्या दिवशी केक करताना झालेल्या फजितीची.
शर्वाणीचं विचारचक्र सुरूच होतं. ‘गेल्या सुट्टीच्या दिवसांमध्ये मी नेहमीसारखी उत्साही नाही हे बाबांनी पाहिलं असेल. आई गेल्यापासून मीही जणू कोशात गेल्यासारखी, हरवल्यासारखी झालेय याची कल्पना त्यांना नक्कीच आली असेल. त्यांनी बोलून दाखवलं नाही पण त्यांनी ते हेरलंय हे मीही ओळखलंय. त्यावर त्यांनी काही दिवस माझ्याबरोबर जास्ती वेळ घालवण्याचा प्रयत्न जरूर केला. मनापासून केला. पण मी तशी थंडच राहिलेय हेही त्यांनी बघितलं होतं. कम्पॅनियनशीही नाळ जोडलेली असायला हवी असते.
ओरायन दारातच उभा राहिला होता. तो आपलासा वाटावा असा मुद्दाम केला आहे, असं शर्वाणीला वाटून गेलं. तरीही तो माणसासारखा वाटत नव्हता. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. निर्विकार. जणू हे जे काही चाललंय त्याच्याशी आपला काही संबंधच नाही असं दर्शवणारा. शर्वाणी ओरायनच्या कामात काही खोट सापडतेय का त्याचाच शोध घेत होती. तसं झालं की मग बाबांना सांगून त्याला घराबाहेर काढता आलं असतं...
‘‘गुड मॉर्निंग बेबी, टाइम टू वेक अप.’’
‘‘अंऽऽ! झोपू दे ना आई. आज रविवार, सुट्टी आहे ना कॉलेजला. जरा आणखी झोपू दे ना.’’
यावर आई काही बोललीच नाही. फक्त खिडकीवरचा पडदा सरकवल्याचा आवाज आला. बाहेरचा लख्ख सूर्यप्रकाश उघड्या खिडकीतून थेट तिच्या डोळ्यांवर पसरला. धसमुसळेपणानं तिचे डोळे उघडायचा प्रयत्न करू लागला. शर्वाणीला तो सहन होईना. घाईघाईनं पांघरूण डोळ्यांवर ओढून घेत तिनं तक्रार केली.
‘‘हे गं काय आई? एक दिवसच तर जरा उशिरा लोळत पडावंसं वाटतं. तेही करू देत नाहीस तू. थोडा वेळ. थोडा वेळच आणखी झोपू दे ना!’’
‘‘इट इज लेट बेबी. वेल पास्ट ब्रेकफास्ट टाइम. डॅड हॅज ऑलरेडी फिनिश्ड हिज ब्रेकफास्ट ॲण्ड लेफ्ट.’’
‘आई असं का बोलतेय? इंग्रजीत? आणि डॅड? मी तर त्यांना बाबा म्हणते, आईला माहिती आहे हे. ती तर त्यांना शेखर म्हणूनच हाक मारते. मग आजच हे डॅड काय, ब्रेकफास्ट काय! आणि असा जबरदस्तीनं डोळ्यांवर सूर्यप्रकाशाचा जोमदार झोत मारत उठवण्याचा प्रयत्न काय?’ शर्वाणीच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ माजला. तितक्यात तिला जाणवलं. हा आवाज आईचा नाही. रागावली तरी आई हळुवार, कानांना गोंजारल्यासारखीच बोलायची. अशी, अशी तुटकतुटक, यांत्रिकपणे बोलत नसे. मग आजच काय...?