

AI-Powered Home Appliances and Smart Technology
esakal
प्राची गावस्कर
सध्या एआय अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सर्वत्र गाजत आहे. अगदी किरकोळ खरेदीबाबत सल्ला घेण्यासाठीदेखील एआयचा वापर केला जात आहे. मग उपकरणे, वस्तू तरी कशा मागे असतील! दसरा व दिवाळीसाठी सजलेल्या बाजारपेठेतदेखील एआय तंत्रज्ञानयुक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची चलती दिसत आहे. नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी युक्त स्मार्ट उपकरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत गृहोपयोगी उपकरणे केवळ चैनीची साधने राहिलेली नाहीत, तर दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाली आहेत. मिक्सर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह, एअर कंडिशनर, व्हॅक्युम क्लीनर यांसारख्या उपकरणांमुळे घरातील अनेक कामे कमी वेळात आणि कमी श्रमांत पूर्ण होतात. बदलती जीवनशैली, वाढते उत्पन्न, तंत्रज्ञानातील प्रगती आणि ऑनलाइन खरेदीमुळे या उपकरणांच्या खरेदीच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. पूर्वी गृहोपयोगी उपकरणे खरेदी करताना ग्राहक प्रामुख्याने किंमत, टिकाऊपणा आणि ब्रँडची विश्वासार्हता यांचा विचार करत असत. दुकानात प्रत्यक्ष जाऊन उपकरण पाहणे, विक्रेत्याचा सल्ला घेणे आणि इतरांच्या अनुभवांवरून निर्णय घेणे ही सर्वसाधारण पद्धत होती. आता मात्र ग्राहक अधिक माहितीपूर्ण झाला आहे. तो विविध ब्रँड्सची वैशिष्ट्ये, किमती, ग्राहकांचे अभिप्राय आणि उत्पादनांची तुलना इंटरनेटवर करून मग खरेदीचा निर्णय घेतो.